माझा शिक्षण संस्थेतील नोकरीचा पहिला दिवस. दुपारी तीन वाजता केबीनच्या दारावर टकटक
झाली आणि लगेचच प्रेमळ आवाज आला "कावेरी, चहा आणू?" मी पण जरा थकले होते, त्यामुळे लगेचच हो म्हणाले. पाच मिनिटातच गरम गरम चहा घेऊन आपटे बाई आल्या. "दमलीस का ?" आईच्या मायेने विचारणारा
तो आवाज मनाला स्पर्शून गेला.
अत्यंत साधे, स्वच्छ, मनाची निर्मळता चेहऱ्यावर प्रतिबिंबित
होणारे, साठीकडे झुकलेले व्यक्तिमत्व. सकाळी
९ वाजता जो चेहऱ्यावर उत्साह तोच दुपारी ३ वाजता! माझा चहा
होईपर्यंत पाच मिनिटे बसल्या आणि लगेचच रिकामा कप घेऊन लगबगीने बाहेर पडल्या. सहजच खिडकीबाहेर नजर गेली, तेव्हा सात-आठ रजिस्टरचा गठ्ठा घेऊन समोरच्या इमारतीचा
जिना चढताना दिसल्या. संध्याकाळी ६ वाजता मी कॉम्प्युटर शट डाऊन केला, केसाची पोनी हातानेच थोडी सावरली, पर्स उचलली आणि केबीन बंद करून बाहेर पडले. आपटेबाई सगळी दारे, खिडक्या लावण्यात बिझी होत्या.
कामात तीच चपळाई, चेहरा आत्ताच ऑफीसला आल्यासारखा
फ्रेश! अच्छा म्हणून बाहेर पडले पण मनातून आपटे बाई मात्र जात
नव्हत्या. त्यांच्या निम्म्या वयाच्या मला माझीच लाज वाटली.
दुसऱ्या दिवशी वेळेच्या आधी १५ मिनिटे ऑफीसला पोहोचले. आपटेबाईंची लगबग चालू होती. अंगण स्वच्छ झाडून झाले होते.
झाडांना पाणी देऊन झाले होते आणि सगळ्यांच्या टेबलावरची धूळ पुसणे चालू
होते. हाताने काम आणि तोंडाने नाम. इतके
काम झाल्यानंतर घामाघूम झाल्या होत्या. मी कॉम्प्युटर सुरू करुन दिवसभराच्या कामाचा विचार करत
होते तेवढयात केबिन उघडल्याचा आवाज आला. "गुड मॉर्निंग" म्हणत आपटेबाई पाण्याचा तांब्या घेऊन सुहास्य वदनाने आत आल्या. चेहऱ्यावर घामाचे, थकल्याचे मागमूसही नाही. चेहरा स्वच्छ धुवून, पावडर कुंकु आणि हलके काजळ लावून
दिवसभराची कामे करायला तयार.
पुढे जसजशी ओळख वाढली तसे आपटेबाईंचे असामान्यत्व उलगडत गेले. तरुण वयात पती, बाई आणि व्यसनांच्या आहारी गेलेला. पदरात तीन मुलगे,त्यापैकी मधला पोलिओग्रस्त. महिनो न महिने पती देव घरी
यायचे नाहीत. रोजचा दिवस त्यांची वाट बघणे, संस्थेतील शिपाईणीची नोकरी करणे आणि तीन बछड्यांचे पालन करणे ह्यात जायचा.
परिस्थिती अत्यंत हालाखीची. पुढे पतीची बेशरमी इतकी वाढली की बायका घरी घेऊन येऊ लागला. अशा वेळी घरात पौगंडा अवस्थेतील तीन मुलगे असताना, आई म्हणून त्यांची काय परिस्थिती झाली असेल ह्याची कल्पनाच करवत नाही. तोंडात सतत देवाचे नाव घेत ह्या माऊलीने आपल्या मुलांना पदवीधर केले. पोलीओग्रस्त मुलाला कर्ज काढून टेलीफोन बूथ काढून दिला. मुले आर्थिक दृष्ट्या स्थिर झाल्यावर त्यांची सुयोग्य स्थळे बघून लग्ने लावून दिली. तिघांच्या लग्नाचे स्थळ एकच- गुंडाच्या गणपतीचे देऊळ!!
परिस्थिती अत्यंत हालाखीची. पुढे पतीची बेशरमी इतकी वाढली की बायका घरी घेऊन येऊ लागला. अशा वेळी घरात पौगंडा अवस्थेतील तीन मुलगे असताना, आई म्हणून त्यांची काय परिस्थिती झाली असेल ह्याची कल्पनाच करवत नाही. तोंडात सतत देवाचे नाव घेत ह्या माऊलीने आपल्या मुलांना पदवीधर केले. पोलीओग्रस्त मुलाला कर्ज काढून टेलीफोन बूथ काढून दिला. मुले आर्थिक दृष्ट्या स्थिर झाल्यावर त्यांची सुयोग्य स्थळे बघून लग्ने लावून दिली. तिघांच्या लग्नाचे स्थळ एकच- गुंडाच्या गणपतीचे देऊळ!!
सर्व गुण उधळून झाल्यावर पती जर्जर अवस्थेत ह्यांच्याचकडे परत आला. ह्याचे सावट मुलांच्या संसारावर
नको, म्हणून आपटेबाई सिंहगड रोडवर दोन छोटया खोल्या घेऊन राहू
लागल्या आणि मागचे सर्व विसरून त्यांची सेवा करु लागल्या. धन्य ती माऊली.....
रोज ऑफीसमध्ये फ्रेश दिसणाऱ्या आपटेबाई सकाळची घरची कामे, आजारी पतीची शुश्रूषा करुन पाच किलोमीटर चालत यायच्या. इथे आल्यावर आठ तास पायाला
भिंगरी लावल्यासारख्या कामे करायच्या. संस्थेत सर्वांशी मायेने
बोलायच्या, कधी कुणाची चुगली नाही की वैर नाही. जाता जाता इतक्या सकारात्मक गोष्टी सांगायच्या
की मन प्रफुल्लित व्हायचे. ऑफीसमधल्या कटकटींनी कधी माझे मन उदास
झाले तर म्हणायच्या," कावेरी, कुत्री
भुंकली म्हणून हत्ती आपली चाल बदलतो का?" त्यांची ही फिलॉसॉफी
मला पुढच्या आयुष्यात अनेक प्रसंगी कामी आली. सतत आवरून सावरून
चेहरा फ्रेश ठेवावा म्हणजे आपल्याकडे बघणाऱ्याला ‘कोंबट’ वाटत नाही.... हे त्यांचे तत्वज्ञानही आजपर्यंत मी पाळत आले आहे.
माझ्या त्या ऑफीसमधल्या शेवटच्या दिवशी स्वतःच्या कानातील मोत्याच्या कुडया
माझ्या हातात ठेवून घट्ट मिठी मारली आणि म्हणाल्या, 'माझ्याकडे तुला देण्यासारखे एव्हढेच आहे, नाही म्हणू नकोस'. आजही त्या कुडया पाहिल्या, की माझे डोळे त्यांच्या आठवणीने पाणावतात. जेमतेम अठरा महिन्यांचा सहवास पण आयुष्यभराचे
नाते जोडून गेल्या. अशा ह्या असामान्य माऊलीला माझा मनःपूर्वक
नमस्कार!!
कावेरी
आरती लेख खूप छान
ReplyDelete