माणुसकीचा पुन्हा प्रत्यय


मी ४ मार्चला अमेरिकेतून भारतात परत आले. तोपर्यंत करोना एवढा पसरलेला नव्हता. एअरपोर्टवर प्रत्येकाचे तापमान तपासून व पासपोर्ट नंबर, फोन नंबर, फ्लाईट नंबर,पत्ता इत्यादी तपशील दोन अर्जावर भरून घेऊन तो तपशील बोर्डिंग पासशी तुलना करून बरोबर असल्यास  बाहेर सोडत होते.  पण  स्वत:ला सर्वांपासून अलग ठेवण्याचे व घराबाहेर न पडण्याचे बंधन घालत नव्हते. त्यामुळे १४ मार्चपर्यंत मी माझी नेहमीची दिनचर्या चालू ठेवली होती. जसे की बाजारात जाणे, बँकेत जाणे, मैत्रिणींना ओळखीच्या लोकांना भेटणे, भजन वर्ग, गाथा वर्ग इत्यादी पण त्यानंतर घरातच राहणे सक्तीचे झाले. माझ्या मुलीने, जयंतीने तिच्या घरी राहायला येण्याचा आग्रह केला. पण माझे वय व नुकताच केलेला परदेशप्रवास प्रवास लक्षात घेता मी किमान दोन आठवडे तरी माझ्या घरी एकटीनेच राहण्याचा निर्णय घेतला.
घरात एकटीच असल्यामुळे मुख्य प्रश्‍न दूध, फळे, भाज्या व इतर वस्तू कशा आणायच्या हा होता.  तो प्रश्न सहजतेने सोडवला गेला. माझी शेजारिण  माझ्या दारात  रोज सकाळी दुधाची पिशवी ठेवू लागली. जयंतीने भाज्या व इतर सामान आणून दिले. तेवढ्यात व्हाट्सअप वर एक मेसेज आला की नुकतेच परदेशाहून आलेल्या व्यक्तींनी करोना चाचणी करणे अनिवार्य आहे व न केल्यास दंड आकारला जाईल. मला तर करोनाची कोणतीच लक्षणे जाणवत नव्हती. मग मी डॉक्टर संगीताला फोन केला की अशी चाचणी अनिवार्य आहे का? तिने सांगितले की चाचणी  अनिवार्य नाही. मला कोणतेही लक्षण जाणवले तरच मी चाचणी करून घ्यावी. यामुळे मला दिलासा मिळाला व माझा  चाचणी करून घेण्याचा त्रास वाचला व ज्यांना कुणाला चाचणीची खरच गरज असेल त्यांना त्या किटचा उपयोग झाला.

रोज मला किमान दोन तरी फोन मैत्रिणींचे, ओळखीच्या लोकांचे येत होते. माझी तब्येत कशी आहे व मला कुठल्या वस्तूची गरज आहे  का? तेव्हा मला जाणवले की मी एकटी नाही आहे. माझी काळजी घेणारी अनेक माणसे माझ्या आजूबाजूला आहेत. मागच्या वर्षी २२ फेब्रुवारीला माझ्या पतीदेवांचे  अचानक निधन झाले. हा माझ्यावर मोठा आघात होता. माझे डोके सुन्न झाले होते. पण माझ्या मैत्रिणींनी आणी ओळखीच्या लोकांनी हॉस्पिटल मधील सर्व सोपस्कार त्वरित व व्यवस्थित पार पाडले, दोन-तीन दिवस घरी आलेल्या सर्व पाहुण्यांना नाश्ता व दोन वेळचे जेवण पुरविले, घरात लागणारे सामान आणून दिले,वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूने बावरलेल्या माझ्या मुलांना दिलासा दिला, तुमची आई इथे एकटी नाही आम्ही सर्व तिच्या पाठीशी आहोत असे आश्वस्त केले, माझ्या छोट्या मोठ्या प्रत्येक गरजेत मदत केली. त्यामुळे माझा माणुसकी वरील विश्वास दुणावला.  यंदाच्या करोनाच्या संकटाने माणुसकीचा पुन्हा प्रत्यय आला. अशा भयानक संकटात सर्वतोपरी जनतेला मदत करणारे लोकडॉक्टर, नर्सेस, पोलीस ,अनेक सामाजिक  संस्था यांचे कार्य पाहिल्यावर माणुसकीवरचा विश्वास दृढ झाला.

मनोरमा जोशी




1 comment: