मला भावलेले पु.ल.


पु.ल. देशपांडे मराठी मनात, पुरणपोळी, झुणका भाकर किंवा भज्यांप्रमाणेच कायम घर करून आहेत. समर्थ रामदास, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक ज्या प्रमाणे आपली श्रद्धेची स्थाने आहेत, तसेच पु.ल. हे आपले जिव्हाळ्याचे स्थान आहे. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने माझ्यासारख्या सामान्य वाचकाचे हे मनोगत- 
मला पुलंचे वैशिेष्ट्य खालील कारणांमुळे जाणवते.
१.     अष्टपैलुत्व
इतक्या विविध ललितकलांमधे नैपुण्य असलेली व्यक्ति पुलंच्या आधी किंवा नंतर कुठल्याच देशात किंवा भाषेत आढळत नाही. ह्या बाबतीत त्यांची तुलना गुरूदेव रविंद्र नाथ टागोर किंवा लियोनार्दो-द-विंची शीच होऊ शकते, फक्त त्या दोघांच्या विपरीत चित्रकलेत पुलंचा वावर नव्हता. पुलंची ह्या बाबतीतील फजिती त्यांच्याच भाषेत-
दोन समांतर आडव्या रेषांच्या मधे काही उभ्या रेषा काढून मी कागद मास्तरां कडे नेला. "काय काढले आहे?"
"शिडी", मी म्हणालो.
"गधड्या, निदान उभी तरी काढायची."
भिंती शिवाय शिडी उभी कशी राहणार?, माझी आपली शंका.
"तिरडी सारखी दिसते तुझी शिडी, आता त्याच्या वर एक माणूस काढ, आणि खाली लिही, "कैलासवासी ड्राइंग मास्तर बोडस."
२.     नर्म विनोद 
पुलंचा विनोद सौम्य व देखणा होता. त्याला शारीरिक व्यंग किंवा अतिशयोक्तीच्या कुबड्या कधीच लागल्या नाहीत. ते प्रथम दर्जाचे शब्द-शिल्पि होते. त्यांचे शब्द कोंदणातल्या रत्नांसारखे वाक्यांमधे चपखलपणे बसत. काही उदाहरणे पहा.

अ- 

खराट्याने समुद्र परतवणारे आम्ही. बुद्धाला जमले, ख्रिस्ताला जमले, आम्हीपण हुरळलो.(तुझे आहे तुजपाशी)

ब- 

कोकणातल्या फणसा सारखीच तेथली माणसे ही, खूप पिकल्या शिवाय गोडवा येत नाही. (अंतू बर्वा)

क- घड्याळाचं आणि माणसाचं एकच, फक्त तबकड्या व पट्टे बदलतात. आतले तोल सांभाळणारे चाक व्यवस्थित असले की फार पुढे जाण्याची भीती नाही, का फार मागे पडण्याची.

पुलंचे लेखन कौशल्य येवढे जबरदस्त होते, की संदर्भ बदलले तरी प्रत्येक पिढी त्यांच्या साहित्याशी एकरूप होऊ शकली. चाळ न पहातासुद्धा त्यांना बटाट्याची चाळ व त्यातील सोकाजी त्रिलोकेकर, एच.मंगेशराव,बाबा बर्वे, बघितल्या सारखे वाटतात.

पुलंचेही काही टीकाकार आहेत. टीकेची कारणे व माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे-

१.     एकसुरी लेखन- 

पुलंनी फक्त विनोदी लेखन केले अशी टीका केली जाते. पण त्यांच्या, एका मोर्च्याची गोष्ट मधे त्यांनी शालेय शिक्षकांच्या मोर्च्याचे वर्णन केले आहे. शिक्षकांची, पोलीसांनी मोर्च्याकडे ढुंकूनही न पहाण्यामुळे उजागर झालेली अगतिकता, आपलं दैन्य उघड पडल्यामुळे वाटणारी शरम, विद्यार्थ्यांची नजर चुकविण्याची केविलवाणी धडपड वाचून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.

२.     विनोदाच्या अतिरेकामुळे लेखनातील कारूण्य झाकोळले- 

काही प्रमाणात असे झाले आहे, पण पुलंच्या लेखणीच्या ताकतीमुळे एकच वाक्य देखील परिणाम साधून जाते. 
उदाहणार्थ- वरातीतील मंडळी घरी परततात, इतके दिवस, भीमरूपी महारूद्र झालेल्या, सोफ्यावर मुटकुळे करून झोपलेल्या, नारायणाकडे मात्र कोणाचेच लक्ष जात नाही.

३.     तात्विक बैठकीचा अभाव- 

मनोरंजन हेच आपल्या लेखनाचे सूत्र असल्याचे पुलंनी स्वतःच कबूल केल्यावर हा आरोप निरर्थक वाटतो. हे म्हणजे लोकप्रिय सिनेमात किंवा दूरदर्शन मालिकेत जीवनाचे तत्वज्ञान शोधण्यासारखे आहे.

४.     मर्यादित परिपेक्ष- 

पुलंचे लिखाण उपनगरातील मध्यमवर्गातच अडकून राहिले असे बरेचदा म्हटले जाते. माझ्या मते हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे. कदाचित त्यांना असे वाटले असेल की इतर संदर्भात ते सामान्यजनांसारखेच आहेत. 
उदा. वैद्यकीय व्ययसायामुळे जर एखाद्याचा संबंध फक्त खरे बोलणाऱ्या लोकांशीच आला तर अशी व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याचे अनुभव लिहू शकणार नाही.

शेवटी पुलं विषयी माझी भावना त्यांचेच शब्द उसने घेउन मांडतो

परमेश्वरानी आमुची चिमुकली जीवने समृद्ध  करायला ह्या मोलाच्या देणग्या, न मागता दिल्या  होत्या, न सांगता परत घेतल्या.

दिलीप कानडे


4 comments: