जगू या आनंदे ...भाग ५

Creative Thinking

आपल्या पैकी अनेकजण चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. त्यात ते खुश असतात. एखादी वस्तू आणि त्याचा वापर, ठराविक प्रश्न - ठरलेली उत्तरे हे इतके अंगवळणी पडलेले असते की त्यात फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. डोक्याला फारसा त्रास नसतो. ही चौकट ओलांडून वेगळा विचार करून बघायला आवडेल?

 

थोडक्यात Thinking out of the box. मेंदूला वेगळा विचार करण्याची सवय लावावी लागते. नाहीतर त्यावर कोरले गेलेले विचार आणि अनुभव यावर तो अवलंबून राहतो आणि त्याची वेगळा विचार/कल्पना करण्याची क्षमता सीमित राहते.

 


समजा वर्तमानपत्र असा शब्द सांगितला आणि विचारले की त्याचा उपयोग रोजच्या बातम्या वाचण्याखेरीज काय काय करता येईल? तुमच्या मनात काय काय येईल? घडी करून वारा घेता येईल, माश्या मारता/हाकलता येतील, मुलांना विमान, बोट/ओरिगामी बनवायला शिकवता येईल, कपाटातील कप्प्यात खाली घालता येईल वगैरे वगैरे

 

नवीन विचार म्हणजे काय? आणि कसा अंमलात आणायचा? याचे एक उदाहरण देते. प्लास्टिक हा शब्द जरी ऐकला तरी Reuse, Recycle हे चिन्ह डोळ्यासमोर उभे राहते. कापडी पिशवी हा एक पर्याय आपण सर्व जण कसोशीने पाळत आहोत. जास्तीची एक अजून पिशवी (छोटी घडी होणारी) पर्समध्ये ठेवायची. जर कोणी दुकानात पिशवी न घेता येणारा  पाहिला तर आवर्जून त्याला घेण्याची विनन्ती करायची. सहसा नाही म्हणत नाहीत. जे आपण करू शकतो ते मी करते आहे. हे मनाला समाधान मिळते.

 


Drawer ची हॅन्डल बाहेर येतात तेंव्हा घरात वाया गेलेले हेडफोन किंवा charger असतात, त्याची फक्त वायर वापरून रुद्रगाठी घालून चांगली पक्की हॅन्डल करता येतात. Reuse करता येते...... ही कल्पना विचित्र वाटतेय का? करुन पहा.

 

Creative thinking मुळे मेंदू सतर्क राहतो. मनात आलेली नवीन कल्पना पडताळून पाहण्याचे धाडस करता येते. यामुळे  प्रश्नांची उत्तरे नेहमीपेक्षा निराळी असू शकतात असा आत्मविश्वास येतो. आपली निर्णय घेण्याची कक्षा रुंदावते. परिणामांना सामोरे जाण्याची हिम्मत आणि ताकत दोन्ही आपोआप येते.

 

विचार - मग तो वस्तू वापराबद्दलचा असो किंवा प्रश्नाचे उत्तर असो. यात सहजी बदलाव आणायची लवचिकता येते. याचा फायदा स्वतःला असा होतो की दुसऱ्यांची मतं/विचार काय आहेत हे डोळसपणे पाहता येते. काळानुसार बदलणे अवघड जात नाही. एकांगी विचार होत नाही. मन आणि मेंदू सतत कार्यरत राहत असल्याने कंटाळा   जाऊन मनाला तरतरी येते. जगायला नवीन उमेद येते.

 

लहानपणी ऐकलेली गोष्ट - वर्गात बाईंनी गाय गवत खाते असे चित्र काढा असे सांगितले. एका मुलाने बाईंना कोरा कागद दाखवला . बाईंनी विचारले चित्र कुठे आहे? मुलगा म्हणाला, बाई, गाय गवत खाऊन निघून गेली. असंही असू शकतं / होऊ शकते हा वेगळा विचार पचनी पडतो.

 

एखादे काम करताना अथवा उत्तरांच्या शोधात असताना हटके विचार करण्याची सवय म्हणजेच Creative Thinking.


डॉ.पूर्वा रानडे



1 comment: