💥 जगूया आनंदाने......२💥

 


Self-awareness- ( self - awareness )


जरा कानांना ऐकायला बोजड वाटते ना? माझा स्वभाव, इच्छा आकांक्षा,आवडी निवडी, मी कोणत्या गोष्टी समर्थपणे पेलू शकते? कोणत्या गोष्टीचा मला ताण येतो? मी कसा/कशी आहे याची माहिती. को हं?

आत्म-जागरुकता म्हणजे नेमके काय? मला माहिती आहे मी कसा आहे!!! वयानुसार, आपल्या भूमिकेनुसार आपण ज्या प्रसंगातून जातो, त्याचा नवीन अनुभव हा मी तयार करत असतो. आपला स्वभाव, क्षमता, कमतरता जाणिवा-उणीवा याची नव्याने ओळख करून घ्यायची. कालचा आणि आजचा मी ह्यात शारीरिक आणि मानसिक बदल झालेला असेल, त्याचा स्वीकार करायचा ही आत्म- जागरूकता.

माझा आनंद माझ्या हातात……..


स्वभाव आणि भावना ह्याचा विचार केला तर माझे स्वतःबद्दलचे मत, लोक काय म्हणतात वा म्हणतील यावर अवलंबून आहे का? एखादे काम मी पंचविशीत असताना अगदी लीलया करत असे. पण तेच काम करायला 'हो' म्हणताना आता मला विचार करावा लागतो का? ही जागरूकता. "मला जमेल असे वाटत नाही" हे वाक्य सहज येते का? माझ्यात झालेल्या ह्या बदलाला मी कसे स्वीकारते/तो? माझी आजची मते/भावना मी कशी व्यक्त करते/तो? आज घेतलेले निर्णय आणि त्याचे परिणाम यांची मी जबाबदारी मी स्वत: घेऊन सामोरे जाऊ शकते/तो ना? माझे विचार, वर्तन आणि भावना यात सुसंगती असली तर मी आनंदी असतो आणि आजूबाजूच्या वातावरणातही आनंद असतो.

जागरूकता येण्यासाठीचे पाळायचे पथ्य -

माझ्या स्वतःकडून/इतरांकडून असणाऱ्या अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती यात असणारी दरी. पूर्वी आणि आताचा स्वभाव, क्षमता, जाणीवा कमतरता यात सतत होणारी तुलना. यामुळे होणारी भावनांची गोंधळलेली अवस्था. ह्या सगळ्याचा डोळसपणे विचार. काही दिवसापूर्वी मी माझं काम सांभाळून पण माझे छंद, मित्र मंडळींना भेटणे सगळे जमवत होतो/ते. सध्या कामात इतका व्यस्त आहे की माझे आवडी निवडी छंद हे ही विसरायला झालेत याचे वाईट वाटते. वाईट वाटणे यात काहीच चुकीचे नाही. पण त्याचे कारण समजून घेतले तर आत्ता मी नवीन काही तरी करू शकतो का? हा सजगतेने केलेला विचार तुम्हाला प्रेरित करू शकतो.

 

'को हं?' हे एकदा माहित झाले तर मला बदलणे सोपे  जाईल किंवा दुसऱ्याला हा प्रश्न सोडवणे सोपे जाते. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधणे सोपे जाते. नातेवाईक, मित्र-परिवार, सहकारी यांच्यात सलोख्याचे संबंध राहू शकतात. दुसऱ्याचा त्याच्या बाजूने विचार करून एखाद्याला कसे वाटू शकते याबद्दल आपण सतर्क असतो. खास करून जेंव्हा आपण एखाद्या तणावाखाली असतो, तेंव्हा तो ताण व त्याची कारणे ओळखणे सोपे जाते. माझा आनंद हा माझ्यापुरता मर्यादित न राहता तो इतरांपर्यंत पोचतो. आणि जगणे एक प्रकारचा आनंद सोहळा होतो.....




Dr. Purva Ranade











1 comment:

  1. प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक वाटावा असा लेख.

    ReplyDelete