कझाकस्तान

कझाकस्तान? कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना? पण कुठे हे हा देश ? कसा असेल हा देश? असा विचार सुरू झाला. याचे कारण श्रीनिवासच्या एका पेपरचं प्रेझेंटेशन अल्माटी या कझाकस्तानमधल्या शहरात होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये असल्याचं कळलं. थोड्याश्या confused मनाने मी ही बरोबर जाण्याचं ठरवलं. कझाकस्तानचा टूरिस्ट visa ही एक मोठी अवघड गोष्ट आहे. Finally उशिरानं का होईना, प्रवासाच्या आधी तो मिळाला.

विमानानी उड्डाण केलं. ३ तासांचा हा प्रवास आहे. भारतातून अल्माटीला फक्त दिल्ली वरूनच जाता येते. रोज Air Astana कंपनीचे एकच विमान अल्माटीला जाते आणि एकच विमान अल्माटी वरून दिल्लीला येते. हवा clear होती. बराच वेळ खालची गावं दिसत होती. वेगवेगळी शहरं जात होती आणि विमानातल्या सीट समोरच्या TV वर सुध्दा दिसत होती. 
अफगणिस्तान, पेशावर, काबुल, दुशांबे, समरकंद, ताश्कंद, बिश्केक अशा प्रदेशावरून विमान जात होतं. मोठमोठ्या वाळवंटासारख्या रुक्ष पण जणू अमूर्त, abstract पेंटिंग वाटावं अशा पर्वतरांगा दिसत होत्या. ताश्कंद नजरेआड होताना पुन्हा तशाच सुंदर आणि बर्फाच्या शाली पांघरलेल्या पर्वत रांगा दिसू लागल्या. टीव्हीवर तापमान -50 C दाखवत होते. ह्या तिएन शान पर्वत रांगा. कझाकस्तान आणि अल्माटी जवळ आल्याची खूण.
अल्माटी शहर वसलं आहे तिएन शान पर्वत रांगाच्या पायथ्याशी. अल्माटी हे सेंट्रल एशिया मधलं सगळ्यात मोठं शहर मानलं जातं. ह्या भागात इ.. पूर्वी ९-१० व्या शतकापासून वसाहत असल्याची नोंद आढळते. अल्माटी याचा कझाक भाषेतला अर्थ आहे सफरचंद. अल्माटी ही कझाकस्तानची १०० वर्षं राजधानी होती. पण गेल्या काही वर्षांत ती 'नूर सुलतान' (पूर्वीचे अस्ताना) शहरात हलवण्यात आली आहे. १९११ मधे झालेल्या भूकंपात उध्वस्त झालेल्या अल्माटी शहराचे इतकं सुंदर पुनर्निर्माण मन अचंबित करते.
प्रथम दर्शनीच लक्षात आले ते अल्माटी मधील भव्य लांब रुंद रस्ते. कल्पना करा, आमच्या हॉटेल समोरचा रस्ता ७.५ किमी लांबीचा होता! सर्वच्या सर्व रस्ते काटकोनात बांधलेले आहेत. आठवड्याच्या वास्तव्यामधे एकही, अगदी छोटासा सुध्दा वळलेला रस्ता पहाण्यात आला नाही

अल्माटी हे शहर वेढलं आहे ते तिएन शान पर्वत रांगांनी. शहरातल्या कुठल्याही रस्त्यावरून तुम्हाला ह्या रांगा दिसतात. त्यांची शिखरं बर्फानी आच्छादित, अगदी उन्हाळ्यात सुध्दा. अल्माटी शहराचे तपमान असते -२०॰ C ते +३०॰ C. हिवाळ्यात गावात पूर्ण बर्फ असतो. मोठमोठाल्या आणि भव्य बागा, अगदी स्वच्छ, पाना-फुलांनी तसेच मोठमोठ्या फर आणि पाईन वृक्षांनी बहरलेल्या दिसतात. मोठा ट्रक येऊन पानं गोळा करुन जातानाचं दृश्य हॉटेल मधून रोज दिसायचं. कुठेही प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद फेकलेले असा कचरा दिसला नाही. ठिकठिकाणी कचरा कुंड्या होत्या.

रस्त्याच्या बाजूला, बागांमध्ये, असं ठिकठिकाणी घोडे, पक्षी, माणसं यांची मोठी, १०-१० फूटी धातु शिल्पे  तुम्हाला पाहायला मिळतात. इथे अनेक ऐतिहासिक इमारती, स्मारके सुध्दा आहेत. १९९० पर्यंत अल्माटी सोव्हिएत रिपब्लिकच्या (USSR रशिया) आधिपत्याखाली होते. शहरामधे इमारती, बागा यांच्यावरचा रशियन आर्किटेक्चरचा प्रभाव क्षणोक्षणी जाणवत रहातो. तसेच कझाकस्तानचा काही भाग युरोप मधे असल्याने थोडा युरोपियन प्रभाव राहणीमानावर नक्कीच आहे. येथे डाव्या बाजूने वाहने चालवण्याची पध्दत आहे. लोक शहरात अपार्टमेंट मधेच राहातात. पाळीव किंवा भटक्या प्राण्यांबाबत बोलायचं तर ८ दिवसाच्या वास्तव्यात कुठेही एखादं मांजर किंवा कुत्रं दृष्टीस पडलं नाही.

मानवी इतिहासामध्ये सर्वप्रथम घोडे माणसाळवले गेले, ते कझाकस्तानच्या प्रदेशात असे म्हणतात. हे खरंही असू शकेल कारण कझाकी लोकांच्या आयुष्यातील घोड्यांचं महत्वाचं स्थान. अनेक प्रकारे घोडे त्यांच्या उपयोगात येतात. दळणवळण, कातडी पासून उबदार कपडे, बूट वगैरे. घोड्याचं मांस ही तिथली खास डिश मानतात


तसेच सोनेरी गरुड हा आहे राष्ट्रीय पक्षी. पण खरा देखणा पक्षी आहे बहिरी ससाणा. ससाण्यांना खास पद्धतीने शिकवून वाळवंटात भटक्या सश्यांची शिकार करायला पाठवतात. ह्या वरून सध्या 'Falcons training' हा एक खास खेळ झालेला आहे.
इथे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धासुध्दा होतात. अशा स्पर्धांसाठी त्यांना लांडग्यांची शिकार करायला शिकवावं लागतं. त्यांच्या साठी विमानात खास सीट घ्यावी लागते. तेही बिझिनेस किंवा पहिल्या वर्गातील. अशीही बरीच माहिती कझाकस्तान विषयी कुतूहल वाढवत होती.
अल्माटी पासुन साधारण १३०० कि.मी. वर आहे बैकानुर. इथे आहे रशियाचं स्पेस सेंटर. रशियाच्या अंतराळ घडामोडी इथून चालतात. भारतासाठी सुध्दा ही एक खास जागा आहे. इथूनच राकेश शर्मांनी अंतरिक्षात स्वारी केली होती.

अल्माटी शहरात इतर कुठल्याही शहरा सारखेच शॉपिंग मॉल आहेत. उन्हाळ्यातील संध्याकाळी रस्ते माणसांनीलहान मुलांनी फुलून गेलेले दिसतात. अराबात हा तिथला खास पादचाऱ्यांसाठी राखून ठेवलेला रस्ता. वाहनांना इथे प्रवेश नाही. मोठ्या मोठ्या पडद्यांवर जाहिराती, सिनेमे चालु असतात. रस्यात सर्व बाजूनी कॅफेज्, हॉटेल्स, दुकानं यांचा गजबजाट असतो. या रस्त्याचं मुख्य आकर्षण तिथले संगीत. अनेक संगीतकार तिथे आपली कला सादर करत असतात. लोक त्याला मनापासून प्रतिसाद देत आनंद घेत असतात. अतिशय आनंदी, तरुणाईला आवडेल अशा वातावरणात तुम्ही रमून जाता. समोर बर्फाच्छादित डोंगर, संध्याकाळचा सोनेरी मुलायम सूर्यप्रकाश, हवेतला मंद गारवाअहाहा how romantic !

कझाकस्तानचे चलन आहे टेंगे. ५ टेंगे बरोबर भारतीय १ रुपया. सफरचंद आणि कलिंगड इथे होतात. पिवळ्या रंगाचे कलिंगड इथे पाह्यला मिळते. बाकी बराच माल बाहेरून येतो. एकंदर कझाकस्तान मधलं राहणीमान इतर देशांच्या तुलनेत आवाक्यातले वाटले.

इथला मुख्य व्यापार चालतो तो तेल, पेट्रोलियम आणि खनिज संबंधित. पर्यटनासाठी हा देश अजून तितका प्रसिध्द नाही. रशियन, युरोपियन पर्यटक येथे येतात ते स्किईंगसाठी हिवाळ्यात आणि आरामासाठी उन्हाळ्यात. इथे अगदी पंचतारांकित हॉटेलची सोय सुध्दा आहे.
सर्व ठिकाणी मेन्यू मधे एक तरी शाकाहारी पदार्थ सापडतो. पण भाषा ??? हा फार मोठा अडथळा. इथे खूप कमी लोकांना इंग्रजी समजते
मुख्य भाषा कझाक आणि तेवढीच चालणारी भाषा रशियन. भाषेमुळे खूप अडथळे येतात. तुमच्या अभिनय क्षमतेचा चा कस लागतो. अगदी टॅक्सी बोलावण्यापासून गोंधळाला सुरवात होते. तिथे 'गुगल' ही आपली साथ सोडू शकतो. रशियन मधे Yandex हे अँप  आहे. ते 'गुगल' इतकेच प्रभावी आहे. काही भारतीय हॉटेल्स ही इथे आहेत. भारतीय पर्यटक मात्र फारसे दिसले नाहीत. पण येथे काही स्थलांतरित भारतीय लोक आहेत. भारतातून काही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इथे येतात. आमच्या विमानतही बरेच विद्यार्थी होते.
टीव्ही वर खूप इंग्रजी चॅनेल आहेत. पण ते सगळे कझाक भाषेत दाखवतात. हो, अगदी आपले हिंदी झी आणि बॉलीवूड हेही चॅनेल आहेत. पण ते ही भेटीला येतात, ते कझाक भाषेत.

मी केलेल्या निरीक्षणानुसार कझाकी लोक गुलाबी गोरे, मध्यम उंचीचे, निळ्या डोळ्यांचे, चंद्रमुखी असतात. तर रशियन पांढरे गोरे, भरपूर उंच आणि सडपातळ असतात. मुली सुध्दा ५'" ते ६' सहज दिसतात. इथला पेहराव जास्त करून युरोपिन पध्दतीचा दिसला.

फिरण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था खूप चांगली असल्याचे कळले. बस पण चांगल्या आणि वातानुकूलित आहेत. पण भाषेमुळे हे धाडस करता आले नाही. लोकल गाईड घेऊन तुम्ही फिरू शकता.
रशिया आणि कझाकस्तान मध्ये खूपच लोकप्रिय असलेली आराम करण्याची जागा म्हणजे हमाम. तुर्की हमाम हे पूर्वी राजे आणि राण्यांनी शाही स्नान घ्यायचे ठिकाण. आताच्या भाषेत ते आहेत Wellness Spa. यामधे मसाज, सौना आणि मग स्नान असते. अजूनही बरेच प्रकार यामधे असतात.

अल्माटी मधे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धा होतात.

अल्माटी Site Seeing:

Shymbulak Mountain (शिंबुलाक माऊंटन): 
हा पर्वत तिएन शान रांगांचाचं एक भाग आहे. हे ठिकाण Skiing साठी प्रसिध्द आहे. साधारण अल्माटी शहरापासून २५ कि.मी. वर हे ठिकाण आहे. जायचा रस्ता अतिशय सुंदर बांधला आहे. काही ठिकाणी भूस्खलनापासून बचाव करण्या साठी जाळ्या लावल्या आहेत तर काही ठिकाणी मोठे लोखंडी सपोर्ट दिले आहेत.
या पर्वतावर तुम्हाला वर ग्लेशिअर पर्यंत जाता येतं. त्याची समुद्रसपाटीपासून साधारण उंची आहे ३२०० मीटर. इथल हिवाळ्यातील तापमान असते -७॰ C . उन्हाळ्यात ते असते २५॰ C. पर्वतावरती Ski Resort आहे. तीन टप्प्यात तुम्ही वरती पोहोचता. Ski lifts किंवा गंडोला कार्सची सोय आहे. ही गंडोला कार जगातील तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात लांब ४.५ कि. मी. लांबीची आहे. वरती पोहोचल्यावर तुम्ही बर्फाचे डोंगर, आणि फरच्या वृक्षांनी नटलेली, मैलोनमैल पसरलेली तिएन शान ची पर्वत रांग बघण्यात हरवून जाता. तिथे जमिनीवर उगवलेली एक गवताची पात ओळखीची वाटली - पण ती कशाची होती? ओहो ही तर कांद्याची पात ! 

Republic Square (रिपब्लिक स्क्वेअर): 

अल्माटी शहराच्या मध्यभागी हा भाग आहे. इथे बरेच social events होतात. पूर्वी इथे माजी अध्यक्षांचा राजवाडा होता. आता तेथे Muncipal Office आहे. स्वातंत्र्य स्मारक, Central State Museum आणि बऱ्याच महत्त्वाच्या इमारती या भागामध्ये आहेत. अनेक शासकीय समारंभ इथे होतात.



RAKHAT Chocolate Factory (राहत चॉकलेट फॅक्टरी):

RAKHAT चा उच्चार होतो राहत.
ही फॅक्टरी अल्माटी मध्ये ग्रीन बाजारच्या जवळ आहे. तिच्याजवळ जाताच तुम्हाला हवेमध्ये चॉकलेटच्या सुगंध येतो. ही फॅक्टरी जवळपास ७० वर्ष जुनी आहे. बाहेरच्या बाजूला दुकान आहे. किती प्रकारची, वेगवेगळ्या चवीची attractive packing मधली चॉकलेट तुम्हाला वेड लावतात. रास्त दरात विकत मिळतात.
Green Baazar (ग्रीन बाजार):

हे अल्माटी मधलं प्रसिद्ध लोकल मार्केट आहे. इथे तुम्हाला विविध प्रकारची फळं आणि मांस मिळू शकते. लोकल फ्लेवर हवा असेल तर इथे जरूर भेट दिली पाहिजे.

THE CHARYN CANYON (चॅरिन कॅनियन):
हे कझाकस्तान मधले चुकवू नये असं प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे कॅनियन आहे. जिथे निसर्गाने निर्माण केलेली विविध शिल्पं तुम्हाला पहायला मिळतात. हा १ ते १.५ तासाचा पायी प्रवास आहे. ही कॅनियन १.२ कोटी वर्ष जुनी आहे. तिच्यात किती इतिहास लपला आहे ह्याची कल्पना करून अंगावर रोमांच उभे राहातात. फोटोग्राफीसाठी सुद्धा ही एक नितांत सुंदर जागा आहे. कॅनियनच्या शेवटी सुंदर राहण्याचे रिसॉर्ट आहे. तिथे तुम्ही कॅम्पिंग करू शकता. बाजूला चॅरिन (Charyn) ही सुंदर नदी वाहते.
रिसॉर्टमध्ये गोलाकार तंबूसारखी घरं उभारलेली आहेत. ह्या गोलाकार तंबूसारख्या घरांना यॉर्ट (Yourt) म्हणतात. ही घरं म्हणजे म्हणजे मूळच्या भटक्या जातीच्या कझाक लोकांची घरं आहेत. कॅनियनला जाताना तुम्हाला विविध नयनरम्य अशी निसर्गाची रूपं बघायला मिळतात. दूरदूरपर्यंत पसरलेली कुरणं, तर कधी वाळवंटी रेताड पण बघतच रहावं अशी पर्वतांची रांग. मधेच एखादा घोड्यावरून घोड्यांची राखण करणारा घोडेस्वार, निसर्गाचा कॅनव्हासच आपल्यासमोर उलगडत जातो. कितीतरी वेळ कॅनियनची रूपं डोळ्यासमोरून हलत नाहीत.

Charyn Canyon कडे बसनं जात असताना गाईड माहिती देत होता. High class modern हायवेवरून जाताना, तो चीन-कझाकस्तान-रशिया जोडणारा रस्ता आहे असं कळलं. एवढंच नव्हे तर पूर्वीच्या सिल्क रूटचाच तो एक भाग आहे अशी माहिती सुध्दा मिळाली. त्या, ऐतिहासिक महत्त्वाच्या मार्गावर आपण आहोत ही भावना सुखद होती.

चॅरिन कॅनियन व्हिडीओ लिंक 

Big Almaty lake (बिग अल्माटी लेक):

हा नैसर्गिक लेक २५११ मी. उंच डोंगरांमध्ये आहे. हा साधारण १.५ कि.मी. लांब पसरलेला आहे. गर्द निळ्या रंगाने आपलं मन मोहित करतो. आजूबाजूनी उंच डोंगरांनी हा लेक वेढला गेलेला आहे. जणु काही कोंदणात बसवलेला निलमणी. ह्या तळ्याचं पाणी हे mineral water आहे
पाहूया का ही लिंक  (video)


Zenkov Cathedral, Almaty (झेन्काॅव कॅथेड्रल, अल्माटी):
हे चर्च पूर्णपणे लाकूड वापरून बांधलं आहे, जवळपास एकही खिळा न वापरता. अशा या एकमेवाद्वितीय इमारतीला पाच घुमट आणि तीन aisles आहेत आणि शिवाय एक घंटागृह (Bell Tower) सुध्दा. जगातल्या पूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या इमारतींमध्ये उंचीच्या मापाने पहिल्या आठ इमारतींमध्ये ह्या लाकडी चर्चचा समावेश होतो.

Medeu Gorge (मेडेऊ गॉर्ज):
ही घळ हा निसर्गाचा अजून एक सुंदर अविष्कार. इथलं वैशिष्ट्य आहे Medeu Outdoor Ice Skating Rink. ही जगातली १७०० मी. altitude ची जगातली सर्वात जास्त उंची वर असणारी skating rink मानतात. इथे स्केटिंग मधली जवळपास १०८ golden records झाली असल्याच गाईड कडून समजलं.
या शिवाय अल्माटी मध्ये बघण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं:
Abay Opera House
Kazakhstan Museum Of Arts
T V tower
Koktobe
Falcon show आणि बरंच काही.
ज्या लोकांना Off Beat भटकंती आवडते त्यांनी अल्माटी शहराला एकदा तरी जरुर भेट द्यावी.

हा लेख माझे मित्र थॉमस लुडविग यांचे आभार मानल्याशिवाय पूर्ण होणार नाही. लेखामधील काही फोटो हे श्री. लुडविग ह्यांनी काढलेले आहेत.

Spaceebo (रशियन), म्हणजेच धन्यवाद.


भारती सप्रे



2 comments:

  1. Very informative, chhan lihilay, bhet dyavishi vatatey Kazakhstan la.
    -Rupali

    ReplyDelete
  2. खूप छान वर्णन!

    ReplyDelete