अक्षरांची वाहिली फुले,
शब्दांची गुंफली माळ,
ठेका धरी हृदय,
जसे मृदंग आणि टाळ……
जसे मृदंग आणि टाळ,
वाजती विठ्ठल नामात,
मुखी गायिले भजन,
विठु माऊलीच्या प्रेमात…..
विठु माऊलीच्या प्रेमात,
रात्रं दिन जागे,
नाचती पावले तालात,
एक पुढे एक मागे…..
एक पुढे एक मागे,
जणू चैतन्य सळसळे,
तुझे रूप पहाण्यास,
आतुर झाले डोळे…..
आतुर झाले डोळे,
वाहती अश्रूंच्या सरी,
हात जोडिले विठुराया,
मज नको लोटू दूरी…..
मज नको लोटू दूरी,
अज्ञानी असेन मी जरी,
तूच माझा माय बाप,
मस्तक ठेविले चरणावरी…..
मस्तक ठेविले चरणावरी,
तुजविण कोण मज तारी,
माझे काही न उरले,
जीवन झाले वारी…..
जीवन झाले वारी,
नित्य घडो सेवा,
स्वानंदाची ही वाटचाल,
अशीच चालू दे देवा…..
(या प्रकाराला दाम यमक असे म्हणतात. एका कडव्याची शेवटची ओळ दुसऱ्या कडव्याच्या सुरवातीला आहे.)
प्राजक्ता पाठक
सुरेख कविता, दाम यमक हा कवितेतला प्रकार पहिल्यांदाच कळला. धन्यवाद.
ReplyDeleteछान कविता, आपोआपच सुरात वाचली जाते. दाम यमक मस्त
ReplyDeleteलयबद्ध कविता . अप्रतिम
ReplyDeleteनवीन प्रकार कळला.फारच सुंदर.
ReplyDelete