मैत्र जीवांचे



मैत्री आणि मैत्र आपण जवळपास सारखेच समजतो. पण दोन्हीत मूलभूत फरक आहे. एकसारख्या आवडी-निवडी असणे, एकसारखे स्वभाव किंवा एकच गरजा असणे यातून आकर्षित होऊन केली जाते तीमैत्री’. पण एकमेकांच्या सहवासाने, आपसांतील विश्वासाने फुलते तेमैत्र’. म्हणूनच मैत्री होते किंवा केली जाते आणि मैत्र जुळते किंवा फुलते.
न कळत्या वयापासून आपण हा माझा मित्र आहे, आमची खूप छान मैत्री आहे असे सर्रास म्हणत असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक व्यक्ति भेटतात. प्रत्येकांशी आपली मैत्री होतेच असे नाही. बऱ्याचदा मैत्री ही संकल्पना खूपच ढोबळ मानाने वापरली जाते. आपल्या दैनंदिन परिघात शेकडो व्यक्ती  असतात. त्या सगळ्यांशीच आपली मैत्री नसते. अगदी रोज भेटणाऱ्या, एकत्र शिकणाऱ्या किंवा काम करणाऱ्या दोन व्यक्तीध्येही मैत्री असेलच असे नाही. पण कोण्या एखाद्या व्यक्तिला एकदाच भेटल्यावर देखील जर ती तुमच्या मनात घर करून जाते आणि तुम्ही त्या व्यक्तिची माहिती काढून, आवडी-निवडी पडताळून ओळख वाढवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही त्या व्यक्तिशीमैत्रीकरण्यास उत्सुक आहात असा त्याचा अर्थ होतो. कधीतरी दुसरे कोणी तुमच्याबाबतीत असे करू शकेल आणि तुम्हाला अनायासे एक चांगला मित्र मिळून जाईल. पण अशाप्रकारे मैत्री करणे, वाढवणे आणि जपणे या गोष्टी थोड्या मोठ्या वयातच संभवतात; पौगंडावस्थेत, तारूण्यात किंवा पुढील आयुष्यात कोणत्याही वयात. बालपणी मात्र दिसेल ती आपल्या वयाची व्यक्ती आपली तात्पुरती मित्र बनू शकते. फार क्वचित बालमित्र असलेले लोक आयुष्यभर आपली मैत्री टिकवून ठेऊ शकतात. असे लोक खरोखरच भाग्यवान समजले पाहीजेत. कारण अशा मैत्रीचे काळाच्या ओघातमैत्रझालेले असते.
जिथेमैत्रअसते तिथे एकमेकांकडून अपेक्षा, देवाण-घेवाण, मान-अपमान अशा गोष्टींना थारा नसतो. जिथे मैत्र फुललेले असते तिथे एकमेकांना न सांगता समजून घेतले जाते. आपल्या मनातले राग, लोभ, प्रेम, दु:ख हे मित्राला प्रत्यक्ष सांगण्याची गरज देखील पडत नाही. कारण तिथेशब्देविण संवादुअसतो. परस्पर साहचर्याने निर्माण झालेले मैत्र एकमेकांचा स्वभाव पुरता ओळखून असते. एकमेकांच्या मनाचे लहान-सहान कप्पे, बोचरे कोपरे, हळव्या जागा आणि अर्थातच बलस्थाने सारे काही ठाऊक असते. पण यातल्या कोणत्याही गोष्टीचा परस्परांकडून गैरफायदा घेतला जात नाही. म्हणूनच मैत्रीमधे विश्वासघात होऊ शकतो, पण ज्यांच्यात मैत्र निर्माण झाले आहे त्यांच्यात विश्वासघात केवळ अशक्य.
मैत्री बऱ्याचदा स्वार्थापोटी असू शकते. इच्छित काम झाल्यावर ती संपुष्टातही येऊ शकते. पण मैत्र आयुष्यभर आपली साथ देते. अतिशय नि:स्वार्थ, निर्लेप भावनेने जेव्हा दोन मने एकत्र येतात तेव्हाच मैत्र फुलते. आयुष्यात असेमैत्रलाभणे म्हणजे एखादा खजिनाच सापडणे. ज्याच्याशी आपले मैत्र असते तो दु:खात-सुखात सारखीच साथ देतो, कधीही आपले पाऊल वाकडे पडू देत नाही, कोणत्याही कामातले संभाव्य धोके, अडचणी वेळीच हेरून आपल्याला सावध करत रहातो. आपल्या आनंदाशिवाय, कल्याणाशिवाय इतर कोणताही विचार त्याच्या मनात असत नाही. असे मैत्र मिळवण्यासाठी आपणही तशाच स्वभावाचे असणे आवश्यक आहे. स्वत: आपल्याला हवे ते करणार, आणि दुसऱ्यांकडून चांगल्या मैत्रीची अपेक्षा ठेवणार अशा लोकांना हे दुर्मिळ मैत्र निश्चितच लाभत नाही.
मैत्रकोणातही असू शकते. दोन मित्रांमधे,बहिण-भावांमधे, आई-वडिल आणि अपत्यांमधे, पती-पत्नी मधे किंवा इतर कोणत्याही नात्यांमधे. ज्या नात्यामधेमैत्रफुललेले असते ते नाते नुसते नाते न राहता आपल्या आयुष्यातील सुंदर, शांत विसाव्याचे ठिकाण बनून जाते. असे मैत्र जर प्रत्येकाचे प्रत्येकाशी, समाजातल्या प्रत्येक स्तरात, देशात, जगभरात निर्माण झाले तर ह्या विश्वातील शत्रुत्वाची, अहंकाराची भावना नष्ट होऊन सारे जग आनंदी होईल.
ज्ञानेश्वरांनाभूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचेहे लिहिताना कदाचित हाच सखोल अर्थ अभिप्रेत असावा.

मानसी नाईक 


5 comments:

  1. पहिल्याच वाक्यातला मैत्री आणि मैत्र मधला फरक अगदी चपखल ... !

    ReplyDelete
  2. ज्ञानेश्वरांनी 'मैत्र 'शब्द पसायदानात नेमका का योजला ते या
    लेखामुळे समजले.

    ReplyDelete
  3. नीना वैशंपायनAugust 1, 2020 at 11:17 PM

    खूप छान

    ReplyDelete
  4. Very nice ! Your article shows your clear thoughts and deep reading ! 👌👍

    ReplyDelete