मधले पान


कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

ह्या वेळचा मे महिना खरोखरच धामधुमिचा गेला. पण निवडणूक आणि त्यांचे निकाल याव्यतिरिक्त ही अनेक गोष्टी घडल्या. त्यांची नोंद करणे आवश्यक आहे.

आरोही पंडित (source: Google)

सर्वात प्रथम आरोही पंडित हिचे मनापासून अभिनंदन !!!! मुंबईची रहिवासी असलेली आरोही पंडित ही लाईट स्पोर्टस् एयरक्राफ्टमधून अटलांटिक महासागर पार करणारी पहिली महिला बनली आहे. एकूण ३००० किलोमीटर्सचा प्रवास तिने ह्या छोट्या विमानातून एकटीने केला. तिचे मन:पूर्वक अभिनंदन!!!!! तिच्या ह्या चित्तथरारक प्रवासासंबंधी बरीच माहिती देता येईल. मात्र त्यासाठी एक वेगळा लेखच लिहावा लागेल.

भारतातील सिंगल मॅाल्ट व्हिस्कीचे निर्माते नीलकांत जगदाळे यांचे नुकतेच निधन झाले. जागतिक लौकिकास पात्र ठरलेल्या त्यांच्या व्हिस्कीचे नाव 'अमृत' असे होते. ही व्हिस्की बनवण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. भारतातल्या रुद्राक्ष संस्कृतीत जन्मास येऊन पाश्चात्त्यांच्या द्राक्ष संस्कृतीत नाव काढणे हे अवघड आव्हान त्यांनी पेलले. त्यांची कहाणीही रोचक अशीच आहे. प्रेरणादायी आहे. एखाद्याने ठरवले की तो अडचणींवर मात कशी करतो हे उदबोधक आहे.

३ मे रोजी राज कपूरचा प्रसिद्ध आर. के. स्टुडिओ हा विकला गेला. ह्या व्यवहाराने जरी राज
source: Google 
कपूरच्या मुलं-नातवंडांना खूप पैसे मिळणार असले तरीही पुढच्या पिढीत राज कपूर सारखा प्रतिभावान कोणीही निपजला नाही हे ही तेवढेच खरे. ३ मे हा नर्गिसचा स्मृतिदिन. एक चक्र पूर्ण झाले असे मला वाटले. ह्या स्टुडिओत नर्गिसजींची पण खूप मोठी भावनिक गुंतवणूक होती. पण जेव्हा यातील फोलपणा त्यांना जाणवला, तेव्हा त्यांनी राजजींची साथ सोडली आणि आपले आयुष्य वेगळ्या दिशेने नेले. राज कपूर हे सिनेमात जरी अगदी निरागस, अडाणी माणसाच्या भूमिका करत असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात ते तसे नव्हते हे ही तितकेच खरे. असो. हिंदी चित्रसृष्टीचा इतिहास ह्या वास्तुशी जोडला गेला होता. ही वास्तू आता काळाच्या पडद्याआड गेली याचे सिनेरसिकांना नक्कीच दु:ख झाले असणार.

Mumbai Indians IPL winners (source: Google)

IPL मधील अनेक सामने थरारक झाले. आणि ह्या स्पर्धेचा शेवटही अगदी रोचक झाला. शेवट्च्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंगला हरवले.

Shri Narendra Modi: Watercolour painting by Satish Karve

IPL प्रमाणेच आपल्या निवडणुका ही थरारक झाल्या. अनेकांच्या मते मोदी आणि भाजप बहुमताच्या जवळपास जाणार नव्हते. पण ह्या सगळ्यांना धोबीपछाड देऊन भाजपने विक्रमी मते आणि बहुमत मिळवले. आपल्या देशांत हा एक नवा अध्याय सुरु झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. आणखी एक गोष्ट ह्या निवडणुकीत जाणवली. प्रचाराच्या बाबतीत अनेकांनी आपली मर्यादा सोडली. ह्यात ममता दीदी ह्या अग्रेसर होत्या. त्यांच्या राज्यातही सर्वाधिक हिंसाचार निवडणुकी दरम्यान झाला.

नायर रुग्णालयात डॉ.पायल तडवी हिची दुर्दैवी आत्महत्या ही देखील समाजाचा एक भेसूर आरसा दाखवते. आरोही पंडित हे जसे आजचे उज्ज्वल वास्तव आहे, तसेच डॉ.पायलची आत्महत्या हे देखील दु:खद वास्तव आहे.

वाचकांनी ह्या साऱ्याच गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा. 'मधले पान' लिहून संपवतानाच एका वृत्त वाहिनीने 'सावरकर हे नायक की खलनायक' ह्या नावाचा एक कार्यक्रम त्यांच्याच स्मृतीदिनी केला. ह्या कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. कारण कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाची, देशभक्ताची अशी मरणोपरांत चिकित्सा करणे हे शोभादायक नाही. स्वातंत्र्याचा असा गैरवापर एका वृत्त वाहिनीने करावा हे दुर्दैवी आहे.

आज इतकेच.

स्नेहा केतकर

1 comment:

  1. Thanks for publishing my watercolor painting of Our PM. Shri Narendraji Modi. Also different subjects has been covered in this magazine.

    ReplyDelete