मधले पान



कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच केरळमधील एका गर्भवती हत्तिणीच्या अपघाती मृत्यूने सारे जण हळहळले. 'अपघाती' अशासाठी, की केरळात अशा प्रकारे फळात फटाके भरून, पिके खायला येणाऱ्या रानटी डुकरांसाठी वा इतर जनावरांसाठी ठेवण्याची पद्धत आहे. आता ही पद्धत योग्य की अयोग्य यावरही विचार करण्याची गरज आहे. खूप मोठ्यामोठ्याने वाद घालून, भांडून जे साधत नाही, ते ज्या प्रकारे ही गर्भवती हत्तीण अबोलपणे मृत्युला सामोरी गेली त्यामुळे साधले आहे. मृत्यूला कवटाळत पाण्यात नि:शब्दपणे उभी असलेली ती हत्तीण अनेकांच्या स्मृतीतून लवकर जाणार नाही हे निश्चित!

महाराष्ट्रात स्थलांतरित कामगारांसाठी सोनू सूद या अभिनेत्याने खूप काम केले आहे. हे काम त्याने स्वयंप्रेरणेने केले. अनेक कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सोनू सूद याने सर्वतोपरी मदत केली. कधी पैशांची, तर कधी माहिती देऊन, तर कधी त्यांना अन्न देऊन. ह्या मदतीचे अनेकांनी कौतुक केले. पण हे कौतुक शिवसेनेला का झोंबले हे कळले नाही. ह्यावर केलेल्या राजकारणाने एक प्रकारे ह्या पक्षाची मानहानी झाली आहे.

गेल्या महिन्यात सुरु झालेली वर्णभेदाविरोधातील आंदोलने अजूनही सुरु आहेत. युरोपमध्ये आणि अमेरिकेतही. या आंदोलनांमुळे अमेरिकेतील पोलीस खात्यातील काही नियमावलीत सुधारणा व्हावी असे मात्र जरुर वाटते. खरे तर बराक ओबामा राष्ट्रपती असतानाच ह्या सुधारणा झाल्या असत्या तर कृष्णवर्णीयांना अधिक आनंद झाला असता. ओबामा यांनाही आपल्याला सर्व कृष्णवर्णीयांनी जी भरघोस मते दिली याची परतफेड केल्याचे समाधान लाभले असते. पोलीस प्रणालीत जो कृष्णवर्णीयांविरुद्ध पक्षपातीपणा दिसून येतो त्यालाही आळा बसला असता. ह्या बदलाचे श्रेयही ओबामांना मिळाले असते. पण तसे व्हायचे नव्हते हेच खरे!!

८ जूनला Unlock-2 ह्या पर्वाला भारतातच नव्हे तर सगळया जगातच सुरुवात झाली. पण सगळया जगात आणि भारतातही कोरोनाचे थैमान चालूच आहे. कुठे अधिक तर कुठे कमी तर कुठे वेगाने हा प्रसार चालू आहे. ह्या रोगाने साऱ्यांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. भारतात चुकीच्या वेळी लॉकडाऊन केला असे अनेकजण सांगत आहेत. पण नक्की कधी लॉकडाऊन करायला हवा होता हे कोणालाही सांगता येत नाहीये. स्वीडन देशाचे आधी खूप कौतुक करण्यात आले. त्यांनी लॉकडाऊन न करता ह्या रोगाशी सामना केला म्हणून. पण आता त्या देशातील कोरोनाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. लोकसंख्येने लहान असून, शिक्षणाचे प्रमाण अधिक असून आणि सुबत्ता, वैद्यकीय सोयी असूनही ही परिस्थिती त्या देशांत आहे. थोडक्यात काय तर ह्या प्रश्नाला साधे, सोपे आणि सर्वांना चपखल बसेल असे एकच उत्तर नाही. काळजी घेणे, मास्क लावणे आणि बाहेर पडल्यावर सावधानतेने वागणे, एकमेकांत अंतर राखणे हेच सध्या श्रेयस्कर आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अचानक दिल्ली ही दिल्लीकरांची असा आदेश काढला. दिल्लीत फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील असे जाहीर केले. वेळेवारीच दिल्लीच्या राज्यपालांनी हा आदेश मागे घेतला हे योग्य झाले. कोणत्याही रुग्णावर वेळेवर उपचार होणे हे गरजेचे आहे. मग तो भारतीय असो वा दुसऱ्या देशांतला. बहुतेक दिल्लीतील रुग्णसंख्या वाढ्त असल्याने केजरीवालांचा धीर सुटला असावा.

चित्रपट दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचे ४ जून २०२० रोजी निधन झाले. योगेश गौर ह्या कवी-गीतकाराचे २९ मे २०२० रोजी निधन झाले. हा एक विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे. साध्या सरळ पण अर्थपूर्ण रचना करणारे योगेश हे कवी! त्यांची मनात घर करून राहिलेली अनेक गाणी त्यांनी बासु चॅटर्जी यांच्या चित्रपटांसाठी लिहिली आहेत. बासुदांच्या मध्यमवर्गीय सिनेमांत योगेश यांनी लिहिलेली भावपूर्ण गाणी चपखल बसतात. एवढेच नव्हे, तर बासुदांचे चित्रपट यशस्वी होण्यातही ह्या सुमधुर गीतांचा मोठा सहभाग आहे.

बासु चॅटर्जी म्हटले की आपल्याला आठवतो साधा सरळ अमोल पालेकर!! नायिकेलाही घाबरणारा हा हिरो.
मध्यमवर्गीयांचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक चित्रपटातून घडते. त्यांचा थोडा वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणजे, "एक रुका हुआ फैसला". Twelve Angry Men ह्या इंग्रजी चित्रपटावरून घेतलेला. पण बासुदांचा हा 'फैसला' मात्र केवळ अप्रतिम आहे. बासुदांनी समाजातील वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या व्यवसायातील, वेगवेगळ्या वयोगटांतील, वेगवेगळ्या मानसिकतेची निवडलेली १२ पात्रे. त्यांची कामे सारेच लाजवाब! अनु कपूर आणि पंकज कपूर यांनी तारुण्यात रंगवलेली म्हातारी माणसे खऱ्याखुऱ्या म्हाताऱ्यांनाही लाजवणारी आहेत. ज्या सहजतेने ते 'छोटीसी बात' मधल्या अमोल-विद्याच्या प्रेमकहाणीत आपल्याला गुंतवतात, तितक्याच ठामपणे 'सारा आकाश' मधील सामाजिक वास्तवही मांडतात. नवऱ्याचा राग करण्यापासून ते त्याच्यावर जीव लावण्यापर्यंतचा सौदामिनीचा प्रवास, 'स्वामी' चित्रपटांत दाखवला आहे तो ही हळुवारपणे, सहजतेने आणि काव्यात्मतेने!!!!! बासुदा आणि योगेशजी यांनी आपली आयुष्ये समृद्ध केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!
जून महिन्याच्या बरोबर मध्यावर सुशांत सिंग राजपूत ह्या तरुण अभिनेत्याने आत्महत्या केल्याची बातमी आली. आणि खरोखरच सर्व चित्रपट सृष्टी हादरून गेली. उण्यापुऱ्या ३४ वर्षांचे आयुष्य! त्यातही त्याला बऱ्यापैकी नाव, लोकप्रियता लाभली होती. अशा वेळी असे आत्मघातकी पाऊल का बरं उचलले असावे त्याने? हा प्रश्न सगळ्यांनाच छळत आहे. त्यातच बॉलीवूडमधील घराणेशाही हा मुद्दा ही वारंवार बातम्यांत येत आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा परस्परांशी संबंध असेलच असे नाही. सुशांत ह्याला मानसोपचार चालू होते. त्यालाही नैराश्येने - depression ने ग्रासले होते असे समोर आले आहे. काहीही असले तरी त्याचे जाणे चटका लावून गेले हे मात्र खरे.

सध्या एकूणच भारताच्या सीमा अशांत आहेत. लिपुलेख पास, जिथून आपले भारतीय गेली अनेक वर्षे कैलास-मानस यात्रेला चालत जात असत, तिथे भारताने नुकताच रस्ता बांधला. यात्रेकरूंची मोठीच सोय झाली म्हणून सगळे आनंदात होते. पण सध्या चीनच्या प्रभावाखाली असलेल्या नेपाळचे त्यामुळे पित्त खवळले. हा भाग नेपाळचा आहे असे त्यांनी जाहीर करून आपला नकाशाही बदलला व त्यांच्या संसदेत मान्य करवून घेतला. सध्या के.पी.ओली यांच्या विरोधात जनता जात आहे. त्यासाठीही त्यांनी भारताकडे बोट दाखवले. गंमत म्हणजे नेपाळने भारताचा भाग स्वतःचा म्हणून दाखवला. आणि तिथे नेपाळच्या सीमेलगत चीनने घुसखोरी करत लष्करी ठाणे बांधले आहे.

काश्मीरमध्ये अनेक आतंकवादी पकडले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पकडलेल्या देविंदर सिंग ह्या पोलीस अधिकाऱ्याने अनेक आतंकवाद्यांना मदत केली होती. आपल्या पोलीसांना, लष्कराला अधिक यश मिळत आहे त्याचे हे देखील एक कारण असू शकेल.
काश्मीर मधील घुसखोरीला आळा घालण्यात यश येत आहे. पाकिस्तानमध्ये मात्र कालच कराची येथे बॉम्बस्फोट झाला.  बलोच राष्ट्रवादी गटाने हा हल्ला केला असे प्रथमदर्शनी वाटत आहे.


जून महिन्यात प्रामुख्याने चीन हा बातमीत राहिला. आधी हॉंगकॉंगमध्ये  'National Security Law'
लागू केला म्हणून. ह्याच कायद्याविरुद्ध गेले वर्षभर तिथे निदर्शने चालू आहेत. तरीही त्यांना न जुमानता चीनने हा कायदा लागू केला आहे. भारतातील 'गल्वान' भागातही चीनने घुसखोरी केली. अनेक वर्षांनी भारत व चीन ह्या दोन देशांत त्यामुळे लष्करी चकमक उडाली. भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचेही ४० हून अधिक जवान मृत्युमुखी पडले. चीन ह्या प्रकारे का वागत आहे ह्यावर अनेक लेख वर्तमानत्रातून येत आहेत. भारताने लदाख भागांत लष्कराच्या हालचालींसाठी पूल, रस्ते मोठ्या प्रमाणावर बांधले ह्याचाही निषेध चीनने केला आहे. 
थोडक्यात कोणताही प्रश्न सोडवायचा नाही, आणि सोडवायचाच असेल तर तो चीनच्याच मताने सोडवायचा अशी काहीशी हट्टी भूमिका घेऊन चीन वावरताना दिसत आहे. दक्षिण चीन समुद्रातही असाच आडमुठेपणा चीन करत आहे. कोरोना रोगाचा प्रसार चीनमधून झाला असल्याने सारे जग चीनवर नाराज असतानाही चीनचा उद्दामपणा जराही कमी होत नाही. शी  जिनपिंग ह्यांच्या विरोधात देशांतील जनमत गेले आहे. ते दाबून टाकण्यासाठी राष्ट्रवादाचा चीन वापर करत आहे, असाही एक युक्तिवाद विश्लेषक करत आहेत. थोडक्यात येणारा काळ हा भारतासाठी परीक्षेचा असणार हे नक्की.
मधले पान लिहित असतानाच पंतप्रधान मोदी यांनी ५९ चीनी  अँप्सवर  बंदी घातल्याची बातमी आली. थोडक्यात चीनसोबतचे युद्ध भारत आता अनेक पातळ्यांवर खेळणार आहे हे भारताने स्पष्ट केले आहे.

चीनने तिबेटमध्येही लष्करी हालचालींना सुरुवात  केली आहे. चीनचे हे भूप्रदेश बळकावण्याचे राजकारण त्यांच्या अंगाशी येईल का हे येणारा काळच सांगेल.

असो. सध्या इथेच थांबते.
स्नेहा केतकर


4 comments:

  1. कट्ट्यातल्या लेखांईतकच वाचनीय सदर. मोजके शब्द - संयत मांडणी

    ReplyDelete
  2. अत्यंत रसाळ माहितीपूर्ण मधलं पान!

    ReplyDelete