लताची गाणी अगदी डोक्यात शिरतात! पार डोक्यात शिरून मेंदूचा भुगा करतात! किती दिवस झाले तरी ती गाणी डोक्यातून
निघतच नाही! आणि असं एखादं गाणं जर साधनासारख्या विलक्षण सुंदर अभिनेत्रीवर चित्रित
झाले असेल तर मग विचारायलाच नको! डोक्याबरोबर ते गाणं मग हृदयाचाही ताबा घेतं!
असंच एक गाणं अगदी अचानक यू-ट्यूबवर पाहायला मिळालं आणि त्याने मला झपाटूनच
टाकलं. कोणाला जास्त माहीतही नसलेलं आणि विशेष लोकप्रिय नसलेलं
गाणं मनाचा ठाव घेऊन गेलं! असं आहे तरी काय या गाण्यात?
आणि कुठलं आहे हे गाणं?
Source: Google |
बिमल रॉय यांनी “परख” नावाचा एक अतिशय वेगळा आणि सुंदर चित्रपट काढला होता, हे मला हे गाणं ऐकूनच कळलं! अतिशय वेगळया विषयावरचा हा चित्रपट, बिमल रॉय हे कुठल्या दर्जाचे दिग्दर्शक होते हे
दाखवून देतो (उगीच नाही “मधुमती”ची जादू आजही कायम आहे!) चित्रपटाची कहाणी अगदी वेगळी आहे. एक लहान खेड्यातला माणूस शहरात नशीब आजमायला जातो आणि तिथे जाऊन आपल्या
मेहनतीने कोट्याधीश होतो. पण त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात ते लहानसं गाव, तिथले लोकं नेहमीच असतात. तो मरताना आपल्या मुलाकडून वचन घेतो की तो
गावाला जाऊन तिथल्या सगळ्यात प्रामाणिक माणसाला मोठी रक्कम भेट देईल! आता गावातला सगळ्यात प्रामाणिक माणूस कसा शोधून काढायचा? म्हणून त्या कोट्याधीशाचा मुलगा गावातल्या पोस्टमास्तरला पत्र लिहून ही बातमी
कळवितो.
गावात ही बातमी कळल्याबरोबर एकच हलकल्लोळ उडतो! जो तो आपण किती चांगले आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतो. गावातले राजकारणी, व्यापारी, डॉक्टर,
पुजारी ही सगळी बदमाश मंडळी एकदम चांगली वागू लागतात. मात्र या गावात एक शिक्षक असतो, तो खरोखरीच प्रामाणिक
असतो! खरंतर हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजव्यवस्थेवर ओढलेला
एक कोरडाच आहे! या चित्रपटातील अनेक गोष्टी आजही लागू पडतील,
इतक्या समर्पक आहेत.
Source: Google |
गाण्याची सुरुवात बासरीच्या सुंदर सुरांनी होते. म्हशीच्या पाठीवर बसून एक गुराख्याचा मुलगा
सुंदर बासरी वाजवितो. सोबत गुरांचा कळप जात असतो. गावातील स्वच्छ, निर्मळ वातावरणात साधना नदीकाठावर पाणी
भरायला येते आणि हे नितांतसुंदर गाणं सुरू होतं.
मिला है किसीका झुमका
थंडे थंडे, हरे हरे नीमतले
सच्चे मोतीवाला झुमका
थंडे थंडे, हरे हरे नीमतले
शैलेंद्रसारख्या महान गीतकाराने लिहिलेलं आणि सलील चौधरी यांनी संगीत दिलेलं हे गाणं इथूनच आपल्या काळजाचा ठाव घेतं!
सहज शब्द, मधुर संगीत, लताचा
तो गोड आवाज आणि साधनाची मनमोहक अदा! नकळतच आपण या गाण्याकडे ओढले जातो. त्या झुमक्याला उद्देशून ती आपल्या भावना
व्यक्त करू लागते. तो झुमका जणू त्याच्या मालकिणीला म्हणतो
-
प्यारका हिंदोला यहाँ
झूल गये नैना
सपने जो देखे मुझे
भूल गये नैना
हाय रे बेचारा झुमका
जीवनभर का नाता
परदेसियोंसे जोडा
आप गई पिया संग
मुझे यहा छोडा
पडा है अकेला झुमका
शाळेत असताना मराठी विषय शिकताना, कवितेतील विविध अलंकार शिकलो होतो.
त्यामध्ये एक अलंकार होता “चेतनगुणोक्ती”! या अलंकारात निर्जीव वस्तू या सजीव
आहेत अशी कल्पना करून त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या असतात! शैलेंद्रने हा अलंकार या गाण्यात
किती सहजपणे वापरला आहे. शेवटचं कडवं तर गाण्याला एकदम वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं -
हाय रे प्रीतकी ये
रीत जाने कैसी
तनमन हार जाने में है
जीत जाने कैसी
आपलं सर्वस्व झोकून प्रेमात पडण्याची गंमत त्या बिचाऱ्या निर्जीव
झुमक्याला काय कळणार?
बस्स! तीन कडव्यांचं हे छोटंसं गाणं इथेच संपतं!
पण ते नदीकाठाचं शांत वातावरण, साधनाचं ते दैवी
सौन्दर्य आणि सहज अभिनय, शांत सुमधुर संगीत आणि या सगळ्यावर कडी म्हणून लताचा काळीज कापणारा आवाज! या सगळ्यांचा एकत्र परिणाम असा होतो की काही
क्षणांसाठी आपल्या रोजच्या दुनियेपासून आपण लांब निघून जातो आणि जणू काही आपण त्या
१९६० सालातील त्या शांत नदीकाठी मनाने पोहोचून जातो!
गाण्यात विलक्षण शक्ती असते म्हणतात, पण गाणं तुम्हाला वर्तमान काळ विसरून भूतकाळात
नेऊ शकतं आणि मनाला आल्हादित करू शकतं, याचे हे एक समर्थ प्रत्यंतर आहे!
आणि एकदा तुम्हाला ही गंमत कळली की मग तुम्हाला हे गाणं परत परत ऐकावंसं
आणि पाहावंसं वाटते. हे गाणं नुसतं ऐकूच नका तर बघासुद्धा! अन्यथा साधनाच्या दैवी सौन्दर्याचा एक नमुना
बघायला मुकाल!
कधीही रोजच्या धकाधकीच्या आयुष्याचा कंटाळा आला, खोटेपणाची चीड आली, वैताग आला तर हे गाणं ऐका-पहा! या गाण्यातील सच्चेपणा, साधेपणा जादूच्या कांडीसारखा
तुमच्या मनाला एक नवीन तजेला देऊन जाईल!!
Youtube लिंकसाठी इथे क्लिक करा: मिला है किसीका झुमका
Youtube लिंकसाठी इथे क्लिक करा: मिला है किसीका झुमका
अविनाश चिंचवडकर
खूप सुंदर, गाणं ऐकल पहिल्यांदाच. निरागस सौन्दर्य.. आणि तितकाच निष्पाप आवाज.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखूप सुंदर! लिहिलेलं सुरेख 🙏🙏
ReplyDeleteहे गाणंऐकलेलं आहे - पण या रसग्रहणानंतर, ते वेगळ्या पद्धतीने भावलं !
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete