इंदिरा नगर येथील मित्रमंडळ बंगळुरू ही संस्था गेल्या ४१ वर्षांपासून मराठी लोकांना एकत्र करून, आपली सांस्कृतिक सामाजिक जाणीव जपण्याचे महत्त्वाचे कार्य करते. बंगलोरमध्ये राहूनही मराठी मातीशी नाळ जोडून ठेवते. आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडीचा सण म्हणजे गणेशोत्सव. आपल्या संस्थेचे वर्ष ही त्यापासून सुरु होते. मागच्या वर्षभर करोनाच्या महामारीमुळे आपल्याला ई व्यासपीठावरूनच कार्यक्रम करावे लागले. आपली technical team खूप छान असल्यामुळे, एकाच वेळेला पुणे, नागपूर, कोल्हापूर इथून मुलाखत घेणारे- देणारे असले, तरी आपण बंगलोरला बसून कार्यक्रम बघू शकलो.
यंदा गणपतीचे आगमन दहा सप्टेंबरला झाले. आपल्या मंडळाच्या उपाध्यक्ष स्नेहा
केतकर यांच्याकडे श्रींची षोडशोपचारे पूजा झाली. 'पुढील
कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू दे.' अशी प्रार्थना पण झाली.
या मंगलमय वातावरणांत गंधर्व कला केंद्राचा संध्याकाळचा कार्यक्रम छान झाला.
सुरुवात अर्थात स्नेहा केतकर यांनी करून दिली आणि श्रीमती अर्चना बक्षी यांनी
दुर्गा चरित्रम् ची माहिती सांगितली. श्री पुरु दधीचि यांनी दुर्गा सप्तशती मधून
ही कथा घेऊन नृत्यनाटिका सादर करण्याकरिता हिंदीत अनुवादित केली. नृत्यनाटिकेतील
गीतांना मुकुंदराज देव यांनी संगीतबद्ध केले. श्रीरंग टेंबे व प्राजक्ता जोशी
यांनी ही गीते गायली. श्रीमती अर्चना बक्षी यांनी ह्या नृत्य नाट्याचे दिग्दर्शन
केले. आपल्या दहा शिष्यांबरोबर त्यांनी ही दुर्गा चरित्रम् कथा अतिशय सुरेख कथ्थक
नृत्याविष्कारांनी रसिकांसमोर मांडली. एक तास सर्व मंत्रमुग्ध होऊन बघत होते.
वेशभूषा, सुरेख नेपथ्य ज्योती जोगळेकर व अपर्णा चेरेकर यांनी
केले. गंधर्व कला केंद्रातर्फे हा उत्तम कार्यक्रम सादर केला गेला.
दुसर्या दिवशी शनिवार ११ सप्टेंबरला सकाळी 'बाल
गुणदर्शन' हा मुलांसाठी कार्यक्रम होता. ९ वर्षांची खुशी
आंबोलकर हिने 'नन्ना मुन्ना सपना' वर
सुरेख नृत्य सादर केले. छोटासा गोड ओम बक्षी लाडू झाला गोड गोड. वय फक्त दीड वर्ष.
वेशभूषा छान होती. बारा वर्षाचा निमीष बोडस यानी की बोर्ड वर 'न जाने क्यूँ ' छान वाजवले. राजस अभ्यंकरने 'है अपना दिल तो आवारा' व्हायोलिन वर वाजवले. जिया
माने हिची छोटी बोटे 'की बोर्ड' वर
सराईतपणे फिरत होती. अद्वैत देशपांडे राग दरबारी सुंदर गायला. एवढ्या लहान वयात
त्याची तयारी मोठ्या गायका सारखी आहे. कार्यक्रमाची सांगता रिद्धिमा मोघे हिच्या 'भोलानाथ भोलानाथ' हे छान गाण्याने झाली. यातूनच
स्टेज धारिष्ट्य येईल व मोठे कलाकार तयार होतील.
संध्याकाळी दुसऱ्या सत्राचा कार्यक्रम 'गोष्ट अस्सल चवीची' या शैलजा काटदरे यांच्या मुलाखतीचा झाला. शैलजाताई या साठ वर्षापासून काटदरे ग्रुपचा मसाला व्यवसाय सांभाळीत आहे. सासुबाई सासरे यांच्या या व्यवसायात त्या गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांची मुलाखत मधुरा ओगले देव हिने घेतली. मधुराने उत्तम प्रकारे प्रश्न विचारून सगळ्या व्यवसायाबद्दल माहिती प्रेक्षकांना समजावून दिली. व्यवसायातील खाचाखोचा सांगून जुन्या पिढीकडून नवीन पिढीपर्यंत व्यवसाय कसा पोहोचविला, आपली गुणवत्ता राखून नवीन मशिनरी आणली, नवीन मार्केटिंगचे तंत्र आत्मसात केले, कामगारांशी आपुलकीने वागून त्यांचे प्रश्न पण समजावून घेतले. या सर्व माहितीचा सगळ्यांनाच फायदा होईल हे नक्की. म्हणजे करमणूकी बरोबर व्यवसायाचे ज्ञान मिळाले. भविष्यात कुणाला व्यावसायिक व्हायचे असेल तर ह्या गप्पांतून नक्कीच मार्गदर्शन मिळेल.
रविवार १२ सप्टेंबर हा खरे तर आपला महाप्रसादाचा दिवस. त्यामुळे महत्त्वाचा. यादिवशी मित्रमंडळाने आजचा विषय करोना याला धरून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांना बोलावले होते. मुलाखत घेणारी गंधाली सेवक. मग काय विचारता! योग्य दिशेने प्रश्न विचारून तिला समोरच्याला व्यवस्थित बोलते करता येते व त्यांना बोलायला भरपूर वेळ देते. डॉ. केळकर हे प्रसिद्ध पक्षी छायाचित्रकार पण आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची छायाचित्रे प्रकाशित होतात. त्यानिमित्त ते जानेवारी २०२०मध्ये श्रीलंकेला गेले असताना विमानतळावर त्यांना मास्क मधले कर्मचारी दिसले. त्यांना लगेच कल्पना आली व लॉकडाऊन काळात हॉस्पिटलमध्ये लागणारी सर्व तयारी करता आली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत, दीनानाथ हॉस्पिटलने खूप महत्त्वाची भूमिका निभावली. दोन बिल्डिंगमध्ये कोविड/ नॉन-कोविड पेशंटची वेगवेगळी व्यवस्था केली गेली. त्यामुळे अत्यावश्यक पेशंटकडे लक्ष देता आले. पंचसूत्री कार्यक्रम लोकांना सांगितला. सूर्यप्रकाश, विटामिन डी, जलनेती, मोकळी हवा आणि व्यायाम किती आवश्यक आहे ही ती पंचसूत्री. त्यांनी कोविडशी लढा देण्यासाठी गीतेचे तत्त्वज्ञान 'कर्मण्येवाधिकारस्ते' सांगितले व डॉक्टर्स तयार केले. त्यांची मुलाखत खूप छान झाली. मला वाटतं सर्वांनी ही मुलाखत अवश्य पहावी.
संध्याकाळी आपला समारोपाचा कार्यक्रम झाला. अध्यक्ष श्री.काळे यांनी मंडळाचा वर्षभराचा आढावा घेतला. लोकांसाठी 'सूर तेच छेडीतां' हा गाण्यांचा कार्यक्रम होता. त्या कलाकारांची ओळख त्यांनी करून दिली. बहारदार गाण्यांचा कार्यक्रम झाला. जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले अतिशय प्रसिद्ध गायक आहेत. गणरायासाठी 'गणनायका' हे गीत सादर करून सुरुवात झाली. स्नेहल दामले यांनी छान निवेदन केले. गाण्यांची निवड छान होती. जसे की 'सांज ये गोकुळी', 'जीव रंगला', 'डिपाडी डिपांग', लावणी असे मराठी व काही हिंदी सुप्रसिद्ध गाणी प्रस्तुत केली. वादकांनी पण उत्तम साथ दिली. अगदी अवर्णनीय कार्यक्रम झाला.
२०२१ च्या गणेशोत्सवाची सांगता अशी सूरमय झाली. 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत
बाप्पाला सगळ्यांनी निरोप दिला.
फार सुंदर नियोजन!
ReplyDelete