नवीन वर्षाच्या
सुरवातीलाच शासनातर्फे देण्यात येणारा सन २०१८ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार
हा महेश एलकुंचवार यांना मिळाल्याची बातमी आली. हा राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा
साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च पुरस्कार आहे. महेश एलकुंचवार यांना याधीही अनेक पुरस्कार
मिळाले आहेत. तरीही नवतेचे पाईक असलेले 'विंदा' यांच्या नावाचा हा पुरस्कार, नाट्य
लेखनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या एलकुंचवार यांना मिळाला हा योग सुखावणाराच!
त्रिधारा हा नवा नाट्यप्रकार त्यांनी मराठी नाटकांना दिला. एलकुंचवार यांचे ललित लेखनही
तेवढेच प्रभावी आणि आशयघन आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!!
अपेक्षेप्रमाणे साहित्य संमेलन गाजले. ते गाजवले तीन
स्त्रियांनी. नयनतारा सहगल ह्या ज्येष्ठ लेखिकेला संमेलनाचे उदघाटक म्हणून बोलावणे
आणि मग त्यांचे निमंत्रण रद्द करणे हे केव्हाही अयोग्यच होते. अर्थात त्यांचे भाषण, म्हणजेच त्यांचे विचार प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत
पोचलेच. चॅनेलवाल्यांना यावर तिखट-मीठ लावून चर्चा करायला मात्र विषय मिळाला. पण
ह्याच संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात वैशाली येडे ह्या शेतकरी विधवा पत्नीचे भाषण
काळजाला हात घालणारे आणि अंतर्मुख करणारे होते. नयनतारांप्रमाणे ह्या भाषणालाही
प्रसिद्धी दिली असती तर माध्यमांचीच प्रतिमा उजळ झाली असती.
अरुणा ढेरे यांचे भाषण मात्र अप्रतिम होते. वरील सर्व
विषयांचा उहापोह त्यांनी आपल्या भाषणात अतिशय संयत भाषेत केला. तरीही त्यांच्या
शब्दांची धार जाणवलीच. विचार स्वीकारणे व नाकारणे हा आपला हक्क आहे. पण विचार
मांडण्याच्या हक्कावर कोणत्याही परिस्थितीत आघात होता कामा नये हे त्यांनी स्पष्ट
केले. त्यांचे साहित्य संमेलनातील भाषण हे वस्तुपाठ ठरावा, इतके उत्कृष्ट झाले. कसे बोलावे हे त्यांनी स्वत:च सोदाहरण
दाखवून दिले जणू!
भारताने ऑस्ट्रेलियात विजय मिळविला आणि भारताच्या शिरपेचात
एक मानाचे पान खोवले गेले. मात्र हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल या तरुण
क्रिकेटर्सनी लाजिरवाणी विधाने करून त्यांना स्वतःलाच लाज आणली. ह्यासाठी मी करण
जोहर आणि त्याच्या कार्यक्रमालाही तितकेच जबाबदार मानेन. काय विचारावे ह्याचे भान
असणे हे ही आवश्यक आहे. एकीकडे 'कसे बोलावे' याचे उदाहरण देणाऱ्या अरुणाताई! आणि दुसरीकडे 'कसे बोलू नये' हे दाखवणारे हार्दिक, करण आणि राहुल!!! मुळात संस्कार, शिक्षण, चांगली शिकवण नसेल तर काय होते, याचेच हार्दिक पंड्या आणि काही प्रमाणात करण जोहर हे उदाहरण
आहेत. माध्यमांवर 'सेन्सॉरशिप' असावी का असा प्रश्न यामुळे मनात उत्पन्न झाला आहे.
सिनेजगतात
सध्या चरित्रपटांचे पीक आले आहे. The Accidental Prime Minister हा सिनेमा
नुकताच प्रदर्शित झाला. येणाऱ्या काळात ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मणिकर्णिका
हा झाशीच्या राणीवरील सिनेमा प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून लोकांच्या भेटीला येत
आहे. "उरी" हा देशभक्तीपर सिनेमाही गाजत आहे. अर्थात ह्या सिनेमांचा संबंध
येणाऱ्या निवडणुकांशी नाही असे राजकीय पक्ष म्हणत आहेतच. पण सुज्ञास अधिक सांगणे नलगे!!!!!
साहित्य, चित्रपट आणि नाट्य सृष्टीप्रमाणे राजकारणही रंगतदार होत आहे. देशांत आणि
विदेशांतही! आपल्याकडे निवडणुकांच्या आधीच्या तयारीला जोर आला आहे. उत्तर प्रदेशात
सपा-बसपाने हात मिळवणी केली आहे, तर कलकत्त्यात मोदीविरोधी पक्षांना ममता दिदींनी आमंत्रण दिले आहे. पुढचे
तीन-चार महिने मोदी समर्थक -विरोधक या लाटांवर भारताची नौका डुलत राहणार हे
नक्की!! अमेरिकेत सरकारकडे पैसे नाहीत म्हणून 'shut down' चालू आहे, तर ब्रिटनमध्ये 'Brexit' हा कळीचा मुद्दा बनला आहे. 'धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं' अशी काहीशी ब्रिटनची अवस्था झाली आहे.
२०१८ संपता संपता ३० डिसेंबरला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक
मृणाल सेन यांचे निधन झाले. लोकप्रियतेची फिकीर न करता, जे योग्य तेच मांडेन असा बाणा असणाऱ्या ह्या संवेदनशील
दिग्दर्शकाला आमचीही आदरांजली !!!!! मराठी आणि इंग्रजी नाट्यसृष्टी गाजवलेले किशोर
प्रधान यांनीही कायमची 'Exit' घेतली. नाटक, सिनेमा, मालिका या सर्व माध्यमात ते लिलया वावरले. Glaxo कंपनीत अधिकारपदी काम करत राहून त्यांनी हे अभिनय क्षेत्र गाजवले हे विशेष!
मनमुराद हसवणारा एक निरागस अभिनेता अशी किशोर प्रधानांची आठवण कायम मनात राहील.
स्नेहा केतकर
बेष्टच ...!
ReplyDelete