कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक
असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.
ऑगस्ट
महिन्याची सुरुवात अयोध्येतील श्रीरामप्रभूंच्या मंदिराच्या भूमिपूजनाने झाली.
गेल्या कट्ट्यात लिहिल्याप्रमाणे पंतप्रधान मोदीजींनी ही पूजा केली. ह्या प्रसंगी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री.मोहन भागवत ही हजर होते. सर्व समारंभ
हा अतिशय संयतपणे पार पडला. मोदीजींनी केलेले भाषणही, श्रीरामाचे भारतीयच नव्हे तर
पूर्ण दक्षिण आशियातील महत्व दाखवून देणारे होते. अनेकांनी ह्या समारंभाच्या
निमित्ताने वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मागमूसही तेथे जमलेल्या
कोणाच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हता. सध्या असलेल्या
सर्व अटी-नियम यांचे काटेकोर पालनही करण्यात आले.
५ ऑगस्टला काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले त्याला एक वर्ष पूर्ण झाले. काश्मीरमधील
सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ५ ऑगस्ट २०१९ च्या आधीची स्थिती परत आणावी,
थोडक्यात ३७० कलम पुन्हा लागू करावे अशी मागणी केली आहे. हे घडणे आता कठीणच आहे पण अजूनही काश्मिरी नेते चाचपडत आहेत हेच
यातून दिसते. काही ठिकाणी भाजपच्या काही सरपंचांची हत्या करण्यात आल्याच्या
बातम्या येत आहेत. काश्मीरमध्ये अनेक पायाभूत सुविधांची कामे जोरात सुरु आहेत.
एकूण ह्या विकासकामांची जनतेत नोंद होऊन, स्थिती सामान्य व्हायला वेळ लागणार हे
नक्की.
गेल्या महिन्याच्या शेवटी नवे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. जवळजवळ ३४
वर्षांनी सर्व समावेशक असे हे नवे धोरण आले याचे साऱ्यांनी स्वागत केले.
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकासाला महत्व, मुलांना व्यवसायाला उपयुक्त
असे शिक्षण असे अनेक बदल यात सुचविण्यात आले आहेत. संशोधनाला ह्यात खास प्राधान्य
देण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यात रंगलेले राजस्थान काँग्रेस नाट्य संपले. काहीही तोडफोड न होता
हा वाद सामोपचाराने मिटला हे महत्वाचे. पण गेले दोन-तीन दिवस काँग्रेस मधील २३
सदस्यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्राने परत माध्यमातून चर्चेला उधाण आले.
खरेतर ह्या चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. कारण गांधी घराण्याची मक्तेदारी मोडून
काढण्याची एकाही नेत्याची ताकद नाही हे आता सिद्ध झाले आहे. मात्र यामुळे
भारताच्या राजकारणात प्रभावी विरोधी पक्ष नाही ह्याची उणीव जाणवते. गेल्या दोन
दिवसांत बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेण्यात आली. त्याला सोनिया
गांधी ही हजर होत्या. JEE आणि NEET ह्या परीक्षा रद्द कराव्यात/पुढे ढकलाव्यात
यासाठी आणि इतरही काही मुद्द्यांवर ह्या बैठकीत चर्चा करण्यात आली. परीक्षा अजून
किती दिवस पुढे ढकलणार हा महत्वाचा प्रश्नच आहे. कालच सुप्रीम कोर्टाने परीक्षा न
घेता पदवी दिली जाणार नाही हा निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील युवासेना परीक्षा न
घेण्याच्या मताची होती. पण आता राज्यशासनाला परीक्षा घ्याव्या लागणार आहेत हे
स्पष्ट आहे.
१५ ऑगस्टला आपण आपला ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. ह्या वेळी लाल
किल्ल्यावरून गरीब महिलांना अतिशय कमी किंमतीत सॅनिटरी पॅडस् उपलब्ध करून देण्याची
घोषणा केली. महिलांच्या आरोग्याचा हा मुद्दा इतक्या ठळकपणे पंतप्रधानांनी मांडला
ह्याचे समस्त महिलावर्गाला कौतुक वाटले. नेहमी बंद दाराआड कुजबुजत बोलण्याचा हा
विषय किती महत्वाचा आहे हेच त्यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर आरोग्य कार्ड
देण्याची घोषणा ही त्यांनी केली. ह्यामुळे प्रत्येकाची आरोग्यविषयक माहिती ह्या
कार्डात एकत्रित रित्या सुरक्षित ठेवली जाईल. शहर बदलले तरीही नव्या डॉक्टरांना
ह्या माहितीद्वारे पेशंटवर उपचार करणे सोयीचे होईल.
प्रशांत भूषण |
सध्या कायदेतज्ञ प्रशांत भूषण हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर सर्वोच्च
न्यायालयाने अवमान खटला - contempt of
court लावला आणि त्यात त्यांना दोषी म्हणून जाहीर केले आहे. जनहित याचिका आणि
प्रशांत भूषण ही नावे एकत्रच उच्चारली जातात. अनेक जनहित याचिका त्यांनी कोर्टात
दाखल केल्या आहेत. ह्यावर अनेक मते जिज्ञासू वाचकांना अनेक माध्यमातून
वाचायला/पाहायला मिळतील. प्रशांत भूषण हे सतत कोर्टावर टिप्पणी करण्यात अग्रेसर
असतात. त्यांच्या मनासारखा निकाल लागला नाही की न्यायाधीश हे भ्रष्ट आहेत असेही
सूचित करतात. एकूणच हा खटला त्यांनी एकप्रकारे स्वतःवर ओढवून घेतला आहे. आता
सर्वोच्च न्यायालय त्यांना काय शिक्षा ठोठावते हे पाहायचे.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती १५ ऑगस्टला जाहीर केली आणि
अनेक चाहते हळहळले. धोनी हा असा एकमेव कप्तान जो तिन्ही स्पर्धात (T-20, one day
and test match) भारताला प्रथम स्थानावर घेऊन गेला. अत्यंत समतोल वृत्तीचा हा
खेळाडू!!! भावनांचे प्रदर्शन त्याच्याकडून कधीही मैदानात घडले नाही. जिंकला तरीही
उन्माद नाही आणि हरला तरीही आक्रोश नाही. त्याचा निर्धार मात्र त्याच्या
देहबोलीतून जाणवायचा. सौरभ गांगुली सारखाच हा जिगरबाज कप्तान होता. लहानांपासून ते
प्रौढांपर्यंत साऱ्यांचाच तो लाडका होता. उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणूनही त्याची
इतिहासात नोंद होईल.
पंडित जसराज |
इब्राहिम अल्काझी |
ह्या महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर ही अनेक घडामोडी घडल्या. आया सोफिया नंतर
तुर्कस्तानातील अंकारा येथील एका प्राचीन चर्चचेही मशिदीत रुपांतर करणात आले आहे.
रशियातील पुतीन यांच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या नावाल्नीवर विषप्रयोग करण्यात
आला आहे असे
वृत्त आहे. बेलारूस ह्या पूर्व युरोपातील देशांत ही लोकशाहीचा
खेळखंडोबा करण्यात येत आहे. १९९४ पासून सत्तेत असलेल्या लुकाशेन्को ह्यांनी
निवडणुका घेतल्या पण विरोधकांना तुरुंगात डांबून स्वतः जिंकल्याचे जाहीर केले.
ह्या देशांत लोकशाही कधी रुजेल हे सांगता येत नाही.
नावाल्नी |
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली
आहे. कमला हॅरिस ह्या आतास डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार
म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. गौरेतर आणि महिला अशा दुहेरी रीतीने त्यांची
निवड महत्वाची ठरते. त्यांचा आजवरचा प्रवास हे अमेरिकी व्यवस्थेचे यश आहे हे
निश्चित. पण आजही कृष्णवर्णीयांमधील असंतोष, संकुचित राजकारण हा अमेरिकन
राजकारणाचा भाग आहे हे नाकारून चालणार नाही. त्यांच्या उमेदवारीने कोणती समीकरणे
बदलतील हे बघायचे.
लेबेनॉनची
राजधानी बैरुतमध्ये बंदरात साठवून ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटच्या गोदामाला आग
लागल्यामुळे मंगळवारी सायंकाळी झालेल्या प्रचंड स्फोटाच्या धगीत हे शहर अक्षरशः भाजून निघाले. हजारो जखमी आणि बेघर
झाले आहेत. मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. ह्या स्फोटाची तीव्रता भयानक होती.
२०१३ मध्ये लेबेनॉनच्या
अधिकाऱ्यांनी जॉर्जियाहून मोझांबिकला अमोनियम नायट्रेट घेऊन जाणारे एक जहाज बैरुत
बंदराजवळ अडवले आणि त्यातील माल जप्त केला. तेव्हापासून बंदरातील एका गोदामात
अमोनियम नायट्रेटचा हा प्रचंड साठा साठवून ठेवण्यात आला होता. बैरुतमधील बंदरे आणि सीमा शुल्क विभागाने हा साठा इतरत्र
हलवण्याविषयी स्थानिक प्रशासन आणि न्याय विभागाला वारंवार लिहूनही काही झाले नाही.
सरकारची ही अनास्था आणि निष्काळजीपणाच ह्या स्फोटाचे कारण आहे. ह्या स्फोटामुळे लोकांचा संताप ही अनावर झाला आहे.
ह्या संतापाच्या भरातच देशाचा व्यवहार पुन्हा फ्रांस सरकारकडे द्यावा अशा
तऱ्हेच्या मागण्या होत आहेत.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ सदस्य श्री.प्रणव
मुखर्जी यांचे आज निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी positive आली
तरी मेंदूतील गाठीवर शस्त्रक्रिया केल्यापासून ते कोमातच होते. आर्मी रुग्णालयात
त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या
जाण्याने देशाने एक कर्तृत्ववान राजकारणी गमावला आहे.
असो, आता थांबते.
Perfect as usual
ReplyDeletev well covered
ReplyDeleteधावता आढावा म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण...
ReplyDeleteमधले पाल तुझे नेहमीच छान असते
ReplyDelete