मधले पान

कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

जुलै महिन्याच्या सुरवातीला सगळेचजण विश्वचषकाच्या रंगात रंगले होते. उपांत्य फेरीत हरल्याने वाईट वाटणे साहजिकच होते. अर्थात अंतिम सामना मात्र रंगतदार झाला. मला वाटतं, अजूनही क्रिकेट प्रेमींमध्ये गप्पात खरे कोण जिंकले ह्यावर वाद होत असतील. भारताचे फक्त दोन-तीन फलंदाजांवर अवलंबून असणे हेच हरण्याचे मुख्य कारण ठरले. सुरवातीची फळी ऐन वेळी गडगडली आणि ती सावरून घेण्याची कुवत असलेले खेळाडू मधल्या फळीत आपल्याकडे नव्हते, किंवा आपण असे खेळाडू तयार केले नाहीत हा व्यवस्थापकांचा दोष वाटतो. 

हा सामना चालू असतानाच तिकडे विंम्बल्डन मध्येही अंतिम लढत चालू होती. ती मात्र डोळे दिपवणारी होती. फेडरर आणि जोकोविच अप्रतिम खेळले. ह्या सामन्यात दोघेही जिंकले असेच म्हणायला हवे. या दोन्ही सामन्यांइतकीच;  हरलेल्या दोघांची post-match मुलाखत बऱ्याच काळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील. संयम, आणि अतिशय gracefully पराभव मान्य कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या दोन्ही मुलाखती मनाला स्पर्श करून गेल्या.


ह्या महिन्यात राजकीय पटलावर अनेक घटना घडल्या. राहुल गांधीनी शेवटी राजीनामा दिला आहे, हे कॉंग्रेसवासियांना कळले. कारण ह्यावर आधी कोणीही विश्वासच ठेवायला तयार नव्हते. पण ह्यामुळे कॉंग्रेसचे उणेपण प्रकर्षाने लोकांसमोर आले आहे. गांधी घराण्याव्यतिरिक्त नेता कोणाला करावे हा पेच अजून सुटत नाही हे सर्वात जुन्या पक्षाचे फार मोठे अपयश आहे. ह्या निर्नायकी अवस्थेमुळे कॉंग्रेसमधील अनेकांनी दुसऱ्या पक्षात जाणे पसंत केले आहे. गोव्यातील कॉंग्रेसच्या दहा विधायकांनी भाजप मध्ये प्रवेश केला ही बातमी म्हणजे भाजपचे यश नसून कॉंग्रेसचे अपयश आहे.

सध्या कर्नाटकातही राजकीय नाट्य रंगत आहे. नुकताच येदियुरप्पा यांचा नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ समारंभ झाला. (कितवा बरं?) जमेल तितके दिवस कुमारस्वामी यांनी विश्वास मत लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्यांना पायउतार व्हावेच लागले. आता येदियुरप्पांनाही विश्वास ठराव आणून तो जिंकावा लागणार आहे. बघुया काय होते ते.


ह्या महिन्यात काही अतिशय अभिमान वाटावी अशी घटना म्हणजे हिमा दास हिची कामगिरी!!! 'ढिंग एक्स्प्रेस' नावाने प्रसिद्ध असलेली भारताची स्टार धावपटू हिमा दास हिने चेक रिपब्लिक येथील मेटूजी ग्रँड प्रिक्स अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. हिमाने हे अंतर ५२.०९ सेकंदात पार केले. तिने गेल्या महिन्यात ५ सुवर्णपदके मिळविली. हिमाने २ जुलैला युरोपात, ७ जुलैला कुंटो अॅथलेटिक्स मीटमध्ये, १३ जुलैला चेक गणराज्यात आणि १७ जुलैला टाबोर ग्रँड प्रिक्समधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

चेक रिपब्लिक येथील मेटूजी ग्रँड प्रिक्स अॅथलेटिक्स स्पर्धेत, दुसरे व तिसरे स्थान पटकावणाऱ्या व्ही.के. विस्मयासरिताबेन गायकवाडचे ही मनापासून अभिनंदन. पुरुषांच्या स्पर्धेतही मोहम्मद अनस, नोह निर्मल टॉम, एम.पी. जाबीर जितीन पॉलने यांनी दिमाखदार यश मिळवले. ह्या सर्वच खेळाडूंचे अभिनंदन.

हिमा दास हिने आपल्या पगारातील अर्धी रक्कम आसाम येथील पूरग्रस्तांना पाठविण्याचे जाहीर केले आहे. आसाममध्ये पूरसदृश्य परिस्थितीने जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक एकर जमीन पुराखाली आहे. सर्वांनाच तिने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान केले आहे.



चांद्रयानाचे यशस्वी उड्डाण ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरली. अंतराळात भारताने नवा इतिहास निर्माण केला. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार चांद्रयान 2 यशस्वीपणे आकाशात झेपावले. 

चांद्रयान -२ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. हे पूर्णतः भारतीय बनावटीचं यान आहे. आजवर चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये चांद्रयानं उतरली आहेत. चंद्राचा विषुववृत्तीय प्रदेश इतर भागाच्या तुलनेत थोडा सपाट आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव मात्र दऱ्याखोऱ्यांचा आणि खडबडीत पृष्ठाचा आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशानं आजवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचं धाडस केलेलं नाही. या चांद्रयान-2 मोहिमेचं मुख्य उद्देश आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून त्यातून एक रोव्हर चंद्राच्या पृष्ठावर सोडणं. ह्या मोहिमेतून काही नवी माहिती हातात येईल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.


इस्रोची ही अंतराळ मोहीम आणखी एका कारणासाठी खास आहे. कारण ह्या मोहिमेची धुरा दोन महिला शास्त्रज्ञांच्या हातात आहे. रितू करिधल या संपूर्ण मिशनच्या डायरेक्टर आहेत तर एम. वनिता प्रोजेक्ट डायरेक्टर. महिलांसाठी ही खास अभिमानाची बाब आहे.

इतर काही बातम्यांमध्ये महात्मा गांधींचे चित्र इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापनदिनी काढलेल्या खास बीअर बाटल्यांवर छापण्यात आले होते, ह्यावर अनेकांनी निषेध नोंदवला. ह्या बाटल्यांवर इस्रायलच्या पंतप्रधानांचे ही चित्र होते. महात्मा गांधींचा सन्मान करायच्या नादात तो चुकीच्या पद्धतीने केला गेला इतकेच. 

झायरा वसिम ह्या अभिनेत्रीने १८ व्या वर्षीच आपली निवृत्ती जाहीर केली. खरे तर पाहता ह्या गोष्टीचे फार काही अवडंबर माजवण्याची गरज नव्हती. मात्र तिने आपल्या करियरमुळे आपल्या धर्माचरणात खंड पडतो अशा तऱ्हेचे ट्विट/वक्तव्य केल्याने मतामतांचा गलबला झाला. एकविसाव्या शतकात एका १८ वर्षांच्या मुलीने असे बोलावे? तेव्हा झायरा हिला देव सद्बुद्धी देवो असेच म्हणावे लागेल. दुसरे काय?  
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. याची झळ ह्यावेळी पंतप्रधान मोदींना बसली. "मोदींनी आपल्याला काश्मीर प्रश्न सोडवायला मध्यस्थी करावी" असे सांगितले, असे विधान ट्रम्पनी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमवेत चर्चा करताना केले. अर्थात ह्यावर आपल्या लोकसभेत गदारोळ उठला. परराष्ट्र मंत्री श्री. जयशंकर यांनी तातडीने ह्या विधानाचे खंडन केले. मात्र मोदींनी बोलावे असा आग्रह विरोधकांनी धरला. अर्थात ह्यावर मोदी बोलणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण ट्रम्पना खोटे पाडणे हे कुटनीतीच्या नियमांनुसार योग्य होणार नाही. 

ह्या सगळया प्रकरणावर एक मजेशीर मीम/meme 'what's app' वर येत होता. 
त्यात 'mediate' आणि 'meditate' ह्यात ट्रम्प ह्यांनी गल्लत केली असण्याची शक्यता वर्तवली होती.  ही जरी कोणीतरी मजा केली असेल, तरीही असे खरोखर झाले असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही असा विचार माझ्या मनात आला हे नक्की!!!!!!!! 


तुम्हांला आपला "चालणारा मनुष्य" आठवतोय का? म्हणजे आपला "Walkman" हो? एकेकाळी सगळ्यांचा हा आवडता Walkman, आज असता तर चाळीस वर्षांचा असता. आज आपण फक्त रेडिओच नाही तर चक्क कॉम्प्युटर, टीव्ही देखील खिशात घेऊन फिरतो त्याची सुरवात ह्या Walkman पासूनच झाली होती. अशा Walkman ची आठवण सोनी सेंटर जपान मध्ये जागवण्यात आली.
हा महिना संपता संपता तिहेरी तलाक विरोधी कायदा राज्यसभेत संमत झाला. आता तिहेरी तलाक देणे हा कायद्याने गुन्हा आहे.  महिला सबलीकरण दृष्टीने हा फार मोठा निर्णय आहे.

सध्या इतकेच. 

स्नेहा केतकर

1 comment:

  1. मस्त आढावा घेतलास महत्वाच्या घडामोडींचा 👍👍

    ReplyDelete