🎆मधले पान🎆

 


कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

 

सप्टेंबरच्या अखेरीस बाबरी मशिद पाडल्याच्या कारसेवकांविरुद्धाच्या खटल्याचा निकाल अखेर लागला. ह्या निकालात मशिद पाडण्याची घटना हा पूर्वनियोजित कटाचा भाग नव्हता तर ही घटना उत्स्फूर्त होती असे म्हटले आहे. या वास्तूचा विध्वंस हा एक अपघातआहे, असे विशेष न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणी नियोजन करून ही वास्तू जमीनदोस्त करण्याच्या घटनेचे नेतृत्व केल्याच्या आरोपातून महत्त्वाच्या ३२ व्यक्तींनाही या विशेष न्यायालयाने पुराव्यांच्या सत्यतेअभावी निर्दोष ठरवले आहे. ह्या व्यक्तीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, साध्वी उमा भारती, विनय कटियार अशा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग होता. ह्या निकालाने आता राम मंदिर आंदोलनाबाबतीतील सर्व प्रश्न निकालात निघाले असे म्हणायला हरकत नाही. मात्र मशिद फोडणारे अनामिक हे आज्ञाधारक कारसेवक नव्हे तर समाजकंटकहोते, हेही विशेष न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे. ह्या निकालावर माध्यमातून काही उलटसुलट प्रतिक्रिया आल्याच. पण आता एकूणच राम मंदिर - बाबरी मशिद हे मुद्दे राजकीय दृष्ट्या मागे पडले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

 

ऑक्टोबरचा पूर्ण महिना निवडणुकांच्या बातम्या देण्यात सगळेजण व्यस्त होते. निवडणूक फक्त भारतातलीच नाही तर अमेरिकेतील निवडणूकही. नोव्हेंबरमध्ये सुरवातीलाच अमेरिकन आपल्या अध्यक्षाला निवडून देतील. कोण निवडून येणार हे कोणालाच ठामपणे सांगता येत नाही. भारतात बिहार राज्यातील निवडणुकीला सुरवात झाली आहे. ह्याच दरम्यान राम विलास पासवान ह्या ज्येष्ठ बिहारी दलित नेत्याचे निधन झाले आहे. ह्याचा फायदा त्यांच्या मुलाला चिराग पासवान ह्याला मिळू शकेल. सध्या तरी परत भाजप-नितीश सत्तेवर येतील असे वाटत आहे. लालू प्रसाद यादव यांचा मुलगा ह्याने मोठी टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण नववी पास तेजस्वी यादव सगळ्यांनाच पटेल असे वाटत नाही. आता केवळ घोषणांना भुलण्याचे दिवस मागे पडले आहेत. मात्र कोरोनामुळे लोकांत एक प्रकारची अस्वस्थता आहे हे निश्चित.

 

बिहार सोबत मध्यप्रदेशाची पोटनिवडणूक ही महत्वाची ठरली आहे. इथे एकूण २८ जागांवर निवडणूक होणार आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले सर्व नेते परत निवडून येतील का हे पाहणे हीच एक परीक्षा आहे. पण ती ज्योतिरादित्य सिंदियांची परीक्षा असेल. मध्यप्रदेशातील भाजप स्थिर राहील असा जाणकारांचा अंदाज आहे. काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांची सुटका झाल्यानंतर तेथील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ३७० कलम परत पुनर्स्थापित व्हावे यासाठी प्रयत्न करायचे ठरवले आहे. एकप्रकारे आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही त्यांची निकराची लढाई चाललेली आहे.

 

सध्या जगभरात जिथे पहावे तिथे अशांततेचे वातावरण आहे. अझरबैजान आणि आर्मेनियात युद्ध सुरु झाले आहे. ह्या युद्धांत अझरबैजानला तुर्कस्तान आणि पाकिस्तान मदत करत आहेत. तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांनी आपल्या आसपासच्या सर्व देशांशी भांडण सुरु केले आहे. मग तो ग्रीस असो वा सायप्रस. दोन आठड्यांपूर्वी पॅरिसमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रं दाखवून, त्या विषयावर चर्चा घडविल्यामुळे त्याचा शिरच्छेद करण्यात आला. ज्या मुलाने शिक्षकाचा शिरच्छेद केला त्यालाही पोलिसांनी ठार केले. ह्या घटनेचा सर्व मुस्लीम राष्ट्रांकडून निषेध करण्यात येत आहे. हे प्रकरण चिघळणार असे आत्तातरी वाटत आहे.

 

शेजारच्या पाकिस्तानात तर लष्कर विरुद्ध पोलीस दल असा लढा सुरु झाला आहे. ह्या लढ्यात सर्व विरोधी पक्ष देशाच्या सैन्याविरुद्ध एकत्र झाले आहेत. ही एक क्रांतिकारी घटनाच म्हटली पाहिजे. आजपर्यंत पाकिस्तानात लष्कराच्या हातात सत्तेची सूत्रे असण्याचा संकेत होता. आजही इमरान खान हे सैन्याच्याच कृपेने पंतप्रधान बनले आहेत. हा संघर्ष कोणते वळण घेतो हे येणारा काळच सांगेल.

 

भारत आणि चीनच्या दरम्यान चिघळत चाललेला सीमावाद तसाच राहणार अशी चिन्हे दिसत आहेत. कालच झालेल्या अमेरिकेच्या माईक पोम्पिओ यांच्यासोबतच्या चर्चेतून अमेरिका भारताच्या बाजूने असणार हे स्पष्ट झाले आहे. चीन विरोधात अमेरिकेने आघाडी उघडण्याचे ठरवलेले दिसते. आज त्यांनी मालदीवमध्ये अमेरिकन वकिलात उघडण्यात येईल असे जाहीर केले आहे. चीनच्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे हे निश्चित.

 


सध्या थाईलंडमध्ये त्यांच्या राजाविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने चालू आहेत. तिथे राजाच्या कृपेने देशांत लोकशाही पद्धती आहे. तेथील पंतप्रधानाला काहीही अधिकार नाहीत. आधीचे राजे
भूमीबोन अदुल्यादेज हे त्या देशातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्मदिन थायलंडमध्ये 'पितृदिन' म्हणून ओळखला जातो. ते हयात होते तोपर्यंत त्या देशातील नागरिकांना राजेशाही कधीही तापदायक वाटली नाही. सौदी राजघराण्यापेक्षाही अधिक ऐश्वर्यसंपन्न असलेले भूमीबोन यांनी कधीही संपत्तीचे विकृत प्रदर्शन केले नाही. त्यांचे चिरंजीव वजीरालोंगकोर्न हे उच्चविद्याविभूषित, पण हे गादीवर आले आणि सर्वच धरबंध सुटले. थायलंडवासीयांच्या अपेक्षाभंगास सुरुवात झाली. आता ह्या निदर्शनातून थाई जनतेला काय मिळते ते पहायचे. पारंपरिक समाजात आधुनिक लोकशाही मूल्ये रुजवणे ही किती कठीण आणि दीर्घ प्रक्रिया आहे हेच यातून जाणवते.

 

वेशभूषाकार भानू अथैया यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे नाव 'गांधी' सिनेमाच्या वेळी कानांवर पडले होते. नंतर त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत. शिवाय त्या माहेरच्या मराठी आहेत. त्यांचे माहेरचे नाव भानू राजोपाध्ये असे होते. सिनेमात वेशभूषेला इतके महत्व असते, हे खरे तर त्यांना मिळालेल्या पुरस्काराने सामान्य चाहत्यांच्या मनात ठसले. भानु अथय्यांनी मुख्य धारेतील चित्रपटांसारख्या जनमाध्यमातून पोशाख-संकल्पनया क्षेत्राची पायाभरणी केली. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टस् मधून सुरु केलेला प्रवास एक इतिहास घडवून संपला आहे. कट्टा टीम तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 


 

सध्या इतकेच.


स्नेहा केतकर




1 comment:

  1. नेहमीप्रमाणेच त्या त्या महिन्यात घडलेल्या मह्त्वाच्या घटनांची नोंद आणि मागोवा घेणारं हे मधलं पान माहितीपूर्ण झालं आहे.

    ReplyDelete