माझी आजी



गावात गाडी येऊन पोहोचली तेव्हा मध्यरात्र झाली होती. पावसाची रिपरिप सुरु झाली होती! मी लगबगीने रिक्षामध्ये बसलो आणि रिक्षेवाल्याला घराचा पत्ता सांगितला. रिक्षावाला पायडल मारीत हळूहळू रिक्षा चालवू लागला. रिक्षाच्या टपातून पाणी टपकत होतं. मी त्या थेंबापासून बचाव करण्यासाठी बाजूला सरकून बसलो आणि शांतपणे बाहेर बघू लागलो. 

पावसाने एव्हाना चांगलाच जोर धरला होता! आख्खं गाव अगदी शांतपणे झोपले होते. पावसाच्या रिपरिपीशिवाय एकही आवाज ऐकू येत नव्हता. हळूहळू रिक्षा घराजवळ येऊन पोहोचली. मी समोरच्या ओट्याकडे बघितले - आज तिथे कुणीच नव्हतं! आता तिथे कुणीच माझी वाट बघत बसणारंही नव्हतं! रिक्षावाल्याला पैसे देऊन मी घराकडे वळलो.

दाराची कडी वाजविल्यानंतर आईने दार उघडले. घरात आलो आणि आजी जिथे नेहमी झोपायची त्या जागेकडे बघितले - ती जागा रिकामी होती! आजीला जाऊन आता किती तरी वर्षे झाली आहेत. आता ती पुन्हा कधीच दिसणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरीही का कुणास ठाऊक, असं वाटतं - आपण अशा पावसाळी रात्री असंच गावाला जावं, आपण आल्याचे कळल्यावर आजीने अंथरुणात उठून बसावे, जवळ घेऊन पाठीवरून मायेने हात फिरवावा, आणि आपल्याला अगदी कंटाळा येईपर्यंत आपली विचारपूस करावी!! पण आता असं कधीच होणार नाही! आयुष्यातील एक स्नेहदायक पर्व नेहमीसाठीच संपलंय!
Photo by Clipart

आजीची अगदी प्रथम आठवण येते ती आमच्या लहानपणीची! आमची आजी अगदी कट्टर देवभक्त! व्रत, नेम, उपवास, सोवळं याबाबत ती अजिबात तडजोड करीत नसे! लहानपणी ती आम्हा दोघा भावंडांना देवाची पूजा करायला लावायची. लहान भाऊ तर पूजेचा कंटाळा करायचा, मग सक्तीने माझा नंबर पूजेसाठी लागायचा! ती पूजा माझ्या मनात अगदी ठसून बसली आहे! आठवण आली तरी डोळ्यासमोर अगदी चित्रच उभे रहाते. स्वयंपाक खोलीतच आमचे देवघर होते. मी पूजा करायला बसलो की आजी पण स्वयंपाकाच्या ओट्यावर, पाटावर स्वयंपाकासाठी येऊन बसे! स्वयंपाक करता करताच ती मला पूजेबद्दल सूचना देई! तिचं माझ्या प्रत्येक कृतीकडे अगदी बारीक लक्ष असे! कुठल्या देवाला कुठल्या रंगाचे फूल वाहायचे याबद्दलचे नियम एकदम कडक होते! त्यात जर मी थोडीही चूक केली तर ती माझी चांगलीच कानउघाडणी करायची. प्रत्येक देवाच्या आवडी निवडी सांभाळून पूजा करण्यात जवळजवळ एक तास निघून जाई! मग सुरु होई आरतीचा कार्यक्रम!

आरती म्हणजे एक मोठे दिव्यच होते. कारण आरत्यांची संख्या त्या त्या दिवसावर ठरायची! गणपती आणि देवीची आरती तर रोजच म्हणायची. याशिवाय जो वार असेल त्या वाराप्रमाणे त्या देवाची आरती! मग तीन आरत्या म्हणू नये म्हणून अजून एक आरती! याव्यतिरिक्त एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र इ. दिनविशेषाप्रमाणे एखादी अजून आरती म्हटली जाई! सगळ्या आरत्या म्हणून झाल्या की मंत्रपुष्पांजली आणि सर्वात शेवटी कर्पूर आरती! एवढ्या सगळ्या आरत्या होईपर्यंत आरतीचे तबक फिरवून फिरवून माझे लहानगे हात दुखून जात! मग मी काही वेळ तबक न फिरविता नुसतेच स्थिर ठेवे! आजी जरी आरती म्हणत असली आणि सोबतच स्वयंपाक करीत असली तरी तिचे माझ्याकडे बारीक लक्ष असे! मी आरतीचे तबक फिरविण्याचे थांबवले की ती एकदम मोठया पट्टीत आरती म्हणू लागे! मला ती सूचना बरोबर कळायची आणि मग मी पुन्हा आरती ओवाळू लागे! एवढ्या सगळ्या खटाटोपानंतर एकदाची पूजा संपायची. मग दूध साखरेचा नैवैद्य देवाला दाखवायचा! एवढ्या परिश्रमानंतर मग दोन पळी भरून पंचामृताचा प्रसाद मिळे! पूजा संपेपर्यंत पोटात अगदी भुकेचा डोंब उसळलेला असे. त्यामुळे पूजेनंतर मिळणारा तो साईचा नैवैद्य अगदी अमृतासारखा वाटे! आजही आजीने तयार केलेल्या पंचामृताची चव कधीकधी आठवते!

आमची आजी कदाचित जगाच्या दृष्टीने थोडी वेगळी असावी, पण आम्हा भावंडांवर तिचे अमाप प्रेम होते! आजीच्या अनेक आठवणी तर अगदी आजही तपशीलवारपणे आठवतात. कोणतीही गोष्ट अतिरंजित करून सांगायची तिला सवयच होती. तिचा जन्म मध्यप्रदेशातील हरदा येथे झाला होता आणि तिचे वडील हे फार मोठ्या पदावर होते. त्यामुळे तिच्या जन्मानंतर तोफांची सलामी देण्यात आली होती असे ती सांगे. खरे खोटे कुणास ठाऊक? पण त्या वरून आमची आई मात्रम्हणूनच तोफेसारखे तोंड आहेअसे उपरोधाने म्हणे! (सासू सुनेचे नाते!)

त्या पिढीतल्या बाकी लोकांप्रमाणे तिची मते अगदी ठाम असत आणि ते मांडायला ती अजिबात घाबरत नसे. तिचे आमच्याशी वागणे फार मित्रत्वाचे होते. आम्ही तिची खूप गंमत करायचो, पण तिला कधीही राग यायचा नाही. माझ्या विनोदी लेखनाची सुरुवात खरं तर तिच्यामुळेच झाली. फक्त तिची गंमत करण्यासाठी आम्ही भावंडे ती म्हणत असलेल्या भजनांचे विडंबन करू लागलो! हे विडंबन खूपच पोरकट होते. आज आठवले तरी हसू येतं. उदाहरणच द्यायचं झाल्यासदेह जावो अथवा राहो, आम्ही आपले मजेतच आहोकिंवानीज नीज बाई आहे वाळवंट, तिथे आहे उंट खूप खूपइ.हळूहळू या विडंबनाचे रूपांतर नंतर विनोदी कथा, लेख, पुस्तक लिहिण्यापर्यंत झाले. एकदा तर तिला धार्मिक, गंगेवर आधारित चित्रपट आहे असे सांगून आम्हीगंगा की सौगंधहा अमिताभचा चित्रपट दाखविला होता. चित्रपटातील डाकू आणि त्यांची प्रचंड हाणामारी पाहून तिने आमची चांगलीच खरडपट्टी काढली! आता या सगळ्या गोष्टी आठवून गंमत वाटते!

आजीची मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तिचा दुर्दम्य आशावाद! एकुलत्या एक मुलाच्या आयुष्याची परवड सहन करूनही ती एखाद्या पहाडासारखी ताठ उभी राहिली! तिचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही. जेमतेम सहावीपर्यंत शिकलेल्या आमच्या आजीला कोठून मिळाले असतील हे होकारार्थी विचारसरणीचे धडे? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मला मिळाले नाही. सहावीवरून आठवले, तिला ती सहावीपर्यंत शिकल्याचा प्रचंड अभिमान होता, कारण तिच्या बालपणात मुली बहुधा शिकत नसाव्यात. आणि तिला अनेक श्लोक, स्तोत्रे, काव्ये अगदी तोंडपाठ होती! त्या काळातील शिक्षणाचा दर्जा किती उच्च असावा याचा त्यामुळे अंदाज येतो!

आजीचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ती खूप बोलकी होती. सतत बोलत राहणे हा तिचा छंदच होता. त्यातही स्वतःच्या गत आयुष्यातील जुन्या गोष्टी तपशीलवारपणे सांगणे हा तिचा आवडीचा विषय! या तिच्या गोष्टी आम्ही कितीतरी वेळा ऐकल्या होत्या. तिच्या आजूबाजूच्या सगळ्यांनीच या गोष्टी अनेकदा ऐकल्या होत्या, त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा ऐकणे म्हणजे एक वैतागच होता. पण आता मात्र या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य अंग बनल्या आहेत!

पहाट व्हावी आणि पाखरांनी घरटं सोडून आकाशात झेप घ्यावी तशी आम्ही भावंडं मग पुढील शिक्षणासाठी गाव सोडून बाहेर पडलो! प्रथम ताई, मग मी आणि सरतेशेवटी छोटा भाऊ! ताईचे लग्न झाले, ती सासरी गेली. मी नोकरीसाठी बाहेर गावी गेलो. लहान भाऊपण शिक्षणासाठी दूर निघून गेला. आम्ही आपापल्या व्यापात गुंतत गेलो, आमच्या वर्तुळाचा परीघ सतत वाढतच होता, पण आजीच्या वर्तुळाचा परीघ तेवढाच राहिला! ती त्या वर्तुळातच आम्हाला शोधत होती, पण त्या वर्तुळात राहणे आता आम्हाला शक्य नव्हते! आम्ही एक एक जण पांगत गेलो पण आजी मात्र तिथेच गावात आमच्या घरात राहिली - आई आणि वडिलांसोबत! तिचा जीव मात्र आम्हा नातवंडांभोवतीच घुटमळत राहिला!

सुटीत आम्ही घरी आलो की ती आमच्यावर मायेचा नुसता वर्षाव करी. आमचे आवडीचे खाद्य पदार्थ (आईच्या आधीच) स्वतःच्या हातानी करून आम्हांला वाढायची. अगदी कंटाळा येईपर्यंत ती आमची विचारपूस करायची! तिच्या कंटाळवाण्या आयुष्याला जणू एका वेगळाच आनंदाचा स्पर्श होऊन जाई! मी जर आधी कळवून गावाला गेलो तर ती रात्री उशिरापर्यंत ओट्यावर बसून माझ्या रिक्षाची वाट पाहत राही. माझी रिक्षा आली की तिला विलक्षण आनंद होई. मग ती इतकी बोलायची की सांगायची सोयच नाही.

आजी आयुष्याबद्दल अतिशय आशावादी होती! वय झालं तरी ती मृत्यूबद्दलचा विचारही करीत नसे! आपण खूप वर्षे जगणार आहोत असा तिला दृढ विश्वास होता. तिच्या दृढ इच्छाशक्तीमुळे आम्हालाही असे वाटे की ती खूप वर्षे जगणार! पण तसं व्हायचं नव्हतं! त्या वर्षीची दिवाळी अजूनही चांगलीच स्मरणात आहे! दिवाळी आनंदात आटोपली. आम्ही सगळे एकत्र आल्यामुळे खूप आनंदात होतो! आजी मात्र नेहमी सारखी खूप जास्त बोलत नव्हती. तर तिच्या स्वभावाला न शोभेशी अशी शांत शांतच होती! पण ते आमच्या लक्षात आले नाही!

एक दिवस सकाळी ती घेरी येऊन पडली. तिला आम्ही ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन गेलो, पण ती कोमामध्ये गेली! सतत पंधरा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती! अखंड बोलत राहणाऱ्या आजीला असे निस्तब्ध अवस्थेत पाहणे फार कठीण होते! असं वाटत होते की एकदा तरी तिने शुद्धीवर यावे आणि आमच्याशी बोलावे! तिच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे ती कोमातूनही परत येईल असे आम्हाला वाटत होते! पण तसे झाले नाही! एके दिवशी संध्याकाळी तिने शांतपणे या जगाचा निरोप घेतला. आम्हाला सगळ्यांना अक्षरशः पोरके करून आजी गेली आणि आयुष्यातील एक प्रेमळ, स्नेहदायक अध्याय संपला! पाठीवरून प्रेमाने फिरणाऱ्या एका प्रेमळ हाताला आम्ही कायमचेच मुकलो!


आजही कधीकधी रात्री अचानक पाऊस दाटून येतो, मातीचा गंध आजूबाजूला दरवळू लागतो आणि माझ्या डोळ्यासमोर उभी राहते ती माझ्या येण्याकडे वाट लावून बसलेली, गावातली माझी आजी!


अविनाश चिंचवडकर



4 comments: