मधले पान


कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.


या महिन्यात पुलवामा, बालाकोट हल्ल्यावर काही लिहिणार नाही मी 'मधले पान' मध्ये. कारण यावर आता अनेक जणांनी इतके लिहिले आहे, की नविन काही लिहिणे शक्यच नाही. पण विरोधी पक्षांनी सरकारवर पुलवामा हल्ला घडवून आणला असा आरोप केला आणि बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागितले. हे सगळे वाचून, पाहून, मन विषण्ण झाले. विरोध करतानाही काही तारतम्य बाळगायचे असते, हे कोणी कोणाला सांगायचे हा मोठाच प्रश्न आहे.
आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकशाहीचा हा जगातील सर्वात मोठा उत्सव, जो आपल्या देशांत साजरा होतो, याचा सार्थ अभिमान सगळ्यांनाच असायला हवा. अर्थात सध्या what's app वर अनेक मजेशीर मेसेजेस फिरत आहेत. कारण सध्या लोकसभेच्या तिकिटासाठी इतकेजण पक्ष बदलत आहेत, की सामान्य नागरिकाला गोंधळात पडायला होत आहे. 

नक्की कोण कुठल्या पक्षात होता? कुठल्या पक्षात जाणार आहे ..... याबाबत सगळेच गोंधळात आहेत. हा गोंधळ काही दिवस तरी असाच चालणार बहुधा.
प्रत्येक सजग नागरिकाने मतदानाचा हक्क प्रत्येकच निवडणुकीत बजावावा असे आवाहन आम्ही कट्टा टीमतर्फे करत आहोत. 

मनोहर पर्रीकर यांचे निधन हा भाजपला निवडणुकीच्या आधी बसलेला मोठाच धक्का होय. ते आजारी होते, त्यांना कॅन्सर झाला होता हे खरे असले, तरी त्यांच्या जाण्याने अनेकांचे डोळे ओले झाले हे नक्की. 
सामान्य कार्यकर्त्यापासून ते भारताच्या संरक्षण मंत्रिपदापर्यंत त्यांचा प्रवास हा खरोखर अचंबित करणारा आहे. IIT येथून शिकलेले भारतातले ते पहिले मुख्यमंत्री आणि पहिले संरक्षण मंत्री होते. त्यांच्यासारखे अनेक शिकलेले आणि प्रामाणिक नेते राजकारणात पुढे येण्याची गरज आहे. गोव्यावर त्यांचे मनापासून प्रेम होते. कट्टा टीमतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!!

एक मजेशीर बातमी गेल्या महिन्यात वाचनात आली. मुंबईतील एका तरुणाने आपल्या आई-वडिलांवर, त्याला न विचारता जन्माला घातले म्हणून केस ठोकली आहे. हल्ली Anti natalism (याला मराठीत काय म्हणतात बरं? कल्पना नाही) अशी एक विचारसरणी तरुण पिढीत वाढलेली दिसते. एकूणच जगाची लोकसंख्या वाढत असताना, पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असताना अजून अधिक मुलांना जन्म देणे हे योग्य नाही, असे या विचारसरणीचे पुरस्कर्ते म्हणतात.

याचप्रमाणे MINIMALISM म्हणजे कमीत कमी गोष्टीत जगायचा प्रयत्न करणे ही चळवळ देखील जोमाने वाढताना दिसते. चंगळवादाला आळा घालणे, स्वतःच्या गरजा कमी ठेवणे हा मुख्यत्वे या विचारसरणीचा उद्देश आहे. आकाश अंबानीच्या लग्नाचे व्हिडीओ पाहिल्यावर minimalist विचारसरणी पटायला लागते हे नक्की.

IPL ची सुरवात झाली आहे. यापुढचे काही दिवस कोण जिंकणार, कोण हरणार अशा चर्चा रंगतच राहणार. आता कोण क्रिकेटबद्दल बोलतंय आणि कोण निवडणुकीबद्दल सांगत आहे हे सुज्ञांना संदर्भासहित ओळखावे लागेल.
जागतिक राजकारणात बालाकोटचा हल्ला झाल्यावरही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना इस्लामी देशांच्या संघटनेत भाषण करायला मिळाले, हा भारताचा राजनैतिक विजयच मानावा लागेल. या संघटनेवर पाकिस्तानने दबाव आणूनही स्वराज यांना दिलेले आमंत्रण रद्द केले गेले नाही, त्यांचे भाषण रद्द केले नाही हे विशेष!
ब्रेक्झिटबद्दल ब्रिटीशांच्याच संसदेत सध्या एकमत होत नाहीये. युरोपीय महासंघातून ते कोणत्याही कराराशिवाय निघणार की काय असे अनेकांना वाटत आहे. एकेकाळी सूर्य न मावळणाऱ्या ब्रिटीश साम्राज्यातून आता स्कॅाटलंड आणि उत्तर आयर्लंड देखील बाहेर पडतील की काय अशी भीती वर्तवली जात आहे. 
याच महिन्यात १३ एप्रिलला जालियानवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षे पुरी होत आहेत. अशावेळी ब्रिटीशांचे युरोपातील सामर्थ्यही कमी होणे हा एक काव्यात्म न्याय आहे असे म्हणायला हरकत नाही. १०० वर्षांपूर्वी समृद्धी आणि सामर्थ्य यामुळे उद्दाम बनलेले ब्रिटीश साम्राज्य आता पूर्णपणे खिळखिळे झाले आहे. भारत प्रगतीच्या उंबरठ्यावर असताना हा विरोधाभास अधिकच उठून दिसत आहे.

अंतरीक्ष महाशक्ती म्हणून जगात भारताचा उदय!!!
अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्राच्या मदतीने पाडण्याची सिध्दी भारताने बुधवारी साध्य केली.
अशी कामगिरी करणार भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यानंतर केवळ चौथा देश ठरला आहे.

"मिशन शक्ती" असं या मोहिमेचे  नाव होते.

सध्या तरी इतकेच !!!!!!!


स्नेहा केतकर


1 comment: