जगूया आनंदाने..भाग ३

 


Empathy - दुसऱ्याच्या भावना जाणून घेऊन त्या स्वतः अनुभवण्याची क्षमता.


Sympathy हा शब्द परिचयाचा आणि नकळत empathy ला पर्यायी वापरला जातो. सुरुवातीला दोन्हीत असणारा किंचित फरक समजून घेऊ. Sympathy वाटते तेंव्हा दुसऱ्याच्या भावना समजून घेता येतात. Empathy वाटते त्यावेळी दुसऱ्याच्या भावना आपण जणूकाही स्वतः अनुभवत आहोत अशी जाणीव होते. आपले म्हणणे दुसऱ्याने ऐकले/ गांभीर्याने घेतले पाहिजे अशी अपेक्षा असेल, तर ऐकणाऱ्यापर्यंत आपल्या भावना पोचणे महत्वाचे. अशावेळी बोलताना किंवा ऐकताना मध्ये मध्ये मनात येणाऱ्या विचारांना प्रयत्नपूर्वक विराम द्यावा लागतो. तेंव्हा दुसरा कोणती परिस्थिती अनुभवत आहे याची जाणीव होते. एका पायाने अधू असलेला/असलेली काठीचा आधार घेतो/घेते. तो/ती वर चढताना मदतीचा हात येतो. तेंव्हा त्या व्यक्तीला ती मदतीची, सहानुभूतीची गरज असेल असे नाही. पण त्या व्यक्तीला विचारून केलेली मदत ही नक्कीच त्या व्यक्तीचा स्वाभिमान जपेल.

 

दुसऱ्याच्या भावना जाणून घेऊन त्या स्वतः अनुभवण्याची क्षमता म्हणजेच Empathy. यातील प्रत्यक्ष शब्द इतका अर्थपूर्ण आहे की जर त्याची फोड करून सांगितले नाही तर empathy ह्या विषयाला न्याय मिळणार नाही. आपल्याला स्वतःचे विचार, वागणं, स्वभाव हे इतके परिचयाचे  आणि अंगवळणी पडलेले असते की दुसरा  हा आपल्यापेक्षा पूर्णतया वेगळं व्यक्तिमत्व आहे, ह्याचा विसर पडतो. त्याची विचार करण्याची पद्धती ही त्याला येणाऱ्या जगाच्या अनुभवावर आधारित असते. त्याच्या भावनेशी  निगडित असलेली त्याची संवेदनदनशीलता पण निराळी असते. कुणी go with the flow तर कुणी धीर गंभीर प्रवृत्ती आणि प्रकृतीचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. दुसऱ्याच्याभावना स्वतः अनुभवण्यासाठी आधी आपल्या भावना, सवयी, स्वभाव, मतं, विचारधारा यांना बाजूला करावे लागते. ही क्षमता  असण्यासाठी किंवा ती येण्यासाठी अगदी सोपी युक्ती आहे. ती म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं. त्यावेळी मनांत दुसरे विचार नकोत.

 


हे जीवन कौशल्य महत्वाचे का?, यासाठी दोन गुणांची नितांत गरज आहे, संयम आणि सहनशीलता. पूर्वग्रह दूषित मते तयार होण्याला इथे अजिबात थारा नाही. उलट प्रत्येक परिस्थिती ही अगदी वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघता येते, त्यावर विचार करता येतो हे मनात ठसवले पाहिजे. दुसऱ्याच्या भावना तेंव्हाच जाणून घेता येतील जेंव्हा स्वतःचे आपले विचार/भावना हे वेगळे ठेवता येतील. बाजूला सारता येतील. मग सरमिसळ होणार नाही. परिस्थितीप्रमाणे वागणे बदलते, हे समजणे मग सोपे जाते. चूक/बरोबर याचा खुलासा निरपेक्षपणे होतो.

 

काळजीपूर्वक विचार न करता एखादी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारणे किंवा निष्कर्षापर्यंत पोचण्याची घाई करणे, ह्या दोन्ही गोष्टी सहजपणे टाळता येतात. दुसऱ्याच्या चुका शोधण्यापेक्षा त्याच्या वागण्यामागचा कार्यकारण भाव समजतो.

 

एवढा अट्टाहास कशासाठी? Empathy वगैरे? एवढा वेळ कोणाला आहे? Sympathy सरळ वाटणारा रोजच्या वापरातला शब्द अमलात आणणं जास्त सोपे नाही का? सहानुभूती जरुरीची आहेच, माणुसकीला शोभणारी आहे. पण तरीही Empathy ताकदवर आहे. त्याचे अनुभवायला मिळणारे फायदे दूरगामी आहेत.

 

दुसऱ्याच्या भावनांचा अनुभव घेण्यासाठी त्याच्या बुटात जरूर शिरा, पण आधी आपले बूट काढायला मात्र विसरू नका हं……. हीच empathy हे समजले ना?

आता Critical Thinking या विषयी पुढील भागात.....

 

डॉ. पूर्वा रानडे




1 comment: