मनसुबा - राजन खान

 


लेखक हे शब्दसृष्टीचे जादूगार असतात असे म्हणतात - शब्दांचं मायाजाल त्यांना विणता येतं ... आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते साध्या प्रसंगातले आपल्याला सहसा न लक्षात येणारे कंगोरे इतक्या खुबीने दाखवतात की आपल्याला वाटत राहते, 'अरेच्च्या हे आपल्या का नाही लक्षात आलं?'

 

या शब्द-जादूगारांपैकी एक म्हणजे राजन खान. त्यांच्या मनसुबा या कथासंग्रहाबद्दल मी आज लिहिणार आहे. मॅजेस्टिक प्रकाशनाने २००९ मध्ये प्रथम प्रकाशित केलेल्या कथासंग्रहात पाच कथा आहेत - प्रत्येक कथा ही एक दीर्घकथा आहे - साधारणपणे - २५ ते ३५ पानांची. गोष्टी साध्याच माणसांच्या आहेत. त्यातले प्रसंगसुद्धा तुमच्या आमच्या आसपास दररोज घडणारे आहेत. किंबहुना प्रत्येक कथेची गोष्ट एक चार-सहा ओळीत सांगता येईल इतकी क्षुल्लक आहे.

 

उदाहरणार्थ यातली शेवटची कथा - स्त्री-मुक्तीच्या विचारांनी भारावून गेलेली एक बाई आपल्या लहानग्याला आणि नवऱ्याला सोडून जाते आणि सतरा - अठरा वर्षांनी थोड्या निराश, पराभूत मनस्थितीत परत येते. नवऱ्याने आपल्याला माफ करावं, मुलाला भेटावं, परत संसार चालू करावा अशी तिची इच्छा असते. पण नवरा तिच्याशी अत्यन्त परकेपणाने वागतो आणि ती परत जाते. अत्यन्त साधी कथावस्तू - पण राजन खान यांचं कौशल्य हे की त्यांनी त्या माणसांच्या मनातली विचारांची आंदोलने प्रभावीपणे चित्रित केली आहेत. वेगवेगळ्या बाजूंनी तो विचार वाचकांपुढे आणला आहे. म्हणजे ती स्त्री घर सोडून जाण्याच्या आधीची त्यांची भांडणं, ती घर सोडून गेल्यावर त्याला बसलेला धक्का, त्याच्या मनातली आंदोलने, आणि परत तिला दारात बघितल्यावर निर्धाराने, वरवर शांतपणे पण मनातला राग, भीती काबूत ठेवत तिला एखाद्या परक्यासारखं वागवत दूर लोटण्याची त्याची धडपड - सारं, सारं, आपण त्या माणसाच्या डोक्यात चालेल्या विचारांचं  नाटक अगदी पहिल्या रांगेत बसून बघितल्याप्रमाणे अनुभवतो.

 

तंटा - आणिक एक गोष्ट. एका पोलिसाची. वेळेच्या बाबतीत कसलीच सातत्यता नसलेली नोकरी, अपुरा पगार, घरातले वाढते खर्च आणि त्याहून वाढत्या अपेक्षा, जीवावरच्या जोखमीचं काम - या सगळ्याचा परिणाम म्हणून लागलेलं किंवा लावून घेतलेलं दारूचं व्यसन. पण या सगळ्यामध्ये चालणारी विचारांची आवर्तने - परत एकदा फ्रंट सीट व्ह्यू - आणि आपण वाचक त्यात चिंब भिजून निघणार.

 

कथेतील त्या विचारांची आवर्तने आपल्याला कधी गुदमरूनसुद्धा सोडणार, कासावीस करणार, हतबल करणार. हा माणूस आपण पाहिला आहे. किंवा नेहेमी पाहतो - त्याच्या मनात असं काही चालू असेल हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं. पोलिसांना केवळ भ्रष्टाचारी, आळशी, बेजबाबदार अश्या विशेषणांनी मग सर्वसाधारणपणे झटकून टाकणं कठीण होऊन बसतं.

 

राजन खान यांच्या लिखाणाचं हे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या लिखाणातले बरचसे परिच्छेद खूप मोठे असतात. शेक्सपिअरच्या नाटकातली स्वगतं जशी मोठी असतात, त्या प्रमाणे राजन खान त्यांच्या पात्रांच्या मनातली विचारांची वादळं आपल्यापुढे मांडतात - उलगडून दाखवतात. या विचारांच्या मांडणीत प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह खूप वेळा आपल्या नजरेस पडतं. कारण बहुतांश वेळा तो दोन मनांचा संवाद असतो. एका मनाने उभ्या केलेल्या प्रश्नांना दुसरं मन उत्तर देत असतं - क्वचित कधी आणिक एका प्रश्नाने!

 

हा सगळा विचारांचा खेळ वाचकांच्याही मनातलं विचारचक्र जागं करून एक सुंदर अनुभूती देत राहतो. अर्थात सुंदर म्हणजे फक्त गोड गोड नव्हे - बहुतेक वेळा सुन्न ही करतं  ...

 

जी एं सारखेच - राजन खानसुद्धा प्रत्येकाला झेपतील असं नाही. त्यांच्या काही कथा घोंघावत येणाऱ्या वाऱ्यासारख्या अंगावर येतात - नक्की काय चाललंय याचा अंदाज यायला कधी वेळही लागतो - पण एकदा राजन खान वाचायची सवय झाली, की त्यांची कुठलीही कथा - किंवा कादंबरीही - उघडावी आणि सुरेख शाब्दिक आणि वैचारिक जुगलबंदीची खात्री बाळगावी.

 

कथासंग्रह - मनसुबा - लेखक राजन खान, मॅजेस्टिक प्रकाशन - २००९, १४३ पाने, मूल्य १६० रुपये.

 

 

अभिजित टोणगांवकर





2 comments:

  1. 'मनसुबा 'वाचायची उत्सुकता वाढली!

    ReplyDelete
  2. 'मनसुबा ' वाचायची उत्सुकता वाढली

    ReplyDelete