मधले पान



कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

आज १ ऑगस्टच्या कट्ट्यात 'मधले पान' लिहिताना लोकमान्य टिळकांची आठवण होणे साहजिक आहे. ह्या वर्षी टिळकांना जाऊन शंभर वर्षे होतील. त्या निमित्ताने त्यांचा स्मृती शताब्दी महोत्सव महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा होणार आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाश पडणारी काही पुस्तके प्रकाशित होणार आहेत. तरुण पिढीने ही पुस्तके वाचली तर आपल्या देशाच्या इतिहासाची काही अधिक माहिती त्यांना मिळेल यात शंका नाही. टिळक हे राजकारणी म्हणून आपल्याला माहिती आहेतच, पण तसेच ते गणितज्ञ ही होते. खगोलशास्त्राची त्यांना आवड होती. ह्या विषयावर त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे 'गीतारहस्य' हे गीतेवरील भाष्य विषद करणारा ग्रंथ आजही अध्यात्माचे अभ्यासक आवर्जून वाचतात. टिळकांच्या ह्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांना आमचे शतश: नमन!

लोकमान्यांनी त्यांच्या काळात समाज प्रबोधनासाठी चालू केलेला सार्वजनिक गणेश महोत्सव मात्र ह्या वर्षी अतिशय संयत स्वरूपात साजरा होणार आहे. अनेक गणेशमंडळांनी आपणहून अशी भूमिका घेतली हे महत्वाचे. कोरोनाच्या या आक्रमणाला थोपवण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरही असे प्रयत्न चालू आहेत ही समाधानाची बाब आहे. पाच ऑगस्टला अयोध्येत होणारे भूमिपूजनही स्थगित करावे असे काही राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. काही नेत्यांनी पंतप्रधानांनी 'पंतप्रधान' म्हणून भूमिपूजनासाठी जाऊ नये असा आग्रह धरला आहे. मात्र व्यक्तिगत स्तरावर ते गेले तर चालतील, असे म्हटले आहे. अनेक पक्षाच्या नेत्यांनी रामजन्मभूमी पूजनाचा समारंभ दूरदर्शनवरून दाखवायलाही आक्षेप घेतला आहे.

काहीही असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'पंतप्रधान' म्हणूनच रामजन्मभूमी पूजनासाठी अयोध्येला जाणार हे निश्चित आहे. ह्या राम मंदिराच्या मुद्द्यावरूनच भाजपने आपले जनमत तयार केले होते. अडवाणींच्या रथयात्रेच्या आयोजनातही मोदींजींनी महत्वाची भूमिका निभावली होती. मोदींजींच्या कार्यकाळात हा मंदिरासंबंधीचा मोठा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला हे विसरून चालणार नाही. त्यामुळे पाच ऑगस्ट होईपर्यंत यावर वाद होत राहतील. पण समस्त भारतीयांच्या मते ह्या मंदिराचे निर्माण होणे ही आनंदाची बाब आहे हे देखील नाकारून चालणार नाही.

धार्मिक बाबींबद्दल बोलताना 'आया सोफिया' ह्या इस्तंबूल येथील प्राचीन चर्चची आठवण होणे साहजिकच आहे. १५०० वर्षांपूर्वी बांधलेल्या ह्या बायझेन्टाईन काळातील चर्चचे ऑटोमन काळात मशिदीत रुपांतर करण्यात आले. त्यावेळी ह्या वास्तूतील काही चित्रांवर चक्क सफेदी करण्यात आली. जवळजवळ पाचशे वर्ष हे चर्च 'मशिद' म्हणून वापरात होते. १९३४ साली तुर्कस्तानचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष केमाल पाशा यांनी त्यावेळी मशिद असलेल्या ह्या प्राचीन वास्तुचे वस्तुसंग्रहालयात परिवर्तन केले. वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या ह्या इमारतीचा समावेश युनेस्कोच्या 'जागतिक ठेवा' यादीत करण्यात आला आहे. मात्र अजूनही जगावर धर्माचा पगडा किती प्रखर आहे ह्याचा प्रत्यय आला. सध्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान ह्यांनी पुन्हा ह्या वस्तुसंग्रहालयाचे मशिदीत रुपांतर केले आहे. २४ जुलै रोजी अनेक तुर्की नागरिकांनी तेथे नमाज पठण केले. ह्या निर्णयाविरोधात अनेक देशांनी आपला निषेध नोंदवला आहे. ह्याचप्रमाणे लाहोर येथील एका गुरुद्वाराचे मशिदीत रुपांतर करण्यात येत आहे. भारताने ह्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. मात्र अशा घटना 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा' भारताने आणला ह्याला समर्थन देणाऱ्या ठरतात.

 

मंदिर, मशिद आणि चर्च ह्यासंबंधी बोलताना पुतळ्यांचाही उल्लेख व्हायला हवा. जॉर्ज वॅाशिंग्टन ह्या अमेरिकेच्या पहिल्या अध्यक्षांच्या पुतळ्याची तोडफोड पोर्टलंड, ओरेगॅान येथे निदर्शकांनी केली. त्याकाळी अनेक माजी अमेरिकन अध्यक्षांकडे गुलाम असायचे. जॉर्ज वॅाशिंग्टनकडेही होते. याचा निषेध म्हणून ही तोडफोड करण्यात आली असावी. अमेरिकेत वर्णभेदाविरुद्ध पेटलेले आंदोलन अजूनही शमताना दिसत नाही. १८६१ ते १८६५ या दरम्यान झालेल्या अमेरिकन नागरी युद्धांत गुलामी प्रथेच्या बाजूने लढलेल्या अनेक योद्ध्यांचे पुतळे दक्षिणेकडील राज्यांत आहेत. ते ही ह्या आंदोलनात पाडण्यात आले वा त्यांची नासधूस करण्यात आली. मंदिर, मशिद, चर्च किंवा पुतळे ही धर्माची/श्रद्धेचीच नव्हे तर विचारांचीही प्रतीके असतात. ती सद्य स्थितीत ऐरणीवर आली आहेत हे नक्की. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षांची निवडणूक आहे. या आंदोलनाचे राजकीय परिणाम काय होतील हे पाहणेही त्यामुळेच महत्वाचे आहे.

हाँगकाँगमध्ये 'राष्ट्रीय सुरक्षा कायदा' १ जुलैपासून लागू करण्यात आला. ह्या कायद्यामुळे हाँगकाँग येथील रहिवाशांवर अनेक बंधने येणार आहेत. लोकशाही ते एकाधिकारशाही असा हा प्रांत वाटचाल करीत आहे. याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पडसाद उमटले. अमेरिकेने ह्यूस्टन येथील दूतावास बंद केला तर चीनने चेंगडू येथील अमेरिकन दूतावास बंद केला. नुकताच भारत-अमेरिका यांनी दक्षिण चिनी समुद्रात संयुक्त नौदल अभ्यास ही केला. चीनला पुराच्या समस्येनेही वेढले आहे. चीनमधील प्रख्यात (की कुख्यात) थ्री गोर्जेस धरणही त्यामुळे धोक्यात येतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या घडामोडी घडत असताना, भारतातही अनेक घटना घडत आहेत. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यातील भांडणे आता न्यायालयापर्यंत जाऊन पोचले आहेत. यात आता राजस्थानचे राज्यपाल, सभापती यांनाही ओढण्यात आले आहे. बसपाच्या मायावती यांनीही काँग्रेस विरोध करत यात उडी घेतली आहे.
मध्यप्रदेशात पकडलेल्या विकास दुबेची उत्तर प्रदेशात येताच पोलीस चकमकीत हत्या करण्यात आली. या घडामोडीत विकास दुबे याच्या हत्येपेक्षा गुंड-राजकारणी-पोलीस ह्यातील समोर आलेले हितसंबंध हा खरा चिंतेचा विषय आहे. केरळातही सोने तस्करीच्या प्रकरणात UAE तल्या दूतावासातील अधिकाऱ्यापासून केरळ सरकार मधील अधिकारीही अडकली आहेत. ह्या तस्करीच्या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

संपूर्ण देशात पावसाने हजेरी लावली हे दृश्य आनंददायक आहे. पण आसाम राज्य हे सध्या पुराच्या विळख्यात अडकलेले आहे. पूरग्रस्तांना ह्या वर्षी पाऊस व  कोरोना दुहेरी संकटाशी सामना करावा लागतोय. आता कोरोनासोबत काळजी घेत जगूया असे म्हणत भारतात जवळजवळ सगळीकडचे लॉकडाऊन बंद करण्यात आले आहेत. जगणे हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

रक्षामंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार आता सैन्यातील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या निर्णयानुसार हा आदेश काढण्यात आला आहे. महिलांना ह्या क्षेत्रातही आता गगनभरारी घेता येईल हे नक्की.

सुशांत सिंग राजपूत ह्याच्या दुर्दैवी आत्महत्येचे अनेक पडसाद उमटत आहेत. बॉलीवूडमधील घराणेशाहीने किती हातपाय पसरले आहेत हे ही समोर आले आहे. झोया अख्तर हिने दिग्दर्शित केलेल्या 'जिन्दगी ना मिलेगी दोबारा' ह्या चित्रपटाला जर उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळणार नसेल तर आम्ही व आमचा मित्रपरिवार 'स्क्रीन' च्या पुरस्कार सोहळ्यावर बंदी घालू असे सांगितले होते. ही माहिती शेखर गुप्ता ह्या प्रसिद्ध पत्रकाराने दिली आहे. जावेद अख्तर आणि शबाना आझमी ह्यावर काय बोलतात हे पाहायचे. पण अशा घटना ह्या दुर्दैवी आहेत हे ही तितकेच खरे.

जुलै महिना संपतासंपता पाच राफेल विमानांचे भारतात आगमन झाले आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना आनंददायी आहे हे नक्की.

आज इथेच थांबते.

स्नेहा केतकर


2 comments:

  1. मधलं पान नेहमीप्रमाणेच वाचनीय. कित्येक घटना आपल्या डोळ्यांवर आपटून जात असतात. या लेखातून अशा वेगवेगळ्या घटनांची चांगल्या दृष्टिकोनातून संगती लावून मिळते. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे संपूर्ण आढावा आला आहे

    ReplyDelete