💥माझ्या घरातील दिवाळी💥

 


दिवाळी आणि आमची कुणब्याची भात सोंगणी संगच येते. नव्हे नव्हे देवानंच हे सगळं रचुन ठेवलं असावं. ऐन सणालाच घरात नवीनं दाणं-दुणं यावं, कुणब्याचं घर धन-धान्यानं आबादुन जावं, आनं वर्षातुन येणारा त्याचा हा दिवाळी सण आनंदानं साजरा व्हावा. अर्थात एकीक दिवाळी बी दुसरीकं आमची भात सोंगायची कामं बी, त्यामुळे दिवाळी समदी कामातच जाती आमची. आम्हा पोरानां त दिवाळीच्या आधी येणारी बाघबारसच खुप आवडती आसायची. हा दिवाळीच्या आगमनाची सूचना दयायचा.

रानातुन वाकडी तिकडी लाकडं घ्यायची. त्यांच्या इळया- कोयत्याने साळुन मस्त तलवारी बनवायच्या. मग त्या तलवारीनंला कलर दयायचा. झिरमिळयाच्या पट्टया लावायच्या.तलवारी सजल्या कि मंग आमची सोंग सजायची. आम्ही पोरं तोंडाला बाघासारखे रंगीबेरंगी पट्टे ओढायचे, कोळशानं काळया फेंदऱ्या मिशा काढायच्या. काही मस्त जुन्या काळच्या राजासारखा पोशाख करायचे, तर काही आपले साधेच तयार व्हायचे. असा नट्टा-पट्टा झाला की झाले आमचे चार पाच वाघे तयार.

मंग ही चार-पाच जणाचीं आमची टोळी तयार झाली की हातात तलवारी - पिशव्या घेऊन गावातील प्रत्येक घराम्होरं जायचं. आणि साऱ्यानी एका तालासुरात मोठयाने गागायचं, "येऊ द्यां रे येऊ दया वाघ्याची गौर, वाघे."

हे आसं दोन तीनदा गागलं का मंग त्या घरातुन जे काय मिळलं ते घ्यायचं. आसं मंग गावातील प्रत्येक घरातुन जे जे मिळेल ते ते गोळा करायचं. कुणाच्या घरुन तांदुळ, कुणाच्या घरुन मीठ, पीठ, मिरची, तेल,बटाटे, वांगे जे काय भेटेल ते घ्यायचं.

गावातले बारके पोरं वाघे बनायचे आनं बारक्या पोरी भोंडल्या. त्यांच येगळचं रहायचं. दोन दोन टिपर्या घ्यायच्या. डोक्यावर देवतांब्या, त्याच्यात सुर्यफुलं, भाताच्या लोंब्या घेऊन मग मस्त टिपऱ्या खेळत, भोंडल्याची गाणी म्हणतं घरोघरं फिरायचे आणि दाणे, दुणे गोळा करायचे.आम्ही मुलं वाघे आणि मुली भोंडल्या. आमचं सोताचं आनं आजुबाजुचीही चार गावं फिरायची. पुरेसं दाणं, दुणे गोळा झाले कि मंग वाघ बारसीच्या दिवशी मस्त जंगलात जाऊन जेवणं बनवायची. एक प्रकारची वनभोजनेच ती.

तीन दगडाची चुल मांडायची.लाकडं-लुकडं तिडुनच गोळा करायची.चुलं पेटवायची, आनं मंग त्यावर घरुन आणलेल्या भांडयाकुंडयात मसाला भात, वांग्या बटाट्याची चमचमीत भाजी बनवायची.सैंपाक झाला का मंग मस्त त्यावर आडवा तिडवा हात मारायचा. पोटभर जेवायचं, अहा हा, काय ती गोडी, आणि काय ती चव. अमृताची गोडी म्हणतात ती हीच की.अजुनही या जेवणाची चव जिभेवर रेंगाळते आहे.


दिवाळीच्या वक्तीच एकीकडे भाताच्या सोंगण्या सुरु व्हायच्या. आम्ही मुलं मग शेतात पडलेल्या भाताच्या लोंब्या वेचायला जायचो. त्याला सरवा म्हणत असु. असा सरवा गोळा केला की मंग तो एकत्र करुन कुस्करायचा.

त्यातुन पडलेलं सगळं भात मग दुकानात वपाया न्यायचं आणि त्यातुन जे कायं चार दोन रुपये मिळतील त्याच्या मग सुरसुर्या
, फटाके, बंदुकी, नागगोळया, भुईचक्र आसं कायं कायं विकत घ्यायचं.अर्थात एवढया पैशात ते कायं पुरं व्हायचं नाही, मंग जसे कमी पडतील तसे पैसे घरुन रडुन, गागुन घ्यायचे.

दिवाळी आली की मंग मस्त पहाटी उठुन आमच्या वैतारणा धरणावं आंघुळीला जायचं. खरतरं चंदन, उटी लावुन अभ्यंगस्नान वगैरे या गोष्टी आमच्याच काय, आमच्या घरच्यांच्या ही कधी खिजगणतीत नव्हत्या. ही असली दिवाळी मोठया लोकाच्यां घरी.अशी उटी चंदनाची दिवाळी तं आम्हाला मोठ्यापणी कळली.एकदा धरणाहुन आंघुळी करुन आलं कि मंग धुतलेली कापडं अंगाव घालायची. नवी कापडं मिळायची, पण ती दिवाळी संपल्यावंच. मामाच्या गावाला गेलं कि चार आठ दिवस तिठं रहायचं. निघताना नवीनं कापडंच घेऊन यायची. तोवर दिवाळी संपलेली असायची. समदी दिवाळी जुन्याच कापडावं साजरी व्हायची.दिवाळीच्या येळालाच आमच्या भात सोंगण्या सुरु आसायच्या. मंग कधी कधी दिवसच रानात मावळायचा. भाताच्या पेंढया वाह्य, त्या बैलगाडी मध्ये भरा, बैलगाडी मांग जाऊन मंग त्या खळयावं टाका. खळयाची राखण करा. भात सडका, पोत्यात भरा, उपना, चोपना.मंग समदं गोणी, पोत्यात भरा,अशी एक ना अनेक कामं सुरु रहायची.

आम्हा बारक्या पोरानंला तं सवडच नसायची. ही सगळी आडवी तिडवी कामं आमच्याच वाटयावं आसायची. नसलंच काही कामं तं बैल चारायचं काम हमखास आमच्याकं लागेल आसायचं.घरात चकल्या, करंज्या, चिवडा व लाडुचा फराळ सुरु व्हायचा. मंग येता जाता करंजी खायं, चिवडा खायं, लाडु खायं आसं सुरु व्हायचं. चड्डयाचीं खिसे या फराळानेच भरुन जायची, आणि तोंड सतत चालु आसायचं.

संध्याकाळी गल्लीतली पोरं जमली की मंग झाले फटाके फोडणे सुरु.डबीतल्या लाल लाल टिकल्या हा समदयाचां फेवरेट आयटम.ज्याच्याकं बंदुक हाये तो बंदुकीतुन वाजवायचा.आनं ज्याच्याकं बंदुक नाही तो दगडानं वाजवायचा.बाकीचे मंग ज्याचे त्याचे फटाके. कोणाची सुरसुरी, कोणाच्या नागोळया, कोणाचे आपटी बार तं कोणाचे सुतळी बार.ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे ज्याचे त्याचे फटाके फुटायचे.

मंग भाऊबीजाच्या दिवशी रानातल्या कामाचा अंदाज घेऊन मामाचं गावं गाठायचं.भाताचं काम लयं पलीचं आसेल तर मंग भाऊबीज थोडी पुढं जायची. पण काम वताडेल आसलं तर मंग त्याच दिशी मामाचं गाव गाठायचं.आमचं मामाचं गाव करुळं. आमच्या गावापासुन तीन चार कि.मी.अंतरावर. त्यामुळं एसटी फिसटीची काही गरज नव्हती. वावराडीतुन एकदा का दोन्ही हाताच्या मुठी आवाळल्या आनं पळत सुटलं का पंधरा वीस मिनटात मामाच्या गावाच्या पायथ्याला आम्ही हजर व्हायचो.
आमचं गाव तीन रस्त्याच्या मिळनावर होतं. त्यामुळं मंग त्र्यंबकेश्वरच्या येळुंज्याची मावशी, नाशिकच्या राजुरची मावशी एसटीने आमच्याच इठंउतरायची. मंग आम्ही सारे मावसभाऊ, बहिणी सगळेच पायी निघायचो मामाच्या गावाला. बाई, मावशी नं त्या वझं वझं यायच्या इकडचं तिकडचं चावळत, पण आम्ही पोरं पोरं मात्र पळत सुटायचो.

आमच्या मामाचं गावं चांगल उच डोंगरावं होतं. आम्ही एकदा पायथ्याशी पोहचलो का मंग मामाच्या गावची गाव विहीर लागायची. तिठं पाणी शेंद्णाऱ्या आया बायाकुंन मंग बादलीभर पाणी घ्यायचं. तिठंच फरशीवं खसाखसा हात पाय धुवायचे, आनं मंग दगडावं बसुन थोडा दम खायचा.तवर बाई नं मावशी नं त्या विहीरीपाशी पोहचायच्या. मंग तिठं थोडा आराम, विराम व्हायचा. आनं मंग मामाच्या गावचा घाट चढाया सुरुवात व्हायची.हा घाट चढताना मात्र चांगलीच दमछाक व्हायची. आम्हाला रिकामं चढताना धाप लागायची. आणि करुळयाच्या बायाचीं मला शिफारत वाटायची, हा घाट चढुन पाणी वहायचं म्हंणजे काई खायचं काम नव्हतं. आम्ही तं तोंडातच बोट घालायचो.विहिरीपसुन सुरू झालेला घाट एकदा का चढुन आलं कि पहिल्याच तोंडाला आमच्या मामाचं घर लागायचं. मामीनं, मामेभाऊ आसले तं घरी आसायचे, नायतर मंग ते त्यांच्या मामाच्या घरी निघुन जायचे.

मंग समदं घरच बहिणी भाष्याच्या ताब्यात जायचं.माझ्या सगळ्या सा मावश्या, आनं त्यांची दहा वीस पोरं. मंग काय सगळ्या घरभर धुडगुसच धुडगुस.

मामाच्या घरी खाया प्याची भरपुर चंगळ होती. ताट ताट भर चहा- भाकरी. दुधं, दही, ताक भात, गुळं- खारीक खोबरं, पापड मिरची, धिरडे, भजे, कुरडाया, पापड्या आनं कायं कायं आसायचं.हे दिवस संपुच नये असं वाटायचं. पण आमच्या आयाच घाई करायच्या. घरी लय काम पडेल. भातं रानातचं आहे.सडकायचं बाकी आहे वगैरे वगैरे.

मंग आमच्यातले जे राहणार आहे ते मामाच्या घरी राहयचे. आनं ज्यांनला जायचंय ते निघायची तयारी करायचे.मामानं आणलेली नवी कापडं चोपडं अंगाव चढावली की  मुठभर हत्तीचं बळ चढायचं.तवा काय एवढी फँशन बिशन नव्हती. आनं कापडं ही वर्षातुन एकदा दोनदाच मिळायची. मंग मन हरखुन जायचं. तवा एकच ब्रँडं मांजरपाटची कापडं. 

    कापडं ही घोटीलाच शिवेल आसायची.अंदाजपंची मापाची. मंग ज्याला जो येईल त्याने तो ड्रेस घ्यायचा. ही कापडं घातली आनं गावभर फिराया गेलं की आजुबाजुची प्रत्येक येग येगळया घरची मावसभावाचीं टोळी ओळखु यायची. कारण प्रत्येक घरी ज्याचा त्याचा मामा एकाच कापडाची कापडं आणायचा.निघायची येळं झाली का मंग फराळानं पिशव्या गच्च भरायच्या.कधी कधी लुगडयावरुन बहिणी भावाचीं थोडी फार धुसफुसही व्हायची. हे सगळं आटोपलं का मग आम्ही आमच्या गावाकडे फिरत असायचो. तीच आमची पायाची गाडी. पण यावेळी गाडीला जोर असायचा.कारण येतानां घाट पण जातांना मात्र सगळी वाहाटळ आसायची. मंग बाई, मावश्या, मामा, आजी-आजोबा एकुमेराचा निरोप घेतायेत तोवर आमच्या मावसभावाच्यां पळत सुटलेल्या गाडया मामाच्या गावच्या पायथ्याला गाव विहीरीपाशी येऊन थांबेल आसायच्या.कंधी पाठीमागच्यानंला येऊन दयायचं, न्हयं तं आपलं गावं व घर गाठायचं.

  

अशी आपली साधी सुधी दिवाळी जमेल तशी साजरी गोजरी केली, का लगेच अंगात संचारलेली शक्ती घेऊन आपल्या भात सोंगणीच्या कामाकं वळायचं.....!


 

 नवनाथ गायकर






 

1 comment:

  1. सुंदर शब्द चित्र... खूप आवडलं

    ReplyDelete