सर्व जगभरामध्ये
सध्या COVID-19 म्हणजेच कोरोनाच्या साथीने धुमाकूळ घातला आहे.
या संबंधात अनेक नवनवीन माहिती जानेवारी २०२०पासून बाहेर यायला
लागली. चीनमधील बातम्या, फोटो, व्हिडिओज
बाहेर यायला लागले तेव्हा जग अशा समजुतीत होतं की या साथीची समस्या फक्त चीनमध्येच
आहे. पण नंतर अतिशय वेगाने सर्व जगात या विषाणूने आपले हातपाय पसरले.
फेब्रुवारीमध्ये इटलीत या विषाणूने भक्कम पाय रोवले. फेब्रुवारीच्या मध्यापासून
तिथे काही प्रांत under quarantine करण्यात आले. नंतर लवकरच
पूर्ण देशच लॉक डाऊनमध्ये गेला. युरोपमधल्या इतर देशांतही या विषाणूचा प्रभाव
वाढायला लागला.
इंग्लंडमध्येही या
सर्व बातम्या येतच होत्या. पहिला रुग्ण इथे ३० जानेवारीला सापडला. पण सरकारकडून
त्याची फारशी गंभीर दखल घेतली गेली नाही. अगदी २०/२२ मार्चपर्यंत लंडनमध्ये विमान, ट्रेन व जहाजांमधून आंतरराष्ट्रीय प्रवासी येतजात होते.
खरं तर १० फेब्रुवारीला Public Health Act च्या अंतर्गत
कोरोना संबंधाने एक कायदा पास करण्यात आला. त्यानुसार
हा व्हायरस public health करता भीतिदायक असून तो अजून पसरू
नये यासाठी संक्रमित व्यक्तीस isolation (अलगीकरण) मध्ये
ठेवलं जावं हा ठराव पास झाला. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना मात्र
दिसली नाही. परदेशातून आलेल्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्टरी विचारणं, त्यांचं तापमान चेक करणं, त्यांना काही लक्षणं आहेत
का याची चौकशी करणं, त्यांचे कॉन्टॅक्ट घेऊन दोन आठवडे
त्यांनी स्वतःला self quarantine करण्याची सूचना देणं
इत्यादी पावलं उचलण्याची गरज होती. त्याकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केलं.
मी आणि माझा नवरा
दोघंही २८ फेब्रुवारीला लंडनहून ट्रेनने ब्रुसेल्सला गेलो. तिथून जर्मनीला व नंतर
जर्मनीहून विमानाने ४ मार्चला लंडनला परतलो. पण आम्हाला कुठेही वर म्हटल्याप्रमाणे
चेक केलं गेलं नाही की विचारणा केली गेली नाही किंवा सूचना दिल्या गेल्या नाहीत.
असे अनेक प्रवासी २० मार्चपर्यंत लंडनमध्ये येजा करत होते. खरं तर फेब्रुवारीच्या
मध्यापासून तरी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास बंद करणं जरुरीचं होतं.
सुरुवातीला
इंग्लंडचं धोरण herd immunity तयार करणं
असं होतं. यामागची थिअरी अशी होती की जितक्या लवकर आणि जास्त लोकांना कोरोना
संक्रमित होईल तितक्या लवकर जनमानसात त्याच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होईल
आणि कोरोनाचा धोका कमी होईल. त्यामुळेच कुठलीही बंधनं इथे तातडीनं घातली गेली
नाही. मार्च महिन्यात सरकारला जरा जाग यायला लागली. Avoid non essential
travel & contact, avoid crowds & work from home if possible अशी खास ब्रिटिश खाक्यातली मुळमुळीत विनंती जनतेला करण्यात आली. कोरोनाची
लक्षण असलेल्यांनी घरातच self isolate व्हा, गरोदर बायका व ७० वर्षांच्या वरच्या वृद्धांनी घराबाहेर पडू नका, हात सतत धुवा इ. सूचना दिल्या जायला लागल्या. पण अजूनही London
tube (मेट्रोचे जाळे), बसेस व इतर सर्व काही,
अगदी शाळाही चालू होत्या. Restaurants, pubs, malls, theatre
सगळं अगदी गच्च भरलेलं होतं.
११ मार्चला WHO ने COVID -19 हे PANDAMIC घोषित केलं आणि इटलीमध्ये १५ मार्चपासून परिस्थिती भयानक व्हायला लागली
तेव्हा कुठे इथे सरकारला जाग आली. Herd immunity वाढवण्याच्या
अट्टहासावरती टीकेची झोड उठत होती आणि शेवटी २१ मार्चपासून पूर्ण लॉक डाऊनला
सुरुवात झाली. एक गोष्ट मात्र आवर्जून सांगाविशी वाटते की पंतप्रधान, आरोग्य मंत्री, अर्थमंत्री इ. रोज प्रेस कॉन्फरन्स
घेऊन दर दिवसाचा अपडेट मिडियासमोर सादर करत होते. पंतप्रधान बोरिस जॉन्सनच्या
प्रेस कॉन्फरन्समध्ये पहिला मुद्दा, ज्यावर सगळ्यात भर दिला
जात होता तो म्हणजे,"SAVE NHS". हे धोरण नक्की काय
आहे हे लक्षात यायला थोडीशी NHS ची माहिती करून घेणं जरुरीचं
आहे.
इंग्लंडमधील ९०%
जनता औषधोपचारासाठी सरकारी दवाखान्यात जाते. कारण आरोग्यसेवा तिथे सर्वांसाठी मोफत
आहे. खासगी डॉक्टरकडे व दवाखान्यात जाणं अत्यंत महागडं आहे. इंग्लंडमधल्या प्रत्येक
रहिवाशाला घराजवळच्या GP ( General practitioner) कडे नाव रजिस्टर करावं लागतं. सर्व डॉक्टर देखील NHS मध्ये रजिस्टर असतात. या GP ना अपॉइंटमेंट घेऊनच
भेटावं लागतं. त्यांनी रेफर केल्याशिवाय कुणालाही स्पेशलिस्ट डॉक्टरांना भेटता येत
नाही किंवा कुठल्याही lab test, X-ray इ. करता येत नाही. NHSची अत्यंत आधुनिक, अद्ययावत अशी हॉस्पिटल्स अनेक
ठिकाणी आहेत. त्यामुळे कोरोना साथीच्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी NHS
च्या कर्मचाऱ्यांवर आहे. यात सर्व तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, मदत कर्मचारी, सफाई
कामगार अॅम्ब्युलन्स वर्कर इत्यादी सगळ्यांचा समावेश होतो. NHS वर अति ताण पडू नये हे धोरण पहिल्यापासूनच इथे आहे.
पेंटींग: नीना वैशंपायन
याचं मुख्य कारण
म्हणजे जशी कोरोना पॉझिटीव्ह लोकांची संख्या वाढू लागली तशी सरकारला जास्त
तीव्रतेने जाणीव व्हायला लागली की NHS कडे
बाकी युरोपियन देशांप्रमाणेच इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण हाताळण्याची सवय वा
सोय दोन्ही नाही. पण दुर्दैवाने तो भार कमी करण्यासाठी जी पावलं वेळीच उचलायला
पाहिजे होती ती मात्र उचलली गेली नाहीत. आधीच्या मिळालेल्या वेळात जास्तीचे
हॉस्पिटल बेड्स व व्हेंटिलेटर्स, PPE, masks यांची व्यवस्था
करणं हे तरी युद्धपातळीवर करायला पाहिजे होतं. या गोष्टीचं गांभीर्य मुळात बोरिस
जॉन्सनने फारसं लक्षात घेतलं नाही. हॉस्पिटलमध्ये कोविड इन्फेक्टेड रुग्णांशी
हस्तांदोलन करून विदाऊट प्रोटेक्शन तिथे फिरण्यामध्ये तो स्वतःच या साथीचा शिकार
झाला. प्रिन्स चार्ल्स देखील कोरोनाने आजारी पडला. यावरूनच UK सरकारचा कारभार किती गलथान होता हे समजून येईल.
याचा परिणाम सामान्य
जनता भोगते आहे. Community spread झाला
आहे. कुठे, कुणाला, किती लोकांना
संक्रमण झालं आहे याचा काही पत्ता नाहीए. माझी नवीनच ओळख झालेली मैत्रीण
सुपरमार्केटमध्ये सामान आणायला गेली (लॉकडाऊनमध्ये) आणि ४ दिवसांनी कोरोनाच्या
लक्षणांनी आजारी पडली. वय वर्षं साधारण ३५ च्या जवळपास. इथे लगेच हॉस्पिटलमध्ये
येऊ नका असं सांगितलं गेलं आहे. NHS helpline ला फोन
केल्यावर तिची लक्षणं विचारून घेतली गेली आणि तिला घरातच एका खोलीत स्वतःला वेगळं
करून घे असं सांगितलं गेलं. फक्त कोमट पाण्याबरोबर पॅरासिटामॉल घेणं एवढंच काय ते
औषध. आठवड्याभरात जर breathlessness (श्वास घ्यायला त्रास)
वाढला तरच फक्त हॉस्पिटलला यायला सांगितलं. नाही तर फक्त फोन करून प्रगती कळवायला
सांगितलं. नशिबाने तिचा त्रास वाढला नाही आणि १५ दिवसांत ती बरी झाली. तिची
टेस्टदेखील केली गेली नाही. कारण एवढ्या टेस्ट किटच उपलब्ध नाहीत.
सुरुवातीला NHS च्या स्टाफची टेस्ट करायला देखील पुरेश्या टेस्ट किट्स
नव्हत्या. UK सारख्या प्रगत देशात अशी परिस्थिती असू शकते
यावर विश्वास बसणं कठीण आहे. बरेच डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर
स्टाफ मृत्युमुखी पडला आहे. NHS स्टाफचं समर्पण व त्याग,
कष्ट यांचा अत्यंत आदर केला जातोय इथे. दर गुरुवारी रात्री ८ वाजता
टाळ्या, थाळ्या, हॉर्न इ. वाजवून
त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. अनेक रेस्टॉरंट्स, दुकानं, कंपन्या त्यांच्यासाठी फ्री किंवा कमी दरात
वस्तू देत आहेत. सुपर मार्केट उघडल्यावर पहिला एक तास व बंद होण्याच्या आधीचा एक
तास फक्त NHS स्टाफसाठी राखीव ठेवला आहे. बस व ट्रेन प्रवास
फ्री केला आहे. हे आताचे इथले हिरो आहेत. त्यांना तसा सन्मान मिळतो आहे.
आजमितीला UK मधे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या लोकांची संख्या दीड
लाखाच्या आसपास आहे. जवळपास वीस हजारपेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाले आहेत.
दुर्दैवाने संक्रमण व मृत्यू झालेल्या लोकांमध्ये Blacks आणि
Ethnic minority community च्या बऱ्याच लोकांचा समावेश आहे. Ethnic
minority community मध्ये भारतीय, पाकिस्तानी,
बांगलादेशी, श्रीलंकन व अरब लोक येतात. हे
आकडे जास्त असण्याची काही कारणेही आहेत. उदाहरणार्थ बऱ्याच कुटुंबांत
आजी-आजोबांपासून नातवंडांपर्यंत सगळे एकत्र राहतात. किंवा हलक्या प्रतीची कामं
करणारी ७/८ कामगार पुरुष मंडळी एकाच घरात राहतात. लंडनमध्ये घरंही मुंबईसारखीच
लहान लहान. त्यामुळे त्यांचं social distancing होणं अशक्यच.
भारतीय लोक दररोज व्यायाम करणं, स्वतःचं वजन ताब्यात ठेवणं
इ.कडे इथल्या गोऱ्या लोकांप्रमाणे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये underlying
health conditions ( BP, diabetes etc.) जास्त प्रमाणात आहेत. शिवाय
या कम्युनिटीतील अनेक लोक NHS स्टाफमध्ये आहेत . भारतीय
डॉक्टर तर इतके आहेत की काय सांगू! त्यांचा अभिमानही वाटतो आणि दुःख पण होतं.
UK च्या
प्रगतीमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा बहुमोल वाटा आहे. परंतु अशा भीषण प्रसंगात
मात्र भारतीय वंशाच्या लोकांवर आलेल्या संकटाची, कठीण
परिस्थितीची सरकारने फारशी दखल घेतली नाहीए. त्यामुळे त्यांच्यात सरकारविषयी
अत्यंत नाराजी पसरली आहे. सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती इथेही चिंताजनक
आहे. लॉकडाऊनमुळे सगळ्यांचेच व्यवसाय बुडीत निघाले आहेत. पैसा साठवून ठेवणं ही
संकल्पना इथे फारशी नसल्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पुढचे सहा
महिने तरी लंडनची गाडी सुरळीत होणार नाही असं म्हणत आहेत.
इंग्लंडवरील संकट
योग्य प्रकारे हाताळलं असतं तर कदाचित इतकी वाईट परिस्थिती आली नसती. पण आता
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लॅबमधून आशेचा किरण येताना दिसतो आहे. तिथे
व्हॅक्सीनेशनची ह्य़ुमन टेस्ट चालू झाली आहे. प्रार्थना करूया की त्याला चांगले
अनुकूल यश लाभेल व सर्व जग या संकटातून मुक्त होईल.
mahiti purna and chan
ReplyDeleteChan lekh.. Abhyas karun lihila aahe lekh
ReplyDeleteSo many developed countries are in such a pathetic situation. Compared to that Indians are following rules very strictly. It's in control now in most states. Dense population is a big challenge. Nice information about NHS. Take care.
ReplyDelete