२१ जानेवारी २०२१ ला आमच्या कुमुदताईंचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले आणि
मित्रमंडळाचा एक भक्कम आधार नाहीसा झाला. मित्रमंडळाच्या स्थापनेपासून ते
आत्तापर्यंत त्यांनी मित्रमंडळासाठी अविरत काम केले. त्यामुळे मित्रमंडळ
परिवारातील प्रत्येकाला त्यांची अनुपस्थिती जाणवेल. बेंगलोरमध्ये नव्याने आलेल्या
मराठी मंडळींना आपलेसे करून त्यांना मित्रमंडळाचे सभासद बनवणे व त्यायोगे त्यांना
बेंगलोर मध्ये स्थिरस्थावर होण्यास मदत करणे, जाहिराती मिळवून मित्रमंडळाच्या कार्याला आर्थिक
हातभार लावणे, दरवर्षी न चुकता गणेशोत्सवात गणेश पूजनाची तयारी करणे,
मित्रमंडळाच्या सर्व मिटिंग्सना व कार्यक्रमांना हजर राहणे व शक्य असेल ती सर्व मदत
करणे इत्यादी इत्यादी. अशी त्यांनी केलेल्या कामांची लांब यादी होईल व हे सर्व
शांतपणे व गाजावाजा न करता करणे हे त्यांचे वैशिष्ट्य.
त्यामुळे त्या अनेकांच्या ताई
बनल्या. त्यांचे घर म्हणजे वर्षातल्या कुठल्याही दिवशी व दिवसातील कुठल्याही
वेळेला गेले तरी आपले हसतमुखाने स्वागत होईल असे सर्वांचे हक्काचे घर. घरी आलेल्या
कोणालाही स्वतः बनवलेला काहीतरी पदार्थ खायला घालणे ही त्यांची सवय व आवड.
त्यामुळे त्यांनी अनेक लोक जोडले. त्या खऱ्याखुऱ्या अन्नपूर्णा होत्या.
त्यांच्याकडे लोणची, पापड, मुरंबे, जाम इत्यादी त्यांनी स्वतः घरी बनवलेले असायचे.
पंधरा-वीस जणींची भिशी असो वा तीस-चाळीस जणांची मित्रमंडळाची मीटिंग असो, सर्वांना
त्या स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ खाऊ घालायच्या व हे सर्व हसत मुखाने व
उत्साहाने.
त्या कोणावर रागावून ओरडलेल्या वा
भांडलेल्या कधी ऐकलेच नाही. सर्वांशी मिळून मिसळून वागणे हा त्यांचा स्थायीभाव.
नीटनेटकेपणाने राहणे ही त्यांची खासियत. त्यांना जेव्हा कॅन्सर झाला हे कळले
तेव्हा कोणाचा त्यावर विश्वास बसला नाही, कारण रोज सकाळी त्या किमान पाच
किलोमीटर चालत असत. त्यांनी आपली देहयष्टी इतकी स्लिम ट्रीम व निरोगी ठेवली होती
की तरुणींना ही हेवा वाटावा. त्यांच्याकडे पाहून कोणालाही त्यांच्या वयाची कल्पना
येत नसे. त्या मनानेही खंबीर होत्या त्यामुळे
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरही त्यांनी विजय मिळविला.
त्यांच्या आठवणी मनात भरून येतात.
मला खात्री आहे की त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणाही व्यक्तीला त्यांच्याविषयी
फक्त चांगल्या आठवणीच येत असतील. सर्वांना जमेल तशी मदत करणे हा त्यांचा स्वभाव.
मला आठवते मित्रमंडळाच्या कार्यक्रमात कोणालाही नऊवारी साडी नेसवायची वेळ आली की
कुमुदताई हजर. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या त्या आवडत्या
होत्या. शेवटच्या आजारात त्या खूप अशक्त झाल्या होत्या व त्यांना खूप त्रास होत
होता. पण तरीही त्यांनी कधीही निराशाजनक उद्गार काढले नाहीत. कधीही आपल्या दैवाला
वा देवाला दोष दिला नाही.
१६ जानेवारीला मी त्यांना तिळगुळ
द्यायला गेले होते. त्यांना तिळगुळ देऊन नमस्कार केल्यावर त्यांनी तोंड भरून
आशीर्वाद दिला, मनापासून तिळाची वडी खाल्ली आणि चांगली झाल्याचे सांगितले व माझ्या
हातावर चार रेवड्या ठेवल्या. एवढ्या वेदना होत असतानासुद्धा त्यांनी मला हातावर
खाऊ ठेवल्याशिवाय जाऊ दिले नाही. आयुष्यात आलेल्या अडचणीच्या व कठीण प्रसंगांना
हसतमुखाने, मनात कटुता न ठेवता, धीराने व त्रागा न करता सामोरे कसे जायचे याचा
आदर्श त्यांनी घालून दिला.
असे ज्येष्ठ व ज्यांच्या पुढे नतमस्तक
व्हावे असे व्यक्तिमत्व दूरच्या प्रवासाला निघून गेले आहे, परत कधीही न
येण्यासाठी. त्यांना साश्रुनयनांनी
मनःपूर्वक श्रद्धांजली.
मनोरमा जोशी
खुप चांगले योग्य शब्दात मांडले...मनोरमाताई.... सगळ्ययांच्या भावना ना वाट करुन दिली ःः
ReplyDeleteराजणकर काकूंचा मायाळू स्वभाव कायम स्मरणात राहील.
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteअगदी योग्य शब्दात राजनकरकाकूंचे वर्णन केले आहे. त्यांच्या सहवासात नेहमीच उत्साह वाटायचा. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम होता. त्यांची त्रुटी भरून निघणे कठीणच.
ReplyDelete