मेकिंग ऑफ सुपरहिरो


शेवटी इकडे तिकडे बघून रुमानीने ती चमकणाऱ्या बांगडीसारखी गोष्ट हळूचकन उचलून दप्तरात टाकली आणि ती घराकडे रमतगमत निघाली. घरी पोचल्या पोचल्या अन्नीने गरमागरम सूप दिल्याने स्वारी जाम खुश होती. "अन्नी, अगं आज किनई भारी गम्मतच झाली!" रुमानीने सांगायला सुरुवात केली, पण आई उर्फ अन्नी म्हणाली, "पिल्लुडी, माझा कॉल चालूये, आपण रात्री झोपताना गम्मत ऐकू या, चालेल?” रुमानीने खांदे उडवले आणि देवने, तिच्या बेस्ट मित्राने, हाक मारली म्हणून पळूनसुद्धा गेली. आज ती आणि देव खूप खूप खेळले. झाडावर चढले, फुलपाखराच्या मागे चिंगाट पळाले. घरी येईपर्यंत रुमानी ती बांगडीची गोष्ट विसलीही होती! रात्री दमून झोपी गेली. मध्यरात्री अचानक तिला कुणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं, एकदा, दोनदा, तीनदा... आवाज येतच होता, तिला जाग आली आणि ती डोळे चोळत इकडे तिकडे पाहू लागली तर आवाज दप्तरातून येत होता. रुमानीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, अरे, ती चमकती बांगडी घरी बघायची राहिलीच!! तिने हळूच ती काढली तर आवाज त्यातूनच येत होता. हळूहळू बांगडी सरळ झाली आणि तिच्या एका टोकाकडून एक सुंदर सोनेरी पंख असलेली परी बाहेर आली. रुमानीचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि ती बघतच बसली. ती सोनेरी परी कसनुसं हसली आणि म्हणाली, “मी खूप लांब प्रवास करताना पावसात भिजले आणि पंख काही हलेनात, त्यामुळे माझी शक्ती-माझी जादू काही काम करत नाहीये. तू मला मदत करशील का?” रुमानीचा तर विश्वासच बसत नव्हता आणि आता परी बोलतेय असं बघितल्यावर तर रुमानी हरखूनच गेली!! तिला परीला काय विचारू आणि काय नाही असा होऊन गेलं. ती खूप प्रश्न विचारू लागली. पण मग तिच्या लक्षात आलं की परी थकलीये! तिने परीला थोडं पाणी प्यायला दिलं आणि तिला भातुकलीमधल्या मऊ छोट्याश्या खुर्चीवर बसवलं आणि म्हणली, "तू खरंच आहेस? गोष्टीत नाही, समोर आहेस? ए मी एकदाच तुझ्या पंखांना हात लावू?"  असं म्हणून तिने अगदी अलगद परीच्या पंखावरून हात फिरवला! आजीच्या मऊ मऊ साडीचीच आठवण तिला झाली! कधी एकदा हे सगळं देवला सांगेन असा झालं तिला, तेवढ्यात तिच्या मनातलं वाचून परी म्हणाली, "रुमु, मी इथे असेपर्यंत तू कोणाला काही सांगायचं नाहीस हं.. कारण मी तुझ्याशिवाय कुणाला दिसणार नाही. मी तुला सापडले आहे कारण तू नेहमी दुसऱ्यांना मदत करतेस, आणि कुणीही चांगलं वागलं की परिस्तानमध्ये एका परीचा जन्म होतो. तू मागे तुझ्या बिल्डिंगखाली एका जखमी कुत्र्याला मदत केली होतीस त्याला शेल्टरमध्ये घेऊन गेली होतीस तेव्हा परीस्तानात माझा जन्म झाला.” रुमानी दंग होऊन ऐकत असताना परी म्हणाली, "आता काही दिवस मी माझी शक्ती आणि जादू तुला देणार आहे. माझे पंख वाळेपर्यंत!! तू सगळ्यांना मदत करशील आणि शक्तीचा योग्य उपयोग करशील अशी माझी खात्री आहे." रुमानीला तर काय बोलावे सुचेना, कारण काही दिवसांसाठी ती सुपरहिरो होणार होती, चुटकीसरशी इकडून तिकडे जाणार होती. परीने तिला समोर बसवले तिचे हात हातात घेतले आणि ती मंत्र पुटपुटू लागली, "असतो प्रत्येकाकडे युक्तीचा तारा, जोड मिळू दे शक्तीची जिंकायला खेळ सारा." अचानक रुमानीच्या डोळ्यासमोर खूप लख्ख प्रकाश पसरला आणि एका सेकंदात नाहीसा पण झाला. 

आता तिच्याकडे जादूची शक्ती आली होती त्याने ती सगळ्यांच्या मनातलं वाचू शकत होती, अगदी छोटा आकार घेऊन कुणाच्याही नकळत इकडे तिकडे जाऊ शकत होती! रुमानीला तर आकाशच हातात आल्यासारखं झालं. त्याच आनंदात तिला कधी झोप लागली तिला कळलंही नाही!

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे रुमानी उठली, दात घासून खाली स्वयंपाकघरात आली. अन्नीची नेहमी प्रमाणे गडबड चालू होती. रुमानीने आरामात दुधाचा ग्लास उचलला आणि टंगळमंगळ करत दूध पीत राहिली पण अचानक कुणीतरी कानात कुजबुजल्यासारखं म्हणालं, "रुमुने पटापट आवरलं तर आज ऑफिसला लवकर जाते. खूप कामं पेंडिंग आहेत, ती पटकन उरकली तर रुमुला छान वेळ देता येईल. माझं पिल्लू माझ्याशिवाय किती तरी वेळ राहतं." रुमुला कळलं की हा आईच्या मनातला आवाज आहे, रुमुने ठरवलं आता एकदम शहाण्यासारखं वागायचं आणि अन्नीला मदत करायाची! तिने पटकन दूध, संपवलं पटापट अंघोळ केली, ड्रेस घातला न रडता वेणीही घातली. आईला तर धक्केच बसत होते. म्हणता म्हणता रुमानी तयार झाली पण! आईने तिला गोड पापी देत ‘गुणी बाळ माझंअसा म्हणत मिठी मारली रुमुला!  आणि रुमुने परीला खूप थँक्स दिले!

मग कधी घरट्यातून पडणाऱ्या पिल्लूला वाचव, कधी कुठल्या आज्जीला जड पिशव्या उचलायला मदत कर, कुणाला एकटं वाटत असेल तर त्याच्याशी त्याच्या मनातलं ओळखून गप्पा मार असं रुमानीचं मदतसत्र चालू झालं!. हा अनुभव खूप सुंदर होता. माणसांची वेगवेगळी रूप तिला बघायला मिळत होती, आईबाबा प्रसंगी रागावतात पण ते आपल्यासाठी किती चांगलं असतं हे ही कळलं तिला! मोठी होत असलेली रुमु शहाणी पण होत होती!!

एक दिवशी जुईसोबत डबा खाताना रुमानी खूप गमतीजमती सांगत होती, पण मग तिला जाणवलं की जुईचं तर लक्षच नाहीये, "जुई, ए जुई, अग कुठे हरवलीस?" "नाही, काही नाही," असं म्हणत जुई उठून गेली. खरंतर जुईची आणि रुमुची फार गट्टी होती, पण सध्या काही दिवसांपासून जुईचं काहीतरी बिनसलं होतं पण परीने सारखंच मनातलं वाचायला मनाई केल्याने सारखंच तिला मनातलं वाचता येत नव्हतं, रुमुने जमेल तसं जुईला हसवण्याचा प्रयत्न केलेला पण काही उपयोग झाला नाही! एकदा तर जुई चक्क बाथरूममध्ये रडत होती. तेव्हा मात्र रुमानीने तिला खोदून विचारलं पण तेव्हाही फक्त ती म्हणाली, “आईला सध्या वेळ नाहीये माझं ऐकायला!” झालं! रुमानीतल्या सुपरहिरोला कामच मिळालं. तिने जुईचा पाठलाग करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी शाळेत निघतानाच तिने अन्नीला सांगितलं की आज उशीर होईल. कधी एकदा  शाळा सुटतेय असं रुमानीला झालं होत.  शेवटची बेल झाली आणि जुईच्या आधी रुमु बाहेर आली, जुईची गाडी आणि ड्रायवर आले होते. रुमानी एकदम छोटीशी झाली आणि हळूच सीटखाली जाऊन बसली, तिच्या शक्तीमुळे ती इवलीशी झाली होती. जुई घरी आली, दार तिचा कोणीतरी लांबचा काका की मामा अशोक, त्याने उघडले, त्याला बघताच जुईच्या चेहऱ्याचा रंग  उतरला. त्याने हात पुढे करून तिचे दप्तर घेतले तेव्हाही जुई खूपच आक्रसून गेली, रुमु ला कळत नव्हतं की ती अशी का वागतेय? तरी ती हळूच जुईच्या खोलीत गेली.  जुई थोड्या वेळाने हातपाय धुवून खोलीत आली, मागोमाग तिचा काका अशोक पण आला त्याने.  तिच्यासाठी बदलायला कपडे आणले होते. जुई नको नको म्हणत असताना त्याने जबरदस्तीने तिला कपडे बदलून दिले. दरम्यान जुई त्याच्या वेगवेगळ्या जागी होणाऱ्या स्पर्शाने अस्वस्थ होत राहिली. रुमानी पण दोन मिनिटे गोंधळून गेली. समोर काय चालू आहे हे कळायला तिला थोडा वेळ लागला. बराच वेळ अशोक काका जुईच्या खोलीत होता. कधी तिला मांडीवर घेत होता कधी तिच्या ओठाला हात लावत होता. पण आईबाबा जसे लाड करतात तसं नक्कीच नव्हतं, वेगळं होतं, नकोसं!! नाईलाजाने रुमानी घरी परत आली, जेवणात, अभ्यासात कशातच तिचं लक्ष लागेना. तिला आपण काय बघितलं याचा उलगडा होत नव्हता. आणि बिंगो!! तिला आठवलं, काही दिवसांपूर्वी अन्नी अंघोळ घालत असताना आपल्याला सांगत होती की ओठ, छातीचा वरचा भाग, दोन पायांमधला भाग किंवा मागचा भाग हे आपले प्रायव्हेट बॉडी पार्ट्स आहेत, म्हणजे दोन मैत्रिणींचं कसं घट्ट गुपित असत कुणालाच नसत सांगायचं तसंच आपले हे बॉडी पार्ट्स शरीराचं गुपित असतं, ज्याला आईबाबा आणि आईबाबा सोबत असताना डॉक्टर काका हात लावू शकतात! बाकी कधीही, कुणीही नाही. आणि मग रुमुच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे म्हणून जुई रडत होती, कारण तिचं गुपित अशोक काकामुळे फुटलं होतं!!

दुसरा दिवस उजाडला रुमानी पुन्हा जुईच्या खोलीत पिटुकली बनून गेली, आणि परत कालसारखाच अशोक काका जुईला त्रास देत होता हे बघून रुमानीने जादूने त्याला सुई टोचली. रुमानी त्याला दिसत नव्हती. पण त्याला जुईच्या बेडवर बसताही येत नव्हतं. सारखं काहीतरी नको तिथे टोचत होतं, शेवटी तो गेला, रुमानीने आपल्या  शक्तीने फक्त अशोक काकाला टोचतील  अश्या सुया जुईच्या बेडवर पेरल्या आणि ती घरी आली.

परीचे पंख आता वाळले होते आणि ती परत परिस्तानला निघाली होती, आणि रुमानीला तिची शक्ती परत द्यायची वेळ आली होती. आणि जुईला आत्ताच शक्तीची गरज होती. रुमानीने परी ला विनंती केली, “अजून थांब, आपण त्या दुष्ट अशोक काकाला अजून त्रास देऊ.” परी म्हणाली, "रुमु, अश्याने जुईचा प्रश्न सुटणार नाही, इतके दिवस तू शक्तीचा वापर करून छान काम केलंस, पण मनाची शक्तीही खूप मोठी असते आणि तीच तुम्हाला खरा सुपरहिरो बनवू शकते, अशी शक्ती तुझ्याच मनात आहे ती वापरून तू जुईला मदत कर, यशस्वी हो!!"

रुमानीला कळेना की आता शक्तीशिवाय ती काय करणार? तिने जुईच्या आईशी बोलायचं ठरवलं. पण जुईची आई म्हणाली, "अगं आमची जुई म्हणजे लाजाळूच आहे, त्यामुळे तिला असा वाटतंय. अशोक काका तिलाच सांभाळायला आला आहे गावाहून आणि खूप जुन्या ओळखीचा आहे. तू पळ बघू खेळायला." झालं, हा मार्ग ही बंद झाला. रुमानीला पुढे काय करावं कळेना. ती तशीच घरी आली आणि अन्नीशी बोलायला जाणार तोच त्यांच्या सिक्युरिटी कॅमेऱ्याने अलार्म दिला, तो अलार्म आल्यावर कॅमेऱ्यात बघणं हा रुमानीचा आवडता उद्योग!! ती आजही तशीच कॅमेऱ्यात बघायला लागली, आणि अचानक तिला एक भन्नाट आयडिया सुचली!!  शाळेत जाउन तिने जुईला आपली आयडीया सांगितली.

शाळेतल्या सायन्स फेअरमध्ये प्रोजेक्टसाठी मला असाच कॅमेरा हवाय असं रुमानीने सांगितलं आणि जुई पण या प्रोजेक्टमध्ये आहे असं जुईच्या घरी सांगून कॅमेऱ्याचं app जुईच्या आईच्या फोनवर सेट केलं, कॅमेरा जुईच्या खोलीतल्या  एका टेडी बेअरच्या डोळ्यात लपवला. अशोक काका एका दिवसासाठी बाहेर गेला असताना रुमानीने शक्कल लढवून या सगळ्या गोष्टी पार पाडल्या आणि जुईला धीर देऊन ती घरी आली. दुसरा दिवस नॉर्मल होता. जुई शाळेत आली आणि ड्रायवर काकांसोबत घरी गेली. जेव्हा ती खोलीत गेली तेव्हा पुन्हा अशोक काका तिच्या खोलीत आला. जुईची धडधड वाढत होती पण तिने काही दाखवले नाही. अशोक काकाला प्रोजेक्ट कॅमेऱ्याबद्दल काहीही माहित नव्हते. आजूबाजूला कुणी नाही खात्री झाल्यावर झाल्यावर त्याने जुईला जवळ बसवलं!! इकडे ऑफिसमध्ये जुईच्या आईला सारखे मोशन अलर्ट येत होते, पण चाललं असेल मुलींचं काहीतरी म्हणून तिने लक्ष दिलं नाही. तिला रुमानीचा फोन आला, "मावशी, आमच्या प्रोजेक्टसाठी तुझ्या कॅमेऱ्याच्या appवरून व्हिडिओ सेव्ह करून आणशील का?" जुईची आई आनंदाने तयार झाली, तिने app उघडलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने जे बघितलं ते पाहून तिला जुईवर थोडा विश्वास दाखवायला हवा होता असंच वाटून गेलं. तिने तातडीने आधी पोलीस आणि मग जुईच्या बाबांना फोन करून सगळं सांगितलं आणि दुष्ट अशोकला पोलीस घेऊन गेले. जुई पुन्हा पूर्वीसारखी हसरी खेळकर मस्तीखोर जुई झाली. आणि मनाची शक्ती वापरून रुमानी नेहमीसाठी स्वतःची सुपरहिरो!

 अनुजा मंदार


3 comments: