मधले पान

कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

                                                                                                                  

जुलै महिना पावसाचाच असतो. पण ह्या महिन्यात पावसाने महाराष्ट्रात तर धुमाकूळच घातला जणू. मुंबई तर तुंबलीच पण मुंबईचा पुणे-नाशिकशी संपर्कही तुटला होता काहीकाळ. रेल्वे, रस्ते सर्व वाहतूक बंद होती. त्यात रत्नागिरी, चिपळूण, कोल्हापूर, सांगली येथेही पूर आला. दरड कोसळून तळीये गावच नाहीसे झाले आहे. अशा वेळी ढिगाऱ्याखालून लोकांना वाचवणे हे ही कठीण होऊन बसते. हिमाचल मध्येही दरड कोसळून एक पूल मोडून पडला. थोडक्यात ह्या पावसाने अपरिमित जीवित आणि वित्त हानी केली आहे.


पावसाचे हे रौद्र रूप केवळ भारतानेच नव्हे तर युरोपनेही अनुभवले. जर्मनी, बेल्जियम, नेदरलॅन्डस् ह्या देशातही पूरजन्य परिस्थिती होती. तिथेही जवळजवळ दीडशे लोकांचा मृत्यू झाला. वीज-पाण्याशिवाय सव्वा लाख लोकांनाही दिवस काढावे लागले. इथे पावसाचा कहर तर, तिथे कॅनडात प्रचंड तापमान वाढले होते. इतक्या उन्हाळ्याची सवय नसल्यानेही तिथे आणीबाणीची स्थिती उद्भवली. थोडक्यात निसर्गाने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे ह्या तडाख्यातून कोणीही सुटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

कोरोना वाढीला लसीकरणामुळे आळा घालता येतो हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. सध्या भारतात तरी कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. असे असूनही अनेक वेळा क्रिकेट वा अन्य मॅचेस पुढे ढकलल्या जात आहेत कारण टीममधील खेळाडू कोरोनाग्रस्त आढळले आहेत. टोकियो ऑलिम्पिक्स स्पर्धा सुरु झाल्या तरीही त्यातून काही खेळाडूंना परत पाठवण्यात आले आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण कमीतकमी ठेवणे आणि ८ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालू ठेवणे हेच सर्वांत मोठे आव्हान सध्या जपान पुढे आहे.



 खरे तर ह्या स्पर्धा जपानचे माजी पंतप्रधान आबे यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे जपानमध्ये आल्या. पण काही कारणामुळे आबे ह्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांची अमर्याद उर्जा ह्या स्पर्धांमागे नाहीये. त्यातच कोरोनामुळे ह्या सर्व योजनेवर ताण पडत आहे. जगभरातून आलेल्या या पाहुण्यांकडे कोरोनावाहकम्हणून संशयाने पाहणारे टोकियोतील रहिवासी  आणि ही स्पर्धा नेमकी कुणासाठी सुरू आहे असा प्रश्न विचारणारे असंख्य जपानवासी अशी विचित्र, निस्तेज पार्श्वभूमी या ऑलिम्पिकला लाभलेली आहे. प्रेक्षकांशिवाय चालणाऱ्या ह्या स्पर्धांवर एक सावट पसरलेले जाणवते. मीराबाई चानुने भारताला रौप्य पदक मिळवून दिल्यामुळे आपल्याकडे मात्र आनंद पसरला आहे. लव्हलिना बोर्गोहेनने आणि सिंधूने ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीगाठली ही देखील आनंदाची बाब आहे.

 

ह्या पार्श्वभूमीवर युरोपातील युरो ही फुटबॅाल स्पर्धा मात्र उत्साहात पार पडली असेच म्हणावे लागेल. ह्या उत्साहाला लसीकरणाची ढाल होती हे विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे विम्बल्डनलाही प्रेक्षक आलेले होते. मात्र युरो फुटबॉल स्पर्धेतील इटली आणि इंग्लंड यांच्यातील अटीतटीच्या अंतिम सामन्याला गुंडगिरीचे आणि वर्णद्वेषी हुल्लडबाजीचे गालबोट लागले. इंग्लंडसाठी गेल्या ५५ वर्षांतील हा पहिलाच प्रतिष्ठेचा अंतिम सामना होता. पण संघातील कृष्णवर्षीय खेळाडू पेनल्टी शूट-आऊटमध्ये गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांना प्रेक्षकांनी वर्णद्वेषी शिवीगाळ केली. अनेक ठिकाणी कृष्णवर्णीयांवर हल्ले झाले. युरोपीय माध्यमांनी या प्रकारावर प्रचंड टीका केली आहे. इंग्लिश फुटबॉलमधील सर्वाधिक अंधारी रात्रअशी टीका इटलीच्या ल स्टॅम्पा (द प्रेस)या सुमारे दीडशे वर्षे जुन्या वर्तमानपत्राने अग्रलेखात केली आहे. त्याचे शीर्षकच, ‘नो फेअर प्ले, वी आर इंग्लिशअसे उपरोधिक आहे.

 

जगभरातील सरकारे कोरोना आपत्ती आणि लसीकरण ह्या वेढ्यात गुरफटली आहेत. लॉक डाऊन करावा तरी कठीण आणि उठवावा तरी कठीण अशा विचित्र मनस्थितीत अनेक देशांची सरकारे आणि भारतातील राज्य सरकारेही सापडलेली दिसतात. त्याचप्रमाणे ह्यामुळे शाळा-कॉलेजे सुरु करावीत का नाही? दहावीचे निकाल कसे लावावेत, ऍडमिशन कोणत्या निकषांवर द्यावी ह्या मुद्द्यांवर सरकार आणि पालक अडकलेले आहेत. ह्याच वेळी १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस देण्याबाबत चाचण्या चालू आहेत. कॉरोनाचे कोडे सुटत चालले असले तरीही ते पूर्ण सुटण्यासाठी अजून काही वेळ जावा लागेल हे नक्की.

 


ह्या धामधुमीत चीनचे क्षी जिनपिंग ह्यांनी तिबेटला भेट दिली. तिबेट मधील प्रत्येक घरातील एक जण चिनी सैन्यात भरती व्हावा ह्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. प्रत्येक वेळी जबरदस्ती करून जनतेकडून गोष्टी करवून घेता येत नाहीत, आणि तसे केले तरीही दुसरे प्रश्न निर्माण होऊ शकतात हे अजूनही चिनी नेतृवाला कळलेले दिसतात नाही. चीन मध्ये सध्या अंतर्गत अशांती निर्माण करणारेही अनेक मुद्दे आहेत. तरीही नियंत्रण रेषेवरही अशांतताच ठेवण्याचे त्यांचे धोरण सामान्यांना बुचकळ्यात टाकणारे आहे हे नक्की.

 अफगाणिस्तान ह्या देशातील लोकांचे नष्टचर्य संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या तालिबान ह्या देशावर हळूहळू आपले वर्चस्व प्रस्थापित करताना दिसत आहे. भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. अशा वेळी १ जुलै रोजी मृत्यू पावलेले अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. अफगाणिस्तान आणि इराक यातील दोन्ही लष्करी कारवाया त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि दोन्हीतही अमेरिकेचे चांगलेच हात पोळले. सद्दामला मारता आले हेच तेवढे यश. पण या दोन्ही ठिकाणी अमेरिकेचा अंदाज साफ चुकला. अफगाणिस्तानात कामगिरी फत्ते करून आपण आठवडाभरात माघारी येऊ अशी त्यांची मिजास होती. आज १८ वर्षांनंतरही अमेरिकेला अफगाणिस्तानातून काढता पाय घेणे जमलेले नाही. यावरून रम्सफेल्ड यांचा अंदाज किती चुकला हे कळेल. पण त्याचीही खंत, खेद त्यांना कधीही नव्हता. पुढील काळात अफगाणिस्तान हा मध्य आशियातील एक मोठा चिंतेचा मुद्दा ठरणार हे नक्की.

 

दिलीपकुमार यांचे ७ जुलै रोजी निधन झाले. तशी ही बातमी अपेक्षित होती. त्यांच्या वृद्धावस्थेमुळे रसिकांनी मनाची तयारी केलीच होती. तरीही ते गेले म्हटल्यावर अनेक आठवणी जाग्या झाल्याच. दिलीप, राज आणि देव ह्या त्रयीने ५०-६० च्या दशकात हिंदी सिनेमावर राज्य केले. ह्यातील दिलीप कुमारने आपल्या नैसर्गिक अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. कॅमेऱ्याचे मर्म समजलेला, चित्रपटाचे तंत्र उमजलेला तो एक कुशल कलाकार होता. चेहऱ्यावरच्या रेषांतून त्याच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोचत. मधुमतीतला पहिल्या भागातील खेळकर आनंद आणि दुसऱ्या भागातील हरवलेला आनंद अजूनही डोळ्यांसमोर येतो. कुठेही न रडता त्याच्या दु:खाची तीव्रता आपल्याला कळते. तसेच भडक अभिनय न करताही तो प्रेक्षकांना खळखळून हसवायचा. दिलीपकुमारचे असेच अनेक चित्रपट त्याची उणीव आपल्याला भासू देणार नाहीत.

 


सुरेखा सिक्री यांचेही ह्या महिन्यात निधन झाले. दिलीपकुमार इतकी प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला आली नाही. पण चोखंदळ रसिकांच्या स्मरणात त्यांच्या अनेक भूमिका राहतील. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (NSD) प्रशिक्षण घेतलेल्या सुरेखा सिक्री यांनी सिनेमा, नाटक आणि टेलीव्हिजन ह्या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनय सामर्थ्याचे सादरीकरण केले. 'सरफरोश' मधील एकाच सीन मधील आई असो वा बालिका वधूया अनेक भारतीय भाषांत डब झालेल्या हिंदी मालिकेतील 'दादीसा' ही आजीची प्रमुख भूमिका असो, प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या ह्या भूमिका विसरता येणे कठीणच. बालिका वधु ह्या मालिकेत तर बदलत गेलेल्या आजीचे निरनिराळे पैलू त्यांनी दाखवले. २००८ पासून ते २०१६ पर्यंत अशी तब्बल नऊ वर्षे दादीसादेशभर पोहोचली. ह्या दोन्ही कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

नंदू नाटेकर

ह्या दोन दिग्गज कलाकारांप्रमाणे नंदू नाटेकर यांचेही जुलै महिन्यात वृद्धत्वामुळे निधन झाले. १००हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावणाऱ्या नाटेकर यांनी ८८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला, तेव्हा क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली. सदैव हसतमुख स्वभावाच्या मराठमोळ्या नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये कारकीर्द घडवली, तेव्हा या खेळाकडे फक्त तंदुरुस्तीसाठी योग्य खेळ म्हणून पाहिले जात होते. पण नैसर्गिक गुणवत्ता लाभलेल्या नाटेकर यांनी १९५४मध्ये प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली. प्रकाश नाथ यांच्यानंतर ऑल इंग्लंड स्पर्धेत हा पराक्रम दाखवणारे नाटेकर हे दुसरे बॅडमिंटनपटू ठरले. नाटेकर यांनी एकेरीत सहा राष्ट्रीय विजेतेपदे जिंकली. पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीमध्येही त्यांनी विजेतेपदावर नाव कोरले होते. मग १९५६मध्ये क्वालालम्पूर येथे झालेल्या सेलांगर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाटेकर यांनी विजेतेपद पटकावून इतिहास घडवला; कारण ते भारतीय बॅर्डंमटनपटूचे पहिले आंतरराष्ट्रीय यश ठरले. पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे बॅडमिंटनपटू हा नाटेकर यांचा ठसा इतिहासात अजरामर राहील.

 


मधले पान लिहित असतानाच आसाम आणि मिझोराम ह्या भारताच्या ईशान्य भागातील दोन राज्यांतील तणाव वाढत चाललेला पाहून काळजी वाटू लागली आहे. लवकरात लवकर देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि ह्या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ह्यावर तोडगा काढणे अत्यावश्यक आहे. या दोन राज्यांत जवळपास १६५ कि.मी. लांब सीमारेषा आहे आणि उभय राज्यांतील तीन-तीन जिल्ह्यांतून ती जाते. वाद आहे तो या सीमारेषेच्या परिसरात. आसामी सरकार आणि जनता या सीमेचे ठरवून उल्लंघन करतात आणि आपल्या प्रांतात घुसखोरी करतात असा मिझोरमचा आरोप तर उलट मिझो जनताच प्रत्यक्षात सीमारेषेचा अनादर करते हे आसामींचे म्हणणे. हा वंश-संघर्ष (ethnic conflict) आहे हे आधी आपण लक्षात घ्यायला हवे. या दोन राज्यांतील रहिवाशांची ओळख (identity) अत्यंत भिन्न आहे, ही बाब यात समजून घेणे महत्त्वाचे. ह्या दोन्ही राज्यांतील अनेक जटील मुद्दे लक्षात घेऊनच हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

असो. सध्या इतकेच.

 

स्नेहा केतकर




1 comment:

  1. मधलं पान नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण.आवर्जून वाचलंच
    पाहिजे असं.

    ReplyDelete