कोपनहेगेन .....डेन्मार्क ....थोडासा इतिहास
दैनंदिन जीवनाची घडी व्यवस्थित
बसल्यानंतर जरा आजूबाजूला डोकं वर काढून बघायला फुरसत मिळाली. आणि मग कोपनहेगन
शहराचे नवनवीन पैलू उलगडून दिसायला लागले. डेन्मार्क देशातल्या Zeland नावाच्या
बेटावरच्या पूर्व किनार्यावर कोपनहेगन वसलेले आहे. शहराचा नवीन वाढलेला भाग Amager
नावाच्या बेटावरती वसला आहे. कोपनहेगनला डेनिश भाषेत 'Kobenhavn' असे म्हणतात. त्याचा अर्थ बंदर आणि
व्यापाराचे ठिकाण.
Stone
age पासून इथे वस्ती होती असे म्हणतात. पण Viking age पासून म्हणजे, ८ व्या ते ११ व्या शतकात वायव्य युरोपच्या बऱ्याच भागात छापे टाकून स्थायिक झालेल्या स्कॅन्डिनेव्हियन वायकिंग्ज वा
समुद्री चाचे आणि व्यापाऱ्यांपैकी कोणीही ज्या
काळात राहत होते, त्या काळाशी संबंधित काळात येथे
दळणवळण वाढले. संपूर्णपणे सपाट जमिनीवर वसलेले हे शहर बाल्टिक समुद्राच्या काठावर
आहे. सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेला देश असल्याने इथले Vikings - 'समुद्री
चाचे' हे जहाज
बांधणी मध्ये अत्यंत प्रवीण होते. हे अत्यंत धाडसी, लढवय्ये, निर्भीड पण साधी
राहणीमान असणारे लोक होते. त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, आणि युरोपमधल्या इतर अनेक
देशांवरती हल्ले केले. तिथली अपार संपत्ती लुटली. तिथे आपल्या वस्त्या निर्माण
केल्या. हे करत असतानाच त्या देशांच्या संस्कृतीचा, तसेच प्रामुख्याने ख्रिश्चन
धर्माचा प्रभाव यांच्यावर पडला.
मुळातली nordic संस्कृती ही
साधी, सरळ विचारांची. तो स्वभाव गुणधर्म सर्व इमारतींमध्ये, फर्निचरमध्ये, आणि
डिझाईनमध्ये दिसतो. वापरायला सहज, सोपे, दिसायला साधे, जागा वाचवणारे Nordic
furniture किंवा decor हे सध्या जगभर खूपच
लोकप्रिय आहे. अगदी
इथल्या ऐतिहासिक इमारती, राजमहाल, बागा, चित्र, शिल्प, कारंजी यातही खूप थाटमाट,
बडेजाव किंवा खूप सारे नक्षीकाम, कोरीव काम इ. दिसत नाही.
कोपनहेगन शहर हे अनेक नैसर्गिक व
कृत्रिम बेटांमध्ये विभागले आहे, जे अनेक लहान मोठ्या पुलांनी जोडलेले आहे.
त्यामुळे शहराच्या मध्यभागामध्ये अनेक कालवे आहेत. "The city of spires" म्हणजे "horizontal Skyline, broken only by the spires and towers of its churches
and castles " अशी या शहराची ओळख आहे. "Indre
By" किंवा "The inner city" हा
शहराचा जो ऐतिहासिक मध्यभाग आहे, तिथे हे प्रकर्षाने दिसते.
कोपनहेगन हे शहर समुद्रकाठी वसलेले
असले तरी इथला किनारा वालुकामय नाही. त्यामुळे शहरातच अनेक ठिकाणी कालव्यांच्या
बाजूला लाकडाच्या पट्ट्यांनी board
walks बनवले आहेत. त्यांचाच उपयोग beach सारखा
केला जातो. उन्हाळ्यामध्ये खूप जण कालव्याच्या पाण्यात डुबक्या मारण्याचा, पोहण्याचा
आनंद घेतात आणि मग सूर्यस्नानासाठी ह्या board walks वर
पसरतात. हिवाळ्यामध्ये यांच्या बाजुलाच फिरते sauna चे
युनिट्स लावले जातात. थंडीच्या दिवसात, बर्फाळ पाण्यात डुबकी मारुन मग sauna
मध्ये जाऊन बसण्याचा प्रघात इथे आढळतो. त्यांना असं थंडगार पाण्यात
उड्या मारताना बघून, उबदार कपड्यांमध्ये पूर्णपणे लपेटून घेतलेलं असतानासुद्धा मला
हुडहुडी भरत होती.
उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्यामुळे हा देश अधिकच थंड ही असतो. तसंच
हिवाळ्यामध्ये दिवस खूपच लहान तर उन्हाळ्यामध्ये दिवस खूपच मोठा असतो. म्हणजे
हिवाळ्यात सूर्य सकाळी ८.३० ला उगवतो आणि दुपारी ३.३० लाच मावळतो. तर
उन्हाळ्यामध्ये पहाटे ४.३० लाच सूर्य उगवतो आणि रात्री १० नंतर मावळतो. शहरात फिरताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे बऱ्याच घरांच्या
खिडक्यांना पडदेच नसतात. किंवा पडदे जरी असले तरी ते लावून बंद केलेले दिसत नाही.
याबाबतीत प्रायव्हसीचा फंडा महत्त्वाचा नाही.
इथले लोक, बायका, पुरूष
दोघेही अतिशय उंच
आणि बलवान असतात.
पुरुषांच्या बरोबरीने बायका सर्व कामे करताना दिसतात. कामाच्या तासाचा दर खूपच जास्त
असल्याने बरीचशी कामे इथे स्वतःलाच करावी लागतात. सोमवार ते गुरुवार साधारणपणे ८ ते ५
आणि शुक्रवारी तर ८ ते जेमतेम ३.३०/४ पेक्षा जास्त वेळ कोणीही काम करत नाही. जर
एखादी व्यक्ती रोजच जास्त वेळ काम करताना आढळली तर सरळ सांगतात 'इतका वेळ काम करत जाऊ नका, ते योग्य
नाही कारण त्यामुळे बाकीच्यांना प्रॉब्लेम होतो.' कामाला आणि कुटुंबाला देण्याचा वेळ
यात योग्य तो तोल (संतुलन) सांभाळण्यावर इथे खूप भर दिला जातो. तसेच स्त्री-पुरुष
व LGBT community त्यांच्यातील
समानता यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. इतकी की अनेक ठिकाणी बायका, पुरुषांकरिता
स्वच्छतागृह देखील एकच असतात. बायकांमध्ये प्रसाधने वापरण्याचं
प्रमाण देखील फारसे दिसत नाही.
काही वेळा ग्रोसरी स्टोअरच्या बाहेर
किंवा छोट्या ऑफिसच्या बाहेर pram
मध्ये झोपलेली बाळं दिसतात आणि बरेच तास ती तिथेच असतात. त्यांचे आई किंवा वडील हे आपली
कामे करण्याकरता
आरामात काही तास त्या ऑफिसमध्ये किंवा दुकानांमध्ये गेलेली आढळतात आणि हे इथे अगदी
सहज आढळून येते. मुलांचे डॉक्टरच सांगतात की बाहेरच्या हवेत, नैसर्गिक वातावरणात
मुलांना ठेवले पाहिजे. इथल्या थंडीची पण त्यांना त्यामुळे चांगली सवय होते. मुले पोहायला तर अगदी लहानपणापासून
शिकतात. त्याचबरोबर अनेक जण येथे मनोरंजनासाठी बोटिंग करताना दिसतात. तशीही इथे
व्यायामा बाबत बरीच जागरूकता दिसते. फार जाड लोक ही दिसत नाहीत.
अजूनही
बरंच काही सांगायचं राहिलंय. पण आता
ते पुढच्या भागात ..........
क्रमशः
नीना वैशंपायन
नीना एकदम मस्त लिहितेस ग..
ReplyDeleteमजा आली वाचून
ReplyDelete