गेले
पाच महिने या ना त्या प्रकारे घरात बंदिस्त व्हावं लागलं. अशी परिस्थिती खरंच ध्यानीमनी पण आलेली
नव्हती.
असं सुद्धा घडू शकतं यावर मात्र बळेच
विश्वास ठेवावा लागतो आहे. हा
विषय लिहायला घेतला कारण सोसायटीमधल्या महिला मंडळात निबंध स्पर्धेला हा विषय महिलांनी
व्यक्त व्हावं म्हणून दिला होता. त्या
स्पर्धेची मी परीक्षक आहे, त्यामुळे
त्यांचे निबंध वाचता वाचता अंतर्मुख झाले आणि विचार करू लागले.
या
अभूतपूर्व परिस्थितीत मी नक्की काय केलं आणि काय करणं अपेक्षित आहे याचा विचार सुरू
झाला.
सर्वात आधी स्वावलंबनाची कास धरावी लागली. कोणत्याही कामाला कोणत्याही प्रकारची
बाह्य मदत नाही,
त्यामुळे त्या पद्धतीने नियोजनही होऊ
लागलं.
मलाच करायचंय त्यामुळे वाट पाहणं संपलं. समोर येणारं काम संपवून टाकलं, तेही आनंदानं! त्यानंतर माझ्या छंदांना वेळ राखून ठेवला.
लॉकडाऊनमध्ये
भाजीपालाही तोच तोच येत होता. मग
त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करत जेवणाची लज्जत वाढवली. एका पालकाच्या जुडीतून विविध प्रकार अनुभवास
आले -
पातळ भाजी, कोरडी भाजी, भजी, पचडी, पराठे...एकही गोष्ट वाया जाणार नाही याची पुरेपूर
खबरदारी घेतली गेली.
जे मिळतंय ते ईश्वरी कृपेने यावरचा विश्वास दृढ झाला. जरासं घराबाहेर डोकावलं की जाणवत होतं, कित्येकांची हातातोंडाची गाठ पडणंही मुश्कील झालंय. माझ्याबरोबरच माझ्या पार्टनरनेही घरकामाची
जबाबदारी खंबीरपणे पेलून सहजीवन समृद्ध बनवलं. घरकाम हे फक्त बाईचंच असतं हे खोटं ठरवून
टाकलं;
माझ्यावरचं कामाचं दडपण हलकं झालं. अर्थात हे झालं 'मी' आणि 'माझं '... जे सकाळ-दुपार-संध्याकाळ पोटाची खळगी भरण्यासाठी चालूच
होतं.
तरीही मनात एक अस्वस्थता दाटून येत होती; ती कशाची काहीच कळत नव्हतं.
मला
या 'स्व'च्या पलीकडे काम करण्याची ही संधी होती. कोणी मसाज करणारं, धंदा बंद...कोणी ब्युटी पार्लर चालवणारी, तिचं भाडं थकलं...कोणी जेवू घालतंय... कोणी गावोगावीच्या मुलांसाठी ऑनलाईन अभ्यासवर्ग बनवतंय...काहींचे रोजच्या खर्चाचे वांधे झाले... जिथून बातम्या येत होत्या तिथे यथाशक्ती
मदतीचा प्रयत्न केला.
भाजीवाला, पेपरवाला, दूधवाला यांची सेवा घरबसल्या घेताना त्यांच्या
कष्टांची जाणीव जास्त प्रकर्षाने झाली. कचरा
उचलणाऱ्या सर्व कामगारांनी जी मेहनत घेतली ती तर आत्मपरीक्षणाचीच गोष्ट होती.
त्यांच्यामुळे
परिसर स्वच्छ राहिला.
माणसं बाहेर कचरा ठेवला तर तुमच्याच कचऱ्याच्या डब्याने किंवा पिशवीने आलेले ओघळही पुसत नाहीत! ही कचरा उचलणारी माणसं मात्र त्यांची सेवा
अखंडपणे देत राहतात. त्यासाठी कचरा नीट वेगळा करणं, प्लॅस्टिक कमी वापरून निसर्गाचा ऱ्हास
थांबवणं,
आपली सोसायटी, बिल्डींग-पॅसेज स्वच्छ ठेवणं हे तरी मला जमायलाच
हवं ना!
आजही घरी जाऊन भाज्या वेगळ्या करायचा
त्रास नको म्हणून प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या पिशव्यांतच भाज्या घेणारे कमी नाहीत.
हा
वेळ माझं काही चुकलंय का किंवा ही परिस्थिती खरंच का आली असावी याबाबत विचार करण्यासाठी आहे असं मला वाटतं. संपूर्ण सृष्टी फुललेली आहे, नद्या वहात आहेत, पक्षीगण किलबिलत आहेत, सूर्यनारायण प्रकाशत आहेत, फक्त माणूस बंद आहे... का बरं असा घडलं असेल? देवांनीही दार बंद करून घेतलं आहे. निसर्ग चांगलाच कोपलाय हे मात्र नक्की! यासाठी मी माझ्यापुरता प्रश्न सोडवायचा
म्हटलं तर तो कसा आणि मी नक्की काय करायला हवं याचा विचार मी सुरू केला.
आज
घातलेला एक आणि धुतलेला एक ड्रेस पुरायला लागला. भाज्या ज्या मिळत आहेत त्याच आवडायला लागल्या. हॉटेल संस्कृती बंद पडल्याने घरचा आणि
सात्विक आहार पोटात जाऊ लागला. त्याचा
परिणाम म्हणून आजारपणं दूर पळाली. घरच्या
अन्नाचा प्रत्येक घास सोनं वाटायला लागला. एक वेगळंच समाधान वसतीला आलं. माझी भक्ती देवळातल्या मूर्तीप्रती होती
का? हा विचार मनात डोकावला आणि त्याचं उत्तर 'नाही' आलं. त्यामुळे अडचणीत असलेल्या माणसातला देव
शोधता आला.
त्याची सेवा हीच भक्ती हे मात्र नक्कीच
पटलं.
भगवंताला हेच हवंय याची खात्री पटली. माझ्यातली सकारात्मकता जागृत राहिली ती
या पद्धतीने विचारधारा
सक्रिय केल्यानेच!
माझ्यासाठी
लॉकडाऊन
ही
तर एक संधी
'मी-माझं' देत सोडून
करू
दुसऱ्याचा विचार आधी
सारखं
काय हे अन ते हवं
थोडी
घ्यावी तसदी अन मदतीला धावावं ....
असं
हे लॉकडाऊन कधी संपेल...
कोरोना जाईल का राहील... औषध निघेल का नाही हे असे न कळणारे प्रश्न विचारून डोकं शिणवून घेण्यापेक्षा हातात
येईल ते काम सामाजिक असो, घरचं
असो, दारचं असो, स्वतःचं असो, दुसऱ्याचं असो, करत राहणं एवढंच माझ्या हातात आहे हे
समजलं.
माणसाची
गरज किती कमी आहे आणि त्याची साठा करायची वृत्ती किती जबरदस्त आहे हे या काळाने पाहायला
शिकवलं.
ज्याची काहीच गरज नाही अशा गोष्टींपाठी
पण माणूस हव्यासापोटी धावतोय हे पाहून मन खिन्न झालं.आणि वाटून गेलं, या लॉकडाऊन नंतरचा माणूस किंचित का होईना
बदललेला असेल का असाच असेल?
जरा
विचार करूया...
बदलायला हवंय का नाही? तुम्हाला काय वाटतंय?
ऊर्मी
उदय निवर्गी
गेल्या पाच महिन्यांपासून अनुभवत असलेल्या परीस्थितीचा ओघवता आढावा. 'सेवा हीच भक्ती' हा विचार अत्यंत योग्य. विचारी आणि विचारनीय लेख ... कट्ट्यावर नवीन लेखिका. अशाच लेखांच्या अपेक्षेत.
ReplyDeleteखरंय.... लाँकडाऊनने खूप काही शिकवलं.... गरजा तर आपण किती वाढवल्या होत्या त्याची प्रकर्षाने जाणीव झाली. कष्टाची सवय लागली.... असे खूप काही....
ReplyDeleteखूपच छान लेख.... आढावा त्या परिस्थितीचा...
धन्यवाद...
खरंय.... लाँकडाऊनने खूप काही शिकवलं.... गरजा तर आपण किती वाढवल्या होत्या त्याची प्रकर्षाने जाणीव झाली. कष्टाची सवय लागली.... असे खूप काही....
ReplyDeleteखूपच छान लेख.... आढावा त्या परिस्थितीचा...
धन्यवाद...
लेख खूप छान लिहिला आहे. माणसांना माणसांची किंमत कळली ह्या लॉक डाऊन मुळे कळली हेही नसे थोडके.
ReplyDelete