कट्ट्यात 'मधले पान' द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला
घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे
वाटते.
‘सिडनी द एलिफंट’ हे निळ्या रंगाच्या गमत्या हत्तीचे पात्र ही जीन डाइच यांची जगाला देणगी. प्राग ह्या स्वरूपसुंदर शहरात त्यांनी ९५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आज लॉक डाउनला
महिन्याहून अधिक काळ झाला. सुरुवातीला असे वाटत होते की पंधरा दिवसांत गोष्टी
थोड्याफार सुरळीत होतील आणि मग आपले आयुष्य पुन्हा सुरळीत होईल. पण तसे झाले नाही
आणि होणारही नाही, हे आता सगळ्यांच्या लक्षात येते आहे. थोडक्यात, आता आपण
कोरोनासोबत राहण्याची सवय करून घ्यायला हवी. काळजी घ्यायला हवी. ती कशी घ्यायची हे
रोज सर्व माध्यमांतून सगळे सांगत आहेतच.
ह्या गडबडीच्या
काळातही काही योगायोग चटकन जाणवतात. दुसरे महायुद्ध संपल्याला ह्या वर्षी ७५ वर्षे
होत आहेत. आणि बरोबर ह्याचवेळी युद्धसदृश्य परिस्थिती जगात उद्भवलेली आहे.
युद्धाच्या काळात ज्याप्रमाणे मनुष्यहानी, वित्तहानी होते तशीच आताही झाली आहे. कोणाच्याही
स्वप्नात नसताना ह्या युद्धाला आपण सामोरे जात आहोत. असो!
युद्ध असो नाहीतर महामारी, जग काही
थांबत नाही हे खरेच. पण अशावेळी माणसांच्या स्वभावाचे विविध कंगोरेही समोर येतात. जोधपूरमध्ये
राहणाऱ्या लिखमाराम भादू ह्याच्या तिन्ही मुलींची लग्ने २९ मार्चला होणार होती.
दोन मुलींची लग्ने स्थगित करण्यात आली. पण तिसऱ्या मुलीचे लग्न मात्र स्थगित करता
येत नव्हते. कारण लग्नाशी संबंधित काही विधी सुरू झाले होते. त्यातूनही तोडगा काढत
लग्न २९ मार्चलाच झाले, पण अतिशय साधेपणाने झाले. नवरा मुलगा फक्त दोन लोकांसमवेत
आला. मुलीकडेही असेच दोन-तीन लोक होते. तोंडाला मास्क लावून लग्न झाले आणि नवरा
मुलगा घरी गेला. आता ह्या मुलीची बिदाई मात्र लॉक डाउन संपल्यावर तिच्या बाकी दोन बहिणींबरोबर
वाजतगाजत होईल. ह्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी ह्या कर्नाटकच्या माजी
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाचा केलेला विवाह सोहळा खटकणारा होता.
देशभरात सर्वच राज्यांची कोरोनाच्या विरुद्ध उपाययोजना जारी आहेत. ह्या लढाईत
अनेक राज्यांची वेगवेगळी कामगिरी नजरेत भरण्यासारखी आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश ह्या
दोन्ही मुख्यमंत्र्यांनी वेळेत तोडगा काढून अनेक मजुरांना उत्तरप्रदेशात नेले.
योगी आदित्यनाथ यांनी जवळजवळ १००० बसेसची सोय केली, तर केजरीवाल यांनी दिल्ली-यूपी
बॉर्डरवर जमलेल्या लोकांची दोन दिवस राहण्या-खाण्याची सोय केली. योगीजी सर्व
राज्यातून आपल्या लोकांसाठी बसेस पाठवत आहेत. हे करताना राज्यातही कायदा
सुव्यवस्था राखत आहेत हे विशेष. केरळमध्येही भाजप आणि कम्युनिस्ट पक्षाचे
कार्यकर्ते कोणतेही राजकारण न करता सगळ्यांसाठी झटत आहेत. ह्याचे मुख्य कारण तेथील
मुख्यमंत्री विजयन हे होय. एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने एका भाजप कार्यकर्त्यावर
व त्याच्या कुटुंबावर हल्ला केला, त्यावर विजयन यांनी कठोर कारवाई केली व त्या
कार्यकर्त्याला पक्षातून काढून टाकले. ह्या घटनेचा सकारात्मक परिणाम दोन्ही
कार्यकर्त्यांवर झाला आणि आत्ता इथे समाजकारण करण्याची गरज आहे हे त्यांना पटले.
दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात मात्र पालघर येथे दोन साधूंना जमावाने मारून
टाकले आणि पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही. महाराष्ट्रात कोरोना पेशंट्सची
संख्याही वाढत आहे. अशा वेळी महाराष्ट्राला एका कुशल प्रशासकाची गरज आहे. उद्धव
ठाकरे फेसबुक लाईव्ह वगैरे करून सगळ्यांशी संवाद साधत आहेत; पण शासनयंत्रणेवर
त्यांची पकड आहे असे वाटत नाही. आतापर्यंत 'मातोश्री'वर बसून सगळ्यांवर टीका करणे सोपे
आहे पण राज्य चालवणे हे तितके सोपे नाही हे त्यांच्या लक्षात आले असावे. तिकडे
ममता बॅनर्जींचे वेगळेच चालू आहे. केंद्राच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हेच
राजकारण असे त्यांना वाटते की काय? मात्र आता त्यांनी लोकांच्या स्वास्थ्याला
प्राधान्य द्यायला हवे.
अशा काही तद्दन राजकारणी बातम्यांत दिलासा देणाऱ्याही काही बातम्या आहेत.
राजस्थानमधील ‘सीकर’ गावातील प्राथमिक शाळेत गुजरात, मध्य प्रदेश येथील काही
मजुरांना विलगीकरणात ठेवले होते. तिथे रहात असताना त्यांच्या लक्षात आले की गेल्या
१५-२० वर्षांत शाळेला रंग काढलेला नाही. शाळेची नीट स्वच्छताही झालेली नाही.
त्यांनी गावाच्या सरपंचांकडे रंग, ब्रश, चुना ह्या सामग्रीची मागणी करत, शाळेला
रंग लावण्याचा प्रस्ताव मांडला. ह्या मजुरांनी आपल्या विलगीकरणाच्या काळात शाळेचे
रूपच पालटून टाकले. त्याकरिता त्यांनी काही मजुरीही घेतली नाही. ह्या शाळेत आम्ही
रहात आहोत, आसरा घेत आहोत, जेवत आहोत, तेव्हा ह्या शाळेला काहीतरी देणे हे आमचे कर्तव्यच आहे असे त्यांनी सांगितले.
अशा गोष्टी वाचल्यावर, ऐकल्यावर माणुसकी, सुसंस्कृतता आहे ह्याची खात्रीच पटते.
जीन डाइच हे व्यंगचित्रकार नुकतेच मरण पावले. अनेकांनी फक्त ‘टॉम आणि जेरी’ ह्या
कार्टून्सचा त्यांच्या
संदर्भात उल्लेख केला. पण खरे तर ‘सिडनी द एलिफंट’ हे निळ्या रंगाच्या गमत्या हत्तीचे पात्र ही जीन डाइच यांची जगाला देणगी. प्राग ह्या स्वरूपसुंदर शहरात त्यांनी ९५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
'खट्टा
मीठा' सिनेमा आठवतोय का? त्यातला रणजीत चौधरी ह्यांचे मुंबईत नुकतेच निधन झाले.
काही काही माणसे आपल्याला सदैव लहानच वाटत राहतात. रणजीत हे त्यापैकीच एक. निम्मी
ह्या नटीचेही २७ मार्चला निधन झाले. ५०च्या दशकातील ही लोकप्रिय अभिनेत्री.
नुकताच
२३ एप्रिलला पुस्तक दिन साजरा झाला. नेहमीप्रमाणे अनेक संदेशांची ह्या निमित्ताने
देवाणघेवाण झाली. पण साधारण याच दिवसाच्या आसपास अर्णब गोस्वामी ह्या पत्रकारावर
हल्ला झाला. हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला असे अर्णब गोस्वामी यांचे म्हणणे
आहे. अर्णब गोस्वामी हा पत्रकार आणि त्याची पत्रकारिता अनेकांना आवडत नाही. पण असे
असले तरीही ह्या हल्ल्याचा निषेध होणे आवश्यक आहे. विचारसरणी आवडत नसली तरीही
विचार मांडण्यावर गदा येता कामा नये.
अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ५०,००० लोक कोरोनाने मरण
पावले आहेत. पण तरीही त्यांच्या सरकारात एकूणच संदिग्धता जाणवते. युरोपातील स्थिती
हळूहळू सावरत आहे. असे असले तरीही येणारा काळ कसा असेल काही सांगता येत नाही. भारतात
काही ठिकाणी लॉकडाउन शिथिल करण्यात येणार
आहे. पण असे असले तरीही कोरोनाची तलवार सतत, निदान लस सापडेपर्यंत तरी लटकत राहणार हे विसरू नका.
काळजी घ्या आणि सकारात्मक विचार करा.
हिंदी मालिका व चित्रपट बरोबरच हॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा
गुणी कलाकार इरफान खान हे जग सोडून गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी बॉलीवूडचा chocolate hero ऋषी कपूर ने ह्या जगातून exit घेतली.
ऋषी कपूरचं "बाहरसे कोई अंदर ना आ सके" लाॅकडाऊनचं "signature गाणं" म्हटलं जात
होतं. पण दुर्दैवानं "उपर भी जाना हो मुश्किल" त्याच्या आणि इरफानच्या
बाबतीत खरं नाही ठरलं!
दोन चांगले कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्नेहा केतकर
Hi, I remember of current affairs of Vividha after reading your Madhle paan. You covered all the important events without any negative approach. Great editorial.
ReplyDeleteThanks ga!!!
ReplyDelete