' सय्या छेड देवे, ननद चुटकी लेवे, ससुराल गेंदा फुल
सास गारी देवे, देवर समझा लेवे, ससुराल गेंदा फुल'
"ए हॅलो हॅलो, हे बायकांचं गाणं आहे. तू का म्हणतो आहेस?" पण आता पिकनिक फीव्हर चढायला
लागला होता. "गाता गळा नि फुलता मळा. गाताना टोकलं नाहीस तर चार
तासात चिकमंगळूर!!" सडेतोड उत्तर द्यावं तर ते
आमच्या अहोंनीच.
यंदाची आमची दिवाळी चिकमंगळूरच्या होम स्टे मध्ये साजरी होणार होती, ह्याला कारण नवऱ्याचा मित्र!! 'तुम्हांला यायचं असेल तर आताच सांगा, बुकिंग करणार आहे मी आता.' इति तो. TV, Laptop, नि mobile ला चिकटलेली घरची माणसं गोळा केली. मित्रांचं नि आमचं मोठं extended कुटुंब घेऊन आम्ही रवाना झालो.
पहिला दिवस नरकचतुर्दशी. मुलांना झोपेतून उठवण्याचा प्रश्न पक्षांनीच सोडवला. भल्या पहाटे बडबड, गप्पा सुरु! बरोबर आणलेल्या पणत्या, मेणबत्या दारात लावल्या आणि तिथल्याच रानफुलांची रांगोळी जमवून आणली. दिवाळीचा 'माहौल' बन ही गया.
होम स्टे चा पोऱ्या, येष्ट टी एष्ट कॉफी करत, डोळे चोळत नि लुंगी सावरत
हजर!
केसांच्या जंजाळात लपलेला, भरघोस दाढी मिशा बाळगलेला
त्याचा चेहेरा, 'नरक चतुर्दशीचा नरकासूर तो हाच'. ह्याच्या हातचा चहा कोण कोण
ट्राय करणार? 'स्वामी, निवे अति भयंकर स्नाना माडी, चाय टपरी येलली?'
त्याला अभ्यंग स्नानाला पाठवून आम्ही निघालो. चार एक किलोमीटरचा खडकाळ ट्रेक चढल्यावर दिसलेली टपरी, नि गरम गरम घसा शेकवणारा दिवाळीचा पहिला वहिला चहा!! अहाहा ...इडली, सांबार, कडबू, डोसे, चटणीचा मस्त साऊथ इंडियन ब्रेकफास्ट, तो ही बिनकष्टाचा! वास आसमंतात! ट्रेक मध्ये अंगाला भरपूर लागलेलं मातीचं उटणं खसाखसा धुऊन अभ्यंगस्नान! खवळलेली जठरं नि समोर आलेला ताजा ताजा नाश्ता, चकली चिवड्याची आठवण येतेय कुणाला? मोनोपॉली, पत्ते, ल्युडो, सापशिडी, कॅरम नि जोडीला हलकल्लोळ!! उरल्या सुरल्या एनर्जीचा संपूर्ण निचरा! दुपारी बिशीबेळे भात, लोणचे, पापड.
आज लक्ष्मीपूजन!! करौकीवर गाणी म्हणायचा बेत. बऱ्या वाईट आवाजात गाणाऱ्यांना सुरात गायला लावणाऱ्या ह्या यंत्राचा ज्याने शोध लावला त्या शोध जनकाची केव्हढी ही दूरदृष्टी!!
आज पाडवा. त्या निमित्त, नवरे विरुद्ध बायका क्रिकेटची मॅच. 'ए ह्यांना कशाला रे पाडवा नि बिडवा? सगळ्या कमावत्या. खरंतर ह्यावर्षी नवऱ्यांना पोस्त मिळायला हवं'. आम्हां सगळ्याजणींनाही हे पटलं. त्यामुळे आम्ही त्यांना आऊट केलं नाही, रन्स काढू दिल्या, मॅच जिंकू दिली. गाडी चालवून घरी सुखरूप घेऊन जाणार. त्यामुळे 'पोस्त तो बनता है' दिवाळीतही डील!!
रात्रीची मैफिल खास गाण्यांची. 'चषका मागुनी चषक चालले, पेया मागुनी पेये, जिवलगा किती रे घेशील तू, जिवलगा किती रे पिशील तू? धरेस भिजवून गेल्या धारा, फुलून आला मनी पिसारा .....अशी सगळी मजा चालली होती.
नाश्त्यालाच चित्रान्ना! हलकी फुलकी मनं नि हलका फुलका नाश्ता. जेवणात 'पुरी सागू' मिळणार असल्याची सुवार्ताही मिळाली!! ही दिवाळी स्पेशल होती, जिथे घरची माणसं क्षण नि क्षण साथीला होती. डिजिटल डिटॉक्स Hurray!!
नेहा
भदे
खूप छान रूपा... विनोदी.. चकलीसारखं खुसखुशीत
ReplyDeleteअसे खमंग, खुसखुशीत नर्म विनोदाची पेरणी केलेले लिखाण असेल तर फराळाचे गरजच काय? फराळ तरी बिघडण्याचे चान्सेस खूप असतात पण तुझे लिखाण नेहमीच बहारदार असते. असेच लिहित जा.
ReplyDelete