किल्ला बनवू या.....या दिवाळीत....

 


शाळेची सुट्टी लागली रे लागली की काय काय करायचं ते ठरवत घरी यायचं... वाड्यातली मुलं मुली वरच्या चौकात भेटून खेळ ठरायचे... किल्ला मला अन् माझ्या भावाला आमच्या दारासमोर हवा असायचा.. आणि कोणालाच मुलांचा गोंधळ आणि माती नको असायची. नातूबागेच्या मैदानातून माती आणायचं ठरायचं... माती आणायला एक खुरपं, चाळायला चाळणी- हो किल्ल्याला माती कशी रेशमागत मऊसूत हवी ना आणि माती भरायला एक बादली, एक वाडगा एवढं मिनतवारीने आईकडून मिळवायचं...चिंचेच्या तालमीवरून जाता जाता या हौदातली लाल माती किल्ला बनवायला मिळाली तर काय मज्जा येईल, असं वाटायचं.

आखाड्यात चाललेले पैलवानांचे डाव पाहताना "अबब... जबरदस्त, सॉलिड भारी"... असं काय काय वाटत रहायचं.... भर दुपारी ऑक्टोबरच्या तापत्या उन्हात माती खणणं, ढेकळं फोडणं, ती बादलीमध्ये चाळून चाळून भरणं, असं काम अगदी व्यवस्थित दोन तीन जण मिळून करायचो आणि त्यावर वाड्यात काय मस्त भाव मारायचा... माती नेता नेता विटाही शोधून न्यायच्या... अजून एक फेरी लागायचीच... इवलेसे हात एका वेळी किती विटा उचलणार...वीट हातात आली की वाटायचं, आपणही सेवा करावी खूप आई बाबांची...मग विठू आला की ही वीट फेकून म्हणू ऐटीत, 'वेळ नाही रे आत्ता, कामात आहे, उभा रहा या विटेवर’ ऐकलेल्या सगळ्या गोष्टी पावला-पावलाला जणू वस्तीला यायच्या मनात...क्षणाक्षणाला! होईल कां असं, कां नाही होत मग...असे काही बाही विचार येतच रहायचे.


बाबांकडे हट्ट केला की त्यांनी लपवून ठेवलेली दोन तरी गोणपाटं निघायची... विटा, डालडाचे डबे, त्यावर 
गोणपाट अंथरून किल्ल्याचा बेसिक ढाचा बनायचा... मग बाबा आईला हाक मारून म्हणायचे, "मालू, माती भिजवायला दे गं घमेलं या पोरांना... ती भिजवलेली माती गोणपाटावर थापणे हे माझ्या छोट्या भावाचे आवडते काम... तो अगदी बरबटून जात असे ते करताना. मग आंघोळी करून जेवण... सकाळी उठून धावायचं लिंपलेली माती सुकली कां ते पहायला... मग खरा किल्ला बनायला सुरूवात व्हायची... सगळी पोरं त्यात सामील... दुपारी सुरू झालेलं काम होता होता अंधारून यायचं. तरीही आईकडे हट्ट धरायचा, मावळे, शिवाजी महाराज, सैनिक, गाई, बैल, बकरी सगळं हवं असायचं किल्ल्यासाठी. ऑफिसमधून दमून आलेली आई तशीच निघायची. मंडईच्याबाहेर टिळक पुतळ्यापाशी टोपल्यांमधे मातीची खेळणी घेऊन बाया बाप्ये बसलेले असायचे. आई हवं ते घ्यायला सांगायची... कधीच त्यांच्याशी भाव नाही करायची. ती काटकसरीनेच घर चालवायची, पण कुठे पैसे वाचवायचे आणि कुठे खर्च होऊ द्यायचे, याची सुयोग्य जाण असलेली माझी आई! खेळणी विकणारे दोन पैसे जास्त मिळाले की तोंडभरून आशीर्वाद द्यायचे आणि आईच्या चेहेऱ्यावर मंद स्मित आणि समाधान पसरायचं!

रात्री अळीव, धणे, मोहरी असं सारं मिळवायचं, त्याची पेरणी किल्ल्यावर व्हायची... हिरकणीचा बुरूज तर हवाच हवा... बुरूज बनवून सुरीने कापून आकार द्यायला बाबांनी शिकवलं.... शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगता सांगता, किल्ल्यांचे महत्व मनावर ठसायचे. आई-बाबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकताना ऊर अभिमानाने भरून यायचा. आपले महाराज, त्यांचे मावळे सजायचे किल्ल्यावर. मातीतून हिरवे अंकूर डोकावू लागले की गाय, बकरी लागायचीच चरायला... एका वर्षी तर बाबांनी विहीरही बनवून दिलेली आठवतेय... तिला पुली बनवून छोटी बादलीही सोडली होती विहिरीत. रोज सकाळी जाग आली की आमची दुक्कल किल्ल्यापाशीच बसायची ठाण मांडून. भल्या पहाटे आईनी उठवलं की धावायचं किल्ल्यावर आलबेल आहे ना, ते पहायला... आपण उभे केलेले मावळे इमानेइतबारे महाराजांचा किल्ला राखताहेत ते पाहून खुश व्हायचो. किती किती सुंदर आठवणी आहेत.

आता आई-बाबा नाहीत...पण बनवायचाय खरंच किल्ला... पुन्हा बरबटवायचेत हात मातीत.... विटा अन् डालडाच्या डब्यांनी किल्ला ऊंच ऊंच न्यायचाय.... आईच्या हाकांना ऐकलं न ऐकलंसं करत.... गोणपाटावर माती लिंपायचीये... आळीव, धणे पेरायचेत.... शिवबांना सिंहासनावर बसवून डोळे भरून पहात रहायचंय.... ज्या दिवशी किल्ल्याच्या मातीतून इवलाले हिरवे अंकुर डोकावतील; तेव्हाचं कृतकृत्य वाटणं... पुनश्च अनुभवायचंय... हा तानाजी... हे बाजी प्रभू.... या नावांनी मातीचे मावळे खिंडीत लपवायचेत... हिरकणीचा बुरूज असणारच बरं माझ्या किल्ल्यावर.... अन् थेट खाली तिचं घर.. त्यातलं बाळ... सारं सारं.. जिवंत करायचंय... 

किल्ल्यावर लावायच्यात सुंदर पणत्या.... किल्ल्यावरची माती सुकू नये... गवत लवकर उगवावं म्हणून सकाळ संध्याकाळ पाणी शिंपडायला हजार कामांमधून वेळ काढणारी आई दिसतेय नजरेला.... किल्ल्या मागे असलेल्या बंबात आईनी तापत लावलेल्या पाण्याला लाकडांचा, दगडी कोळशाचा धुराचा खमंग गंध येतोय... तो घेत उटण्याने अभ्यंगस्नान करायचंय.... पण न्हायलेलं डोकं पोटाशी धरून पुसायला, औक्षण करायला आज आई कुठेय??

तिच्या बरोबरच मनांत लख्ख दीप उजळवणारी ती दिवाळी आणि सारं बालपण हरवून गेलं कुठेतरी! किती बोलावू म्हटलं तरी ते येणार आठवणीतच!!


स्मिता शेखर कोरडे




6 comments:

  1. खूपच छान लिहिलं आहे.माझ्या बालपणीच्या किल्ला करण्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
  2. Smitu, कीती सुंदर आणि सुरेख वर्णन केलं आहेस ग !!! या वर्षीचा नातीचा किल्ला करताना हेच सगळ अनुभवलं, पण आता आजी या नात्यानं !!!

    ReplyDelete
  3. खूप खूप धन्यवाद सर्वांना..नेहाजी राजय सुरेखा अंजली ..
    नांव लिहित जा खाली कृपया.

    ReplyDelete