मधले पान

नव्या वर्षात मधले पान लिहिताना खरे तर अगदी सकारात्मक बातमीने सुरवात करायची माझी इच्छा होती पण आजुबाजूचा माहोल काही तसा नाही. रोज पेपरातून कॉरोना विषाणूच्या संसर्गाची बातमी येतेय. चीन मधील सर्वच बातम्या ह्या तेथील राजवटीमुळे अतिशय मोजून मापून येतात. त्यामुळे त्यांनी आधी ह्या संसर्गाची बातमी दडपून ठेवली असणार यात शंका नाही. मात्र आता गोष्ट हाताबाहेर जातेय असे वाटल्यावर ह्या बातम्या येतायत.


त्याचप्रमाणे अमेरिकेत अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यात येत आहे. त्या
मुळे तेथील राजकारणातही उलथापालथ सुरु आहे. वर्षाच्या सुरवातीलाच इराणच्या कासीम सुलेमानी यांची हत्या अध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशाने झाली. त्यामुळे जगात एकच खळबळ उडाली. जणू काही तिसरे महायुध्द सुरु झाले अशा तऱ्हेचे वातावरण होते. इराण अमेरिकेच्या वाळवंटी राजकारणात कधीच प्यादे नव्हता आणि त्यामुळे त्या देशाचा कासीम सुलेमानी हादेखील कधीच अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर झाला नाही. यंदाच्या वर्षांत निवडणुका नसत्या तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा महत्त्वाचा लष्करी अधिकारी मेजर जनरल कासीम सुलेमानी यास ठार केले असते का, हा प्रश्न अमेरिकेत विचारला जात असून तो अस्थानी नाही.

ब्रिटनमध्ये आता बोरिस जॉन्सन निवडून आले आहेत आणि आता ३१ जानेवारीला ब्रिटन युरोपियन समुहातून बाहेर पडेल. यातील अटी-शर्तींबद्दल आता कोणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत ही नाही. ही एक्झिट होण्याआधीच मेगन आणि हॅरी या दोघांनी ब्रिटिश राजघराण्याच्या वर्तुळातून एक्झिट घेतली आहे. ही ब्रिटिशांना आणि तिथल्या राजघराण्याला धक्कादायक बातमीच होती. असो. स्वतःच्या हिंमतीवर जगण्याच्या त्यांच्या ह्या निर्णयाचे अनेकांनी स्वागतही केले असणार यात शंका नाही.
आपल्या देशांत ही खळबळ सुरूच आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ह्या दोन गोष्टी एकत्र करून त्याविरोधात आंदोलने चालूच आहेत. दिल्लीत शाहिन बागेत गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शने चालू आहेत. मला व्यक्तिशः ह्या आंदोलनाचे फोटो पाहिले की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ह्यात अनेक मुस्लीम महिला दिसतात. मुस्लीम महिला इतक्या जागरूक असतील तर ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण मग हा जागरूकपणा तिहेरी तलाक विरोधात किंवा आजही त्यांना मशिदीत व दर्ग्यात जाता येत नाही, त्यांच्यावर धर्मात सांगितले म्हणून जे अन्याय होतात त्याविरोधात कसा दिसला नाही याचे आश्चर्य वाटते.

महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आले खरे पण त्यांची काम करण्याची गती संथ आहे हे जाणवते. झारखंडमध्ये निवडणूक झाली आणि तिथे भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. आता पुढील निवडणूक दिल्लीत आहे. दिल्ली दूर आहे की जवळ हे आप-भाजप-काँग्रेस ह्यांना लवकरच कळेल.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात चालत असलेल्या सतत आंदोलनांमुळे एका नामांकित विद्यापीठाची प्रगती थांबेल हे कोणालाही कळत नाही ही दु:खाची बाब आहे. ह्यावर आता काय बोलावे हे ही कळेनासे झाले आहे. ह्या विद्यापीठाला राजकारणाने आणि राजकारण्यांनी घेरले आहे. माध्यमे ह्या आगीत तेल ओतण्याचेच काम करीत आहेत. ह्या आगीत तिथला विद्यार्थी, कर्मचारी वर्ग हा मात्र होरपळून निघत आहे.
ह्यामुळेच दीपिका पादुकोण तिथे उपस्थित राहिली ह्यावरही राजकारण झाले. तिने निर्मिलेल्या 'छपाक' ला अपेक्षित यश मिळाले नाही असे दिसत आहे. अर्थात याचे कारण तितक्या तीव्रतेने लक्ष्मी अगरवालची व्यथा पडद्यावर साकारण्यात दिग्दर्शिका कमी पडली असे समीक्षकांचे मत आहे.


'मधले पान' लिहित असतानाच विद्या बाळ गेल्याची बातमी आली. अशी बातमी आली की विषण्ण वाटते. माझी पिढी विद्याताईंना एक चतुरस्त्र संपादिका म्हणून ओळखते. 'स्त्री' मासिकाचे त्यांनी जवळजवळ २२ वर्षे संपादकपद सांभाळले. एका पिढीच्या वैचारिक पोषणाची जणू त्यांनी जबाबदारी घेतली होती. प्रामुख्याने स्त्री-पुरुष समानता हा त्यांच्या चळवळीचा गाभा होता. माणुसकी, वैचारिक वृद्धी आणि संवेदनशीलता ह्या मुल्यांशी इमान राखत त्या जगल्या. आयुष्याच्या अखेरच्या दिवसातही इच्छामरण असावे ह्यासाठी त्या संघर्ष करीत राहिल्या.
आज इथेच थांबते.


स्नेहा केतकर


2 comments:

  1. त्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारीला मी पुण्यातच होते.ऐकून धक्का बसला.पार्थिवाच्या दर्शनाला जाऊन आले.विद्याताईंना पाहून अनेक आठवणी आल्या..एक तळमळीने काम करणारे उमदे व्यक्तिमत्व हरपले.आदरांजली!!

    ReplyDelete