मधले पान

 कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

नोव्हेंबर महिना सुरु होताना अमेरिकेची निवडणूक आणि भारतात बिहार आणि अन्य राज्यांतील पोट निवडणुकांचे पडघम वाजतच होते. ३ नोव्हेंबरला अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक पार पडली. जो बायडेन निवडून आले असे सर्वजण म्हणत असले तरीही विद्यमान अध्यक्ष ट्रम्प हे मानायला तयार नाहीत. रोज त्यांची नवी नवी वक्तव्ये येत असतात आणि वाचणाऱ्याला बुचकळ्यात टाकत असतात. पण तरीही अमेरिकेतील सत्तांतर शांतपणे होईल अशी आशा करूया.


बिहारमधील अटीतटीची निवडणूक ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकली. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने सत्तेत असलेल्या NDA ला जोरदार टक्कर दिली. पण काँग्रेस मात्र परत एकदा निष्प्रभ ठरली आहे. सत्तर जागांवर लढून काँग्रेसने फक्त २० जागा जिंकल्या. त्याचवेळी AIMIM ह्या ओवैसींच्या पक्षाने १९ जागांवर लढून ५ जागा जिंकल्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी तेजस्वी यादवांच्या विरोधात गेल्या. त्याचप्रमाणे सत्तेत आल्यास आपण दहा लाख नोकऱ्या देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले होते. ह्या नोकऱ्या ते कशा देणार आहेत हे त्यांनी सांगायला हवे होते. आता नुसत्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्याइतकी बिहारची जनता भाबडी राहिली नाही. त्यामुळेच त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचे परिवर्तन मतांत झाले नसावे.

बिहारच्या निवडणुकीनंतर सगळ्यांचेच लक्ष परत कॉंग्रेसकडे वळले. सुदृढ लोकशाहीत समर्थ विरोधी पक्ष ही महत्त्वाचा असतो. कॉंग्रेसकडे त्याच आशेने सर्व पाहत आहेत. पण त्या पक्षांत काही बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रकवी रामधारी सिंह 'दिनकर' ह्यांच्या काही प्रसिद्ध काव्यपंक्तीची ह्यावेळी आठवण होते.

समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध

जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

ह्याच विचाराने 'तटस्थ' न राहता कपिल सिब्बल यांनी परत एकदा काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा ह्याची आठवण करून दिली आहे. नेमक्या अशा वेळी काँग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जाणारे अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. श्री अहमद पटेल हे सोनिया गांधीचे जवळचे सल्लागार मानले जात होते. त्यांच्या जाण्याने सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

 

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचेही निधन झाले.
आसामचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद त्यांनी भूषविले. २००१ मध्ये आसामची आर्थिक परिस्थिती डळमळीत होती. उल्फा आणि बोडो अतिरेक्यांचे हल्ले वाढत होते. ही सारी आव्हाने पेलून त्यांनी आसामची गाडी रुळावर आणली. दहशतवादाला आळा घालतानाच, त्यांनी मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू केली. शांतता आणि विकास एकत्रित झाल्याने त्याचा आसामला फायदाच झालाअसा गोगोई यांचा दावा होता. काँग्रेस नेतृत्वाने गोगोई यांना मुक्त वाव दिला. त्यांना ही अहमद पटेल यांच्या प्रमाणे कोरोनाचा संसर्ग झाला व त्यातून त्यांची प्रकृती खालावत गेली. काँग्रेसमधील सध्याच्या गोंधळात शांत व संयमी गोगोई यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता होती.

महाराष्ट्रांत महाविकास आघाडी सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र मुख्यमंत्री आणि संजय राऊत ह्यांची भाषा राजकारण्यांना शोभेल अशी नाही. शेवटी न्यायालयाने संजय राऊत यांना समज दिली आहे. अर्नब गोस्वामी ह्या पत्रकाराला ह्याच महिन्यात अटकही झाली आणि मग त्याची सुटकाही झाली. कंगना राणावत व तिच्या बहिणीनेही अटकपूर्व जामीन घेतला आहे. हे सर्व पाहून असे वाटते की प्रत्येकानेच बोलताना लिहिताना विचार करायला हवा. पत्रकार आणि राजकारणी ह्यांनी तर विशेषकरून करायला हवा. माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे मानतात. पण सध्याच्या काळात हा स्तंभ दुभंग झाला असून काही पत्रकार एका बाजूने तर काही दुसऱ्या बाजुला झुकलेले दिसतात. सत्य, लोकशाही याप्रती निष्ठा ठेवून जनतेसमोर प्रत्येक विषयाच्या सर्व बाजू मांडणे, आणि यासाठी अभ्यास करणे या गोष्टी भूतकाळजमा झाल्या आहेत असे वाटते. कंगना, स्वरा भास्कर ह्या अभिनेत्री आहेत. त्यांना राजकीय मते असणे स्वाभाविक आहे. पण ती कशी मांडावीत हे देखील कळायला पाहिजे. असो.

नुकताच उत्तरप्रदेश सरकारने आंतरधर्मीय विवाहाबाबत एक अध्यादेश आणला आहे. 'बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०' असे या कायद्याचे नाव आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाने त्याचा मसुदा तयार केला असून, तो विधी विभागाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. या कायद्यानुसार, केवळ लग्नाच्या हेतूने जर एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जर मुलीचं धर्मांतर करण्यात आलं तर ते लग्न अमान्य केलं जाईल. सज्ञान हिंदू मुलीला स्वत:च्या मर्जीने धर्म बदलून मुस्लीम मुलाशी विवाह करण्याचा अधिकार आहे, हे अलाहाबाद न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात अधोरेखित केले. परंतु दोन भिन्नधर्मीय व्यक्ती जेव्हा विवाह करतात, तेव्हा केवळ त्या विवाहासाठी एका व्यक्तीला आपला धर्म सोडायला सांगणं ही चिंतेची बाब आहे, हाही मुद्दा या प्रकरणात न्यायालयाने नमूद केला. अशाच प्रकारचा कायदा इतर भाजपा शासित प्रदेशातही आणला जाईल अशी बातमी आहे.

मात्र अशा प्रकारचे धर्मांतरविरोधी कायदे इतरही राज्यांत आधीपासून अस्तित्वात आहेत हे सगळ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. हे कायदे प्रामुख्याने ख्रिस्ती मिशनरी करत असलेल्या धर्मांतराविरुद्ध होते. मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये फार प्राचीन काळापासून युद्धे होत होती. ही प्रामुख्याने धर्मयुद्धे होती. आपापल्या शांतताप्रिय धर्माचा प्रसार अतिशय हिंसक पद्धतीने हे धर्म करतात. त्याला आडकाठी करणे हा या कायद्यांचा मुख्य उद्देश आहे. Special Marriage Act अंतर्गत आंतरधर्मीय विवाह करता येतो. ह्या लग्नासाठी कोणालाही धर्म बदलावा लागत नाही. आपल्या संविधानाने आपल्याला आपला धर्म पाळण्याचे दिलेले स्वातंत्र्य हे कोणत्याही कारणास्तव धोक्यात येत कामा नये, हा विचार  समाजात रुजणे महत्त्वाचे आहे.

RCEP - आरसीईपीमधून बाहेर पडण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल जोरदार गोंधळ सुरू आहे. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर भारताने या करारावर स्वाक्षरी केली तर भारतीय SME ला  बराच  फायदा होईल, तर काहीजण म्हणतात की यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्राचे नुकसान होईल. भारताने प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) करारात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीईपी शिखर परिषदेदरम्यान चीन हा करार करण्यास जोरदारपणे दबाव आणत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र या करारामध्ये भारताच्या चिंता सोडवल्या गेल्या नाहीत वा त्या संदर्भात काहीही पावले उचलली गेली नाहीत म्हणून या निर्णयावर ठाम राहिले आहेत.

खरे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक घडामोडी घडत आहेत. थायलंड मधील लोकशाही समर्थकांची निदर्शने चालूच आहेत. युरोपातील अनेक देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अमेरिका आणि कॅनडा येथेही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आनंदाची गोष्ट ही की आता कोरोनाची लस लवकरच येईल अशी आशा वाटत आहे. सारे जग त्याकडे डोळे लावून बसले आहे.

ह्या महिन्यात अनेक दिग्गजांनी ह्या जगाचा निरोप घेतला. शॅान किंवा सीन कॉनरी हा जुन्या पिढीचा आवडता James Bond. जेम्स बॉण्डच्या अजरामर व्यक्तिरेखेमुळे शॉन यांना अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. पण तरीही जॉन गिलगुड (मर्डर ऑन द ओरिएण्ट एक्स्प्रेस’) सारख्या शेक्सपिअरी अभिनेत्यासमोर वा ऑड्री हेपबर्नसारख्या अभिनेत्रीसोबत (रॉबिनहूड’) पडद्यावर येण्या ते घाबरले नाहीत. बॉण्डच्या इमेजमधून बाहेर पडण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. सौमित्र चॅटर्जी हे बंगालमधील दिग्गज अभिनेते. सत्यजित राय यांचे ते आवडते होते. त्यांच्या चौदा चित्रपटांतून सौमित्र आपल्याला भेटतात. चित्रपट, नाटक, वाचन, painting हे त्यांच्या आवडीचे विषय. ते कविताही करायचे. अभिनयावर प्रेम करणाऱ्या ह्या दोन कलाकारांना आमचा मानाचा मुजरा.

त्यांच्याप्रमाणेच फूटबॅालचा सम्राट दिएगो मॅराडोना याचेही निधन झाले. अर्जेंटिनाला जगाच्या नकाशावर त्याने फूटबॅालच्या सहाय्याने आणले. अर्धे-अधिक फुटबॉलजगत त्याला देव मानते, ते त्याच्या मैदानावरील कौशल्यामुळे. जगभरातल्या किमान दोन पिढय़ा फुटबॉलवर लट्टू झाल्या त्या मॅराडोनासारख्या जादूगाराच्या खेळावर भाळून. वयाच्या पंचविशीतच त्याने जणू देवत्व मिळवले.

 


भारतीय संगणक उद्योगाचे पितामह फकीर चंद कोहली यांचेही नोव्हेंबर अखेरीस निधन झाले. मॅसेच्युसेटस येथून अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण घेऊन आलेल्या ह्या तरुणाला JRD नी अचूक हेरले. प्रथम ते टाटा पॅावर मध्ये रुजू झाले. टाटा पॉवरमध्ये असताना त्यांच्या कल्पनेतून आयलँडिंगतंत्रज्ञान विकसित झाले हे अनेकांना ठाऊकही नसेल. समस्त महाराष्ट्रात वीजपुरवठा खंडित झाला तरीही मुंबईस वीज पुरवठा चालूच असतो. त्यासाठीचे गुंतागुंतीचे तंत्रज्ञान ही कोहली यांची निर्मिती. टीसीएसला आपण टाटा समूहाची अग्रणी कंपनी होण्याइतके मोठे करू शकतो, हे कोहली यांनी ताडले आणि त्यातूनच या कंपनीचा प्रचंड विस्तार झाला. त्यांचे नाव 'फकीर चंद' असले तरी त्यांच्यामुळे अनेक तरुणांना श्रीमंतीची वाट गवसली. संगणक हा शब्द ही येथे कोणाला माहित नसताना ह्या तंत्रज्ञानाचे मोल त्यांनी जाणले आणि देशासाठी उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत त्यांनी निर्माण केला. ह्या श्रीमंत फकिराला मनापासून मानवंदना.

 आज इतकेच.

या लेखातील सगळी छायाचित्रं गुगलच्या सहाय्याने घेतली  आहेत 

 

स्नेहा केतकर




3 comments:

  1. everything covered , thumbs up Sneha

    ReplyDelete
  2. अतिशय सविस्तर आणि माहितीपूर्ण आढावा!

    ReplyDelete