मित्रमंडळ कार्यक्रम अहवाल - शब्दधून

 

शब्द - धुनेच्या अद्वैतानं अजरामर केलेली सकाळ

                  

ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी

शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी                       


ज्ञान साहित्य आणि कलेचा दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या मराठी संस्कृतीत वाङ्मयाला नेहमीच विशेष स्थान राहिलं आहे. त्यातही कविता हा मनाला भेटणारा पण काहीसा कठीण वाङ्मय प्रकार. परंतु पोकळ शब्दांच्या बांबूची बासुरी करणारे अनेक थोर कवीश्वर या मराठी मातीत होऊन गेले आणि या शब्दरूपी हिऱ्यांना संगीताचं कोंदण चढवून अजरामर करणारे संगीतकार आणि गायक सुद्धा.    


याच आपल्या मराठी भाषेतल्या संत वाङ्मयापासून ते अभिजात मराठी कवितेपर्यंतच्या प्रवासातील काही महत्वपूर्ण टप्पे आपल्यासमोर आणून हा प्रवास उलगडून दाखवणारा सर्वांग सुंदर कार्यक्रम म्हणजे शब्दधून.

 

कार्यक्रम कविता आणि गाण्यांचा असला तरी त्याचं वर्णन शब्द आणि धून असं मात्र नक्कीच करता येणार नाही कारण कवितेचे शब्द आणि संगीताची धून याचं अद्वैत त्यांनी कार्यक्रमभर अतिशय सुंदर रीतीने जपलं आहे.

 

कोव्हीडच्या जवळजवळ दोन वर्षांच्या ब्रेकनंतर बंगलोरकर रसिकांसाठी मित्रमंडळ बंगळुरूने रविवार 19 जून रोजी पुरंदर भवन येथे शब्दधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. रुपा भदेने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्नेहा केतकर व मधुरा देवने कलाकारांचे स्वागत केले आणि हे सगळे अवघ्या पाच मिनिटात आटोपून वेळेवर कार्यक्रमाला सुरुवात झाली, आणि पुढचे तीन साडेतीन तास उत्तरोत्तर रंगत गेली.


ऋषिकेश रानडे

प्राजक्ता आणि ऋषिकेश रानडेच्या संतवाणीच्या मेडलेने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि नेहमीपेक्षा वेगळा आणि अत्यंत दर्जेदार कार्यक्रम पाहायला मिळणार याची जाणीव सर्वांना झाली.




"कवितांची वही कधी कोरडी राहत नाही

 हे  समजण्याचं तुझं वय नाही आणि ,

पाऊस प्रेम आणि कविता हा समजावून सांगण्याचा विषय नाही." 

असं म्हणत कवी वैभव जोशी यांनी पहिल्याच कवितेला टाळ्या घेतल्या.

सूर म्हणजे ईश्वर आणि शब्द म्हणजे आमचे मायबाप आहेत असं म्हणत पुढील कार्यक्रमाची जणू नींवच घालून दिली. 


जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, या कुसुमाग्रजांच्या गीतातून सलील कुलकर्णींनी आधुनिक कवींकडे कार्यक्रम वळवला. सलील फक्त संगीतकार आणि गायकच नाहीत तर साहित्य, कविता कवी यांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे याची जाणीव कार्यक्रमात वारंवार होत होती.



प्राजक्ता रानडे

भा रा तांबे, बा भ बोरकर यासारख्या कवींनी मराठी भाषेला किती समृद्ध करून ठेवले आहे या गोष्टीची जाणीव पुन्हा एकदा या कार्यक्रमाने करून दिली. बोरकर हा सलील कुलकर्णींचा जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे लता दीदी आणि बोरकर यांचं आता विसाव्याचे क्षण गाताना आणि दीदींच्या आठवणी सांगताना ते भावुक झाले होते.



सलिल कुलकर्णीं

ओळख परेड, डोह, रेड सिग्नल या वैभव जोशी यांच्या कविता  जणू प्रेक्षकांशी संवाद साधत कार्यक्रम पुढे नेत होत्या.

आरती प्रभूंच्या तू तेव्हा तशी ऋषिकेश रानडे यांनी गायलेल्या गाण्याला वन्स मोअर दिल्याशिवाय प्रेक्षकांना राहवले नाही.


"मराठी भाषेचे चित्र काढायचं झालं तर ते कसं असेल तर शांताबाई सारखं असेल" हे सलील कुलकर्णींचे उद्गार  सगळ्यांना अगदी मनापासून पटून गेले.


शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, ग दि माडगूळकर, ना धों महानोर या सगळ्या कवींचं एखाद दुसरं गाणं निवडायचं म्हणजे महाकठीण काम. पण या एक-दोन गाण्यातूनही ते कवी आणि संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कलाकारांनी अत्यंत समर्थपणे केलं. कार्यक्रमाला वेळेची मर्यादा होती हे खरंच पण गदिमांचं एकच गाणं ऐकायला मिळालं याची चुटपुट मनाला लागलीच.


वैभव जोशी

मग वेळ आली कवी ग्रेस यांची. ग्रेस आणि वैभव जोशींचं विशेष नातं बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नव्हतं. ग्रेस यांच्या शैलीत लिहिणं शिवधनुष्य उचलण्याइतकं कठीण. पण ग्रेस यांच्यावरचीच ग्रेस यांच्या शैलीत केलेली कविता वैभव जोशी यांनी ऐकवली आणि त्यांच्याबद्दलचा आदर जणू शतगुणित झाला.

 

सुधीर मोघे, कवी सौमित्र, संदीप खरे, वैभव जोशी या सगळ्यांची गाणी संपूच नये असं वाटत असणारा हा कार्यक्रम शेवटाकडे आला. पुन्हा एकदा वेळेच्या मर्यादांची जाणीव होतीच पण गुरु ठाकूर सारखे कवीही राहून गेले.

जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना

तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना

या वैभव जोशींच्या गाण्यासारखीच अवस्था बऱ्याच जणांच्या मनाची कार्यक्रम संपायच्या वेळा झाली होती.

अग्गोबाई ढग्गोबाई वर एका छोट्या मुलीने स्टेजवर येऊन केलेला नाच, दमलेल्या बाबाची या कहाणीनं पाणावलेले डोळे या सगळ्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या खूप काळ लक्षात राहील यात शंका नाही.



सलील कुलकर्णींचा मित्रमंडळाने केलेला हा तिसरा कार्यक्रम! प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक प्रेक्षकानं अधिकाधिक एन्जॉय केला आहे. ऋषिकेश आणि प्राजक्ता रानडे यांना टीव्हीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण ऐकले आहे, पण या कलावंतांना प्रत्यक्षात ऐकण्याची मजा काही औरच होती. वैभव जोशी यांच्या कवितांनी कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे.  या सर्वांबरोबर आलेला वाद्यवृंद सुद्धा अप्रतिम - तबल्यावर असणाऱ्या आदित्य आठलेंचा हा तिसरा कार्यक्रम त्यामुळे प्रेक्षक त्यांना ओळखत होतेच.  यासोबत केदार परांजपे यांचे संगीत संयोजन आणि सिंथेसायझर, रितेश आहोळ यांची गिटार, अपूर्व द्रविड यांची तालवाद्यं आणि नितेश देशपांडे यांची बासरी यांनी कार्यक्रमाला रंगत तर आणलीच पण वेळोवेळी प्रेक्षकांच्या टाळ्या ही घेतल्या.

खरं तर हा कार्यक्रम कवितांच्या प्रवासाचा. हा प्रवास निवेदनातून पुढे जायला हवा होता. एक कवी ते दुसरा कवी हा दुवा निवेदनात बऱ्याच वेळा सांधता आला नाही.  अभ्यासपूर्ण निवेदनानं कार्यक्रम अजूनच वेगळी ऊंची गाठेल यात शंका नाही.

खूप दिवसांनी लाईव्ह कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. ती इतक्या अप्रतिम कार्यक्रमाने करून सर्वांची मने ताजीतवानी केल्याबद्दल मित्रमंडळ बंगळुरुचे आणि सर्व कलावंतांचे मनःपूर्वक आभार!


गंधाली सेवक



2 comments:

  1. कार्यक्रम नाही पाहता आला पण तुझा लेख वाचून त्यातील सुंदर कविता, गाणी आणी त्याचा गोडवा पोचला.

    ReplyDelete
  2. कार्यक्रमाला उपस्थित नव्हते तरी नुसतं वाचुन देखिल कार्यक्रमाची उंची लक्षात आली , कार्यक्रमाची clip असेलच , ऐकायला आवडेल.

    ReplyDelete