कोपेनहेगेन डायरी - २

 

"घर संशोधन"


आता भाड्याने घेण्यासाठी घरं बघायला सुरुवात करायची होती.

कोपनहेगनमध्ये कदाचित "वरसंशोधन " पेक्षाही जास्त कठीण काय असेल तर ते म्हणजे "घर संशोधन ".

ही प्रक्रिया एकंदरच फार क्लिष्ट आहे असं लक्षात आलं. जवळपास कुठे तशी एजन्सी ( कार्यालय )  किंवा ब्रोकर आहे का याचा शोध घ्यायला लागलो तेव्हा लक्षात आलं की सहजासहजी हे इथे सापडत नाहीत.

वेगवेगळ्या रेन्टल पोर्टल वरच घरे शोधावी लागतात. त्याच्यातूनच, ऑनलाईन एजंटशी संपर्क करावा लागतो. आवडलेली घरं बघण्याकरता विनंती अर्ज टाकावा लागतो आणि वेळ घ्यावी लागते आणि कळस म्हणजे प्रत्येक घर प्रत्यक्ष बघायला पैसेही द्यावे लागतात. त्यामुळे पोर्टल वरतीच नीट फोटो बघून आणि व्यवस्थित माहिती वाचून ठरवावं लागतं की नेमकी कोणती घर बघायची आहेत.

अतिशय वेळकाढू प्रकरण आहे हे.

नीना वैशंपायन 

त्यात भर म्हणजे आनंदच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की कोपनहेगनमध्ये घरं सहजासहजी मिळत नाहीत त्यामुळे एखादं घर आवडलं तर पटकन हो म्हणून घेऊन टाक. आता जरा याचा ताण यायला लागला.

बंगलोर मध्ये राहून घरांच्या बाबतीमध्ये आपण फारच जास्त लाडावलेले आहोत हे तर अगदी प्रकर्षाने जाणवायला लागलं. शहराचा मध्यवर्ती भाग व त्याच्या आसपासच्या परिसरात बहुतेक करून ४ ते ५ मजल्याच्या इमारतीचं आढळतात.  त्यात छोटे छोटे अपार्टमेंट्स. १ बेडरूमचे  तर बरेच. अगदी मुंबईतल्या फ्लॅट ची आठवण यावी असे.  पण गंमत म्हणजे २ किंवा ३,४ अगदी ५ बेडरूम चा फ्लॅट असो, बाथरूम मात्र एकच. त्यातही बेसिन, कमोड आणि छोटासा शॉवर एरिया याच बरोबर वॉशिंग मशीन, ड्रायर सुद्धा घुसडलेले.

एका फ्लॅटमध्ये दुसरे हाफ बाथरूम आहे असं कळलं म्हणून मोठ्या आनंदाने बघायला गेलो. ब्रोकरने ते दाखवण्यासाठी दार उघडलं तेव्हा हसावं की रडावं तेच कळेना.  कारण अक्षरशः कपाटाचं दार उघडून आत बसायचं अशीच परिस्थिती होती.

जरा जाड व्यक्तीने तिथे जायचं ठरवलं तर कर्म कठीणच काम.


सर्व घरांमध्ये खुले स्वयंपाकघर, ते मात्र स्वयंसिद्ध (सुसज्ज) असतं. बहुतेक ठिकाणी स्वयंपाकघर, दिवाणखाना आणि जेवणाची खोली मिळून एकच  खोली असते. बाल्कनी सुद्धा बहुतांश फ्लॅटला दिसत नाही.

जरा उपनगरात, नवीन बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये बाल्कनी आढळतात.

त्यामुळे आमच्या " 2 bedroom with 2 bathroom and a balcony " या एवढ्याशा साध्या अपेक्षेला पण सुरुंग लागला.

सुसज्ज स्वयंपाकघर असलं तरी बाकी घरामध्ये एक साधा दिव्याचा बल्ब सुद्धा नसतो. "furnished flat " हे तर दिवास्वप्नच होतं.

 

सर्व घरांच्या भिंतींचा रंग पांढराच आणि लाकडी जमीन हे ठरलेलंच.

स्वयंपाक घरांमधले कप्पे, फ्रिज सुद्धा पांढरेच. अगदी ओटा सुद्धा पांढरा किंवा ग्रे. डॅनिश लोकांचं  रंगांशी काय वाकडं आहे काही कळत नाही. पांढरा सोडून काळा आणि राखाडी (grey) हे दोनच रंग त्यांना आवडतात बहुतेक.

 

सर्व घरांमध्ये खोल्या गरम करण्याची सोय असते. थंड करण्याची मात्र सोय नसते.

 

फक्त एक गोष्ट मात्र छान आहे इथल्या घरांमध्ये, जी मला खूप भावली. सर्व घरांना आत शिरल्याबरोबर एक छोटासा कॉरिडॉर असतोच, जिथे चपला काढण्याची, कोट व छत्र्या वगैरे लावण्याची व्यवस्था असते. घराच्या आत बाहेरच्या चपला, शूज घालून येणं हा चांगला शिष्टाचार मानला जात नाही. 

 

आतापर्यंत तरी एवढेच साधर्म्य त्यांच्यात आणि आपल्यात मला दिसलं.😁😁

क्रमश:

नीना वैशंपायन


 



1 comment: