मधले पान


ऑगस्ट महिना आणि पावसाचे एक अतूट नाते आहे. ह्या महिनात साधारणपणे सगळया देशांत धुवांधार पाऊस पडत असतो. पण ह्या महिन्यात बातम्यांचा इतका पाऊस आहे की 'मधले पान' मध्ये मी काय घेऊ आणि काय नको असा माझा गोंधळ झाला आहे. 
सुरवात मागील महिन्यात घडलेल्या महत्वाच्या बातमीनेच करते. 

३० जुलैला अखेर तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले. ह्यासाठी सरकारचे मनापासून अभिनंदन!!!!! महिलांवरील अन्यायकारक असणारा हा इस्लामी कायदा खरेतर ह्याआधीच रद्द व्हायला हवा होता. अनेक मुस्लीम देशातही तिहेरी तलाक वर बंदी असताना आपण हा कायदा रद्द करायला विनाकारण उशीर केला होता. असो. 'देर आये दुरुस्त आये'!

ऑगस्ट महिना सुरु होताच अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली. प्रवाश्यांनी परत जावे असे सरकारने सुचवले. सगळया लोकांना प्रथम घातपाताची सूचना मिळाली की काय अशी शंका आली. काश्मीरमधील बंदोबस्त वाढवण्यात आला. असे असले तरीही ५ ऑगस्टला राज्यसभेत ३७० कलम रद्दबातल करण्याचा प्रस्ताव आपले गृहमंत्री मांडतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. हे कलम कधीही रद्द होऊच शकत नाही असे ओरडून, धमकावून सांगणाऱ्यांची संख्या एवढी होती की असे काही घडेल ह्या शक्यतेचा विचारच कोणी केला नव्हता. ह्या धक्क्यातून बाहेर यायला सगळ्यांनाच वेळ लागला. ज्या चतुरपणे, काळजीपूर्वक योजनाबद्ध रीतीने ही गोष्ट केली गेली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. 
सगळ्यांना विचारायला हवे होते, असे दांभिकपणे सांगणारे पत्रकार, विरोधक - त्यांना कुणकूण ही कशी लागली नाही ह्यामुळे अस्वस्थ झाले होते. अर्थात एवढा मोठा निर्णय असाच घ्यावा लागणार होता हे स्पष्ट आहे. आता लवकरात लवकर काश्मीर मधील स्थिती सर्वसामान्य व्हावी ही इच्छा!
ह्या निर्णयाने पाकिस्तान अक्षरशः बिथरला आहे. रोज येणाऱ्या त्यांच्या वक्तव्यांनी तर असेच वाटत आहे. त्याशिवाय आन्तरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानला कोणाचा पाठींबा नाही. 
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात पाकिस्तानचा उल्लेखही केला नाही. पण पाकिस्तान काहीतरी कागाळी करणार अशी लक्षणे दिसत आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

नुकतेच G-7 या देशप्रमुखांच्या बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले होते. त्या ठिकाणी ट्रम्प भेटले असताना काश्मीर हा उभय देशातील मुद्दा आहे हे मोदींनी त्यांना स्पष्ट केले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही आपले पंतप्रधान भेटले. लंडन मध्ये भारताच्या स्वातंत्र्य दिनी जो निंदनीय प्रकार घडला त्यावर निषेध नक्कीच व्यक्त केला गेला असणार. हे गृहस्थ 'ब्रिटनचे ट्रम्प' म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकतेच ब्रिटिश पार्लमेंट काही मुदतीसाठी तहकूब केले आहे. त्यावर ही ब्रिटनमध्ये निदर्शने चालू आहेत. येणारा काळ बोरिस जॉन्सन आणि ब्रेक्झिट गाजवणार हे नक्की.

हॉन्गकॉन्ग येथील निदर्शने थांबण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. हे बेट आता चीनच्या अंमलाखाली असल्याने थोडी काळजी आंतरराष्ट्रीय समूहाला वाटत आहे. तिआननमेन चौकातील घडलेला प्रकार अनेकांच्या स्मरणात असेलच. पाहू काय होते ते!

झाकिर नाईक ह्या इस्लामिक पीस फौंडेशनच्या प्रमुखास मलेशिअन मंत्र्यानेच झापले आहे. मलेशियात हिंदू धार्मिक लोकेही अनेक आहेत. त्यामुळे तेथे धार्मिक तेढ निर्माण होणे मलेशियाला परवडणारे नाही.
खेळातील घोडदौड
भारताच्या पी.व्ही. सिंधूने बासिल, स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. असे करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-७, २१-७ असे सरळ हरवले. दोनदा विजेतेपदाने हुलकावणी दिल्यामुळे ह्या वेळी मिळालेले विजेतेपद खासच आहे. ह्याच जागी पॅरा बॅडमिंटन स्पर्धाही घेण्यात आल्या. भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूच्या जागतिक विजेतेपदाबरोबरच मानसी जोशीनेही पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदवले आहे. 


बासेल येथील वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3 च्या अंतिम सामन्यात भारताच्याच पारुल परमारचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मानसीने 21-12, 21-7 च्या फरकाने पारुल परमारवर विजय मिळवला. तिचे ही खास कौतुक. एका अपघातात २०११ मध्ये तिने आपलं पाय गमावला. तरीही निराश न होता तिने आपला हा प्रवास जरी ठेवला हे महत्वाचे!!

प्रियदर्शिनी पवार हे नाव ऐकलंत का तुम्ही? पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस अशी १२०० किलोमीटरची फ्रान्समधील सर्वात जुनी सायकलिंग स्पर्धा आहे. 
१८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या दरम्यान ती दर वर्षी घेतली जाते. ह्या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. आणि हे अंतर तिने ९७ तासांत पूर्ण केले. ह्या स्पर्धेत देशोदेशीच्या ६००० स्पर्धकांनी भाग घेतला होता. 

तिच्यासोबत तीन अन्य भारतीय महिलाही होत्या. ही एक प्रकारे शारीरिक शक्तीचीच कसोटी घेणारी स्पर्धा आहे. हे स्पर्धा स्वतःशीच असते. उन, वारा पाऊस आणि थंडी ह्यांना तोंड देत हे अंतर तिने कापले. तिचे मनापासून अभिनंदन. तिचे वडील नेव्हीत असल्याने भारतीय नौदलाकडूनही तिचे कौतुक करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयींचे निधन गेल्या ऑगस्टमध्ये झाले. तेव्हापासून ह्या ऑगस्टपर्यंत भाजपच्या चार नेत्यांचे अकाली निधन झाले. अनंतकुमार, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे ते नेते होत. ह्या नेत्यांना भाजप सत्तेत असताना, आणि त्यांच्या अनुभवाची पक्षाला आणि देशाला गरज असताना काळाने आपल्यातून ओढून नेले ह्याचे अतोनात दुखः वाटते. ह्याच महिन्यात विद्या सिन्हा आणि खय्याम यांचाही मृत्यू झाला. एक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले होते. खय्याम यांची गाणी आणि गझल तर न विसरता येणारी. त्यांना श्रद्धांजली!!!!

अमेझॉन मधील जंगल अजूनही जळत आहे. त्यावर कट्ट्यात वेगळा लेख दिलेला आहेच. 
एकूणच अनेक कारणांनी हा ऑगस्ट महिना संस्मरणीय ठरला हे नक्की.


स्नेहा केतकर



1 comment:

  1. It was the most happening month on both National and international level. Feel proud to be an Indian. Removal of Article 370 is the feather in the cap of Modi Government.

    ReplyDelete