लॉक डाऊन आणि दो टकियाँ दी नौकरी



कोरोनामुळे झालेला लॉक डाऊन आणि त्याचे परिणाम या विषयावर खरंतर विचार करावा किंवा लिहावं तेवढं थोडंच. सुरुवात मी स्वतःच्या अनुभवापासून करते.
चौदा मार्चच्या वीकेंडला बऱ्याच मोठमोठय़ा कंपन्यांनी 'WFH' चे आदेश काढले. काही आयटी क्षेत्रातील कंपन्या सोडून दिल्या तर भारतात घरून काम करणे फारसे प्रचलित नव्हते. माझ्या कंपनीतील बरीचजण मुख्यत: Graphics and Videos वर काम करणारे सहकारी, डेस्कटॉपवर का़म करायचे. आपण घरातील जुनी कपाटं धुंडाळतो त्याप्रमाणे आम्ही अक्षरश: सगळं ऑफिस धुंडाळून या लोकांसाठी लॅपटॉप्स शोधून काढले. रोजचे काम नेमून देणे, झुमवरच्या मीटिंग्स वगैरे रुटीन सुरू झालं.

आजूबाजूची परिस्थिती बघता लोकांना आपल्याला नोकरी आहे आणि काम आहे ते टिकवले पाहिजे याचे महत्त्व कळले आणि सगळ्यांनी माना खाली घालून कामे करायला सुरुवात केली. कदाचित घरात झाडू पोछा करण्यापेक्षा ऑफिसचे काम बरे हा ही हेतू असावा. एकूण productivity वाढली निदान कमी तरी झाली नाही. पण हे गणित दिसते तितके सोपे नाही. घरात असलेल्या या सगळ्या व्यक्तींना सध्या घराबाहेर जाता येत नाही. उपाहारगृहे, चित्रपटगृहे सगळे काही बंद आहे. ही सगळी व्यवधानं उपलब्ध असतानाही याच दराने काम होऊ शकेल का हा मुद्दाही विचारात घेतला पाहिजे. मुळात भारतीयांची प्रवृत्ती बघता हे तसे सोपे नाही. भविष्यात या प्रकारे काम करायचे झाले तर बऱ्याच जणांनी आपली प्रवृत्ती बदलणे आधी गरजेचे आहे.

या सगळ्या काळात कठीण अवस्था झाली ती उच्चपदस्थ गृहिणींची. घरूनच काम करत असल्यामुळे ऑफिसच्या कामांना, फोन्सना तर काळवेळेचा कुठला धरबंधच राहिला नाही. संपूर्ण घरकाम करायचे, आणि घरातील मोलकरणी सुट्टीवर. वर्षानुवर्षे मोलकरणींची झालेली सवय एकदम सुटणे कठीणच. थोडक्यात ऑफिसमध्ये आणि घरात दोन्हीकडे परीक्षेचा एकदम आलेला काळ. कर्मचाऱ्यांचा ऑफिसमध्ये कामासाठी येण्याजाण्याचा वेळ वाचतोय ही बाब बऱ्याचशा कार्यालयांनी अतिशय सोयीस्करपणे वापरायला सुरुवात केली. यामुळे ऐशी टक्के लोकांचा कामाचा वेळ किमान तीस टक्क्यांनी वाढला आहे.

या सगळ्याला एक महत्त्वपूर्ण दुसरी बाजूसुद्धा आहे. गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे बऱ्याच जणांनी आपापली कामे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे अभिनव मार्ग शोधून काढले. उदा.  माझ्याच ऑफिसमध्ये काही विशिष्ट प्रकारचे काम करण्यासाठी खूप चांगल्या दर्जाचे संगणक लागतात. हे खूप महाग असतात. त्यामुळे हे सहकारी डेस्कटॉपवर काम करतात. पण घरून काम करताना आम्ही त्यांना नेहमीचे साधेच लॅपटॉप्स देऊ शकलो. सुरुवातीला वाटले की हा सहा सात जणांचा पूर्ण ग्रुप फारसे काम करू शकणार नाही. पण त्यावरही उपाय निघाला. आता हे सर्व सहकारी दिवसभर काम करतात आणि आपले काम सर्व्हरवर एका विशिष्ट प्रकारे सेव्ह करतात. एकच चांगल्या दर्जाचा कॉम्प्युटर रात्रभर या सर्व्हरवरून हे काम घेऊन प्रसिद्ध करत राहतो. नेहेमीच्या परिस्थितीत असे मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न कदाचित झालाही नसता.

कार्यालयात अजिबात न जाता फक्त घरून काम करणे हे जास्तीत जास्त ४० ते ५०%  लोकांनाच शक्य असते. त्यातले ही फक्त अर्धे सर्व प्रकारची कामे करू शकतात. healthcare, banking,  hospitality (restaurant, hotels etc), transportation, research, media, entertainment  अशा अनेक क्षेत्रांमधली बरीचशी कामे घरून होऊ शकत नाहीत. याशिवाय अतिशय महत्त्वाचा आहे तो भारतातला unorganized sector. यामध्ये येतात आपल्याकडे काम करणाऱ्या मोलकरणी, प्लंबर्स, ड्रायव्हर्स वेगवेगळ्या गोष्टी दुरुस्त करणारे लोक, बांधकामांवरील कामगार इत्यादी. यातल्या कुठल्याही लोकांना कुठलेही काम आपल्या घरून करता येत नाही. या सर्व लोकांना तरी आपापल्या कामाच्या ठिकाणी परत जाणे याला पर्याय नाही. आपण सारे घरून काम करत असताना जीवनावश्यक सुविधांवर काम करणारे हे सगळे लोक, सरकारी अधिकारी हे सगळेजण कामावर जात होते हे विसरून चालणार नाही.

जून सुरु झालाय. अपवादात्मक उदाहरणे सोडली तर आयुष्य पुर्वपदावर येऊ पहातंय. Unorganized sector मधली माणसे एक तर कामावर येऊ लागली आहेत किंवा आपापल्या गावी निघून गेलीत. त्यांचा प्रश्न वेगळ्या स्वरूपात समोर उभा राहणारच आहे. या घरून काम करण्याच्या लागलेल्या सवयीचा फायदा करून घ्यायचा झाला, तर बंगलोर सारख्या शहरात दररोज किमान वीस ते पंचवीस टक्के लोक घरून काम करू शकतील. मात्र त्यासाठी वीज, इंटरनेट कनेक्शन अशा मूळ व्यवस्था व्यवस्थित असणे गरजेचे ठरेल. त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे हा वेळ कामाचा आहे आणि त्या वेळेला कामच केले पाहिजे हे त्या व्यक्तीने व घरातल्या इतरांनीही लक्षात ठेवून जबाबदारीने वागायला शिकले पाहिजे.

थोडक्यात घरात राहूनही टीव्ही, दुपारची झोप याऐवजी घरकाम व दोन टकीयेकी नोकरी मॅनेज करायला कोरोनाने शिकवले आहे. हा धडा गिरवत राहून पुढे नेऊ या. हे जमले तर काही कर्मचारी वर्गाला घरून काम करण्याची सुविधा देण्यास काही कंपन्या नक्कीच तयार होतील आणि ती एका वेगळ्या युगाची नांदी ठरू शकेल.

गंधाली सेवक



1 comment:

  1. आव्हानात्मक परिस्थितीतही आपलं काम सुरू ठेवण्यासाठी अभिनव मार्ग शोधण्याचा अनुभव प्रेरक!

    ReplyDelete