कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक
असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.
आज 'मधले पान' लिहिताना हसता हसता रडणाऱ्या अर्जेन्टिना मधील महिला डोळ्यांसमोर येत आहेत. डोळ्यांतून अश्रू आणि चेहऱ्यावर हसु !!!!! अशी काहीशी स्थिती होती येथील महिलांची. गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा अर्जेन्टिना हा दक्षिण अमेरिकेतील मोजक्या देशांपैकी एक देश बनला आहे. तेथील महिलांची गर्भपाताला कायदेशीर मान्यता द्यावी अशी बऱ्याच काळापासून मागणी होती. ह्याआधी फक्त बलात्कार किंवा आईच्या जीवाला धोका असेल तरच गर्भपात करण्याची परवानगी होती. कट्टर कॅथलिक धर्माचे पालन करणाऱ्या देशांत हा कायदा हे एक मोठेच पुढचे पाऊल म्हणावे लागेल. ह्या कायद्यामुळे चोरून आणि धोका पत्करून गर्भपात करण्याला आळा बसेल आणि अनेक महिलांच्या जीवाशी चाललेला खेळही थांबेल अशी आशा आहे. २४ जानेवारीपासून हा नवा कायदा अस्तित्वात येत आहे.
अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सहजासहजी व्हाईट हाऊस सोडतील असे वाटत नव्हते. पण तरीही
त्यांनी आपल्या अनुयायांतर्फे कॅपिटॅाल हिलवर जो काही धिंगाणा घातला त्याचा तीव्र
शब्दांत निषेध करणे गरजेचे आहे. ट्रम्प निवडून आले तेव्हाही अनेकांनी मोर्चे काढून
नाराजी व्यक्त केली होती. निवडणुका म्हटले की हार-जीत आलीच. तो निर्णय मान्य करणे
हा लोकशाहीचा संकेत आहे. हाच संकेत जर अमेरिकन नेते आणि पर्यायाने जनता धुडकावून
लावत असेल, तर त्या देशातील विचारवंतांनी ह्यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
सर्व देशांना लोकशाहीचे धडे देणाऱ्या अमेरिकेला स्वतःच काही शिकण्याची गरज आहे हेच
यातून अधोरेखित होते.
आपला शेजारी देश पाकिस्तान सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे असे येणाऱ्या बातम्यांवरून दिसत आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या देशांत गॅसची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. नुकतीच जवळजवळ १८ तास पाकिस्तानातील वीज गायब झाली होती. आता अगदी सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित ह्या प्रश्नांमुळे सामान्य नागरिक खरोखरच हवालदिल झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करीमा बलोच ह्या बलुचिस्तान मधील मानवाधिकार कार्यकर्तीची हत्या झाली. ही हत्या टोरांटो ह्या कॅनडामधील शहरात झाली. २०१६ मध्ये तिने कॅनडामध्ये आश्रय घेतला होता. पाकिस्तानात आपल्या जीवाला धोका आहे असे तिला वाटत होते. स्वीडनमध्येही गेल्या मार्च महिन्यात साजिद हुसैन बलोच ह्या पाकिस्तानी पत्रकाराची हत्या करण्यात आली. ह्या दोन्ही हत्या पाकिस्तानच्या आर्मीतर्फेच करण्यात आल्याची शंका अनेकांना आहे. अशांत बलुचिस्तान, सिंध प्रांतातही अशांती आहे, सामान्य नागरिक हवालदिल अशा एकूण धोकादायक वळणावर पाकिस्तान उभा आहे.
नेपाळमध्येही तिथल्या कम्युनिस्ट पक्षांतर्गत कमालीची रणधुमाळी चालू आहे. नुकतेच के.पी. ओली यांना त्यामुळे पायउतार व्हावे लागले आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली. यापूर्वी या गटाने ओली यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते. चीनचा ह्या घडामोडीत हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतात कोरोनाची लस देण्याला सुरवात झाली आहे. त्यातही काही राजकारण करण्याचा प्रयत्न करण्याचा केला गेला. भारतात निर्माण केलेली लस घेण्याला काही जणांनी नकार दिला. ह्या लशीची खात्रीलायक, पुरेशी चाचणी झाली नाही असे काहींचे म्हणणे होते. अर्थात ही गोष्ट आता मागे पडली आहे असे दिसते आणि धडाक्याने लसीकरणाचे काम चालू आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही आटोक्यात येत आहे. आता शाळा ही सुरु होणार आहेत आणि इतर गोष्टीही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.
देशात लसीकरणाला सुरुवात झालेली असताना, मोदी सरकारकडून लस डिप्लोमसीही जोरात सुरु आहे. नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, मालदीव, सेशेल्स, मॉरिशस या शेजारी देशांना भारताने लसींचा साठा पाठवला आहे. अनेक पाश्चात्य देश फक्त स्वतःच्या देशासाठी लोकसंख्येच्या तिप्पट चौपट लसींचा साठा करत असताना आपल्या देशाची ही कृती नक्कीच गौरवास्पद आहे. 'हे विश्वची माझे घर' ही उक्ती सार्थ करणारी आहे.
ऑस्ट्रेलियात भारताने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकली. पहिली कसोटी अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने हरल्यावर भारत ही कसोटी मालिका जिंकेल असे कोणालाही वाटत नव्हते. ह्या विजयाचे श्रेय कप्तान अजिंक्य रहाणे आणि त्याच्या तरुण आणि अननुभवी सहकाऱ्यांना आहे. ब्रिस्बेन येथील खेळपट्टीवर अजिंक्य असणाऱ्या ह्या विजयाचे महत्व मोठे आहे.या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. जिंकण्याकरिता खेळणाऱ्या ह्या तरुण संघाचे मनापासून अभिनंदन!!!!!!!!!
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मंचावर असलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदी ह्यामुळे प्रचंड संतापल्या आणि त्यांनी आपला निषेध नोंदवत भाषण करण्यास नकार दिला. खरे तर ह्या प्रकारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नाराजी व्यक्त केली. पण त्याआधीच ममतादीदींनी आपला राग प्रखरपणे नोंदवला. येणाऱ्या प.बंगालच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर भाजपचे मोठे आव्हान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपवरील त्यांचा राग त्यांनी वेळोवेळी अनेकप्रकारे जाहीर केला आहे. चिडचिड, आदळआपट करण्यापेक्षा या आव्हानाचा राजकीय पातळीवर सामना करणे आवश्यक आहे. पण ते कौशल्य ममतादीदींकडे दिसत नाही. राजकारणात संयम हा गुण हा फार महत्त्वाचा असतो आणि नेमका या गुणाचाच त्यांच्यात अभाव दिसतो. सतत उकरून भांडण काढण्याचा त्यांचा स्वभाव आणि डोक्यावर बर्फ ठेवलेले, आणि आपल्या देहबोलीतून व भाषणातूनही आपल्या मनात काय चालले आहे ते न दाखवणारे मोदी, ह्या दोघांतील हा सामना पाहणे हे नक्कीच रोचक असणार आहे.
गेले दोन महिने चाललेल्या किसान आंदोलनाला अखेर हिंसक वळण लागलेच. कोणतेही आंदोलन उभे करणे, ते चालवणे आणि ते योग्य रीतीने संपवणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. खरे तर हे काही देशव्यापी वगैरे आंदोलन नाही. मुख्यत्वे पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी उभे केलेले हे आंदोलन आहे. कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही उलट त्यांना मोठी बाजारपेठ मिळेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथन आणि इतर अनेक कृषी तज्ञांनी हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आहेत हे म्हटले आहे. पण ही गोष्ट शेतकऱ्यांना समजावून देण्यात मोदी सरकार कमी पडले असेच म्हणावे लागेल. आणि आता शेतकरीही अत्यंत अडेलतट्टू भूमिका घेत कायदे रद्दच करा हीच मागणी पुढे रेटत आहेत. त्यात काल झालेल्या हिंसाचारामुळे अधिकच पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आता खरेतर सरकार आणि आंदोलनकर्ते अशा दोघांचीही परिक्षा आहे. दोघांनीही पेच सोडवण्याची भूमिका घेतली पाहिजे अन्यथा हे आंदोलन चिघळतच जाईल.
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. नारळीकर यांनी जे लेखन केले, ते वाचकप्रिय झाले कारण अतिशय सोप्या भाषेत त्यांनी हे लेखन केले. विज्ञानाचे गूढ जग त्यांनी सामान्यांच्या घरात पोहोचवले. त्यामुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले. 'यक्षांची देणगी' पासून सुरु झालेल्या ह्या प्रवासामुळे मराठी साहित्याने विज्ञानाला आपलेसे म्हटले. त्यामुळे मराठी वाचकांच्या ज्ञानात तर भर पडलीच; आणि या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची वृत्ती समाजात निर्माण झाली. डॉ. नारळीकर यांचे मनापासून अभिनंदन.
'लॅरी किंग
लाइव्ह' हा कार्यक्रम तुम्ही पाहिलाय का? प्रसन्न मुद्रेने मुलाखत घेणारा हा
पत्रकार-संवादक नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. अत्यंत साधेपणाने प्रश्न
विचारणारे, कोणताही अभिनिवेश नसणारे, कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न राबवणारे
हे पत्रकार आजच्या काळात विरळाच म्हटले पाहिजेत. समोरच्याला बोलते करण्याचे काम
त्यांनी मनापासून केले.
त्यांच्याप्रमाणेच सत्या पॅाल ह्या प्रसिद्ध डिझाईनरचे नुकतेच निधन झाले. साडीतील सौंदर्य त्यांनी जाणले आणि ते संपूर्ण जगापुढे नजाकतीने मांडलेही. साडीत वेगवेगळ्या भौमितिक आकारांचे डिझाईन त्यांनी आणले. अंगभर एकच एक डिझाईन हे गृहीतक ही त्यांनी बदलले. भपकेदार वाटणारे गडद रंग ते वापरत. गुलाबी, लाल, गुलबक्षी रंग तर होतेच; त्या रंगांना, विरोधी नाही, पण मिश्र आणि अनवट छटांची जोड सत्या पॉल अशी काही देत की, रंगांचे पारंपरिक अर्थ बदलून जात. शिफॅानमधील त्यांनी डिझाईन केलेली साडी अत्यंत देखणी दिसत असे. साडी डिझाईनर ही concept च आपल्याकडे नव्हती तेव्हापासून त्यांनी आपल्या लेबलचे पहिले दुकान काढले. भारतीय साडीला अत्यंत आकर्षक रुपात त्यांनी जगाच्या फॅशनच्या दुनियेत पेश केले.
ह्या आपापल्या
क्षेत्रांत एका अर्थाने pioneer असलेल्या दोन्ही कलंदर व्यक्तिमत्वांना मन:पूर्वक
श्रद्धांजली!!!
आज इथेच
थांबते.
स्नेहा केतकर
Comprehensive - टिप्पणी विचार करायला लावणारी - पण म्हणजे सगळं नेहेमीप्रमाणेच.
ReplyDelete