मोरेश्वरम् सिध्दीदम



एप्रिलमधे घरात सत्यनारायण करायचे ठरले आणि एका मैत्रिणीने पौरोहित्य करणाऱ्या एका काकूंचा दिलेला संदर्भ आठवला. त्यांना फोन करून तारीख, वेळ निश्चित झाली. काकूंनी फोनवरच मोजकी यादी सांगितली. ठरलेल्या दिवशी वेळेच्या आधी दहा मिनिटे काकू दारात हजर.

जेमतेम पाच फूट उंची, सतेज गोरा वर्ण, अंबाडा, त्यावर नाजूक गजरा, काठापदराची अबोली रंगाची चोपून नेसलेली साडी. सुहास्यवदनाच्या गोखले काकू पाहताक्षणीच मला आवडल्या. हातपाय धुवून झाल्यावर मला म्हणाल्या, दहा मिनिटात पूजेची तयारी करते. बरोबर दहा मिनिटांत  काकूंनी नेटकी पूजा मांडली. पूजेच्या पूर्ण वेळात भावले ते त्यांचे शांत स्वरातले अस्खलित संस्कृत उच्चार आणि प्रत्येक कृतीमागची त्यांची कारणमीमांसा.

पूजा वेळेत सुंदर पार पडली. जेवायची पंगत बसली, तेव्हा गप्पांच्या ओघात काकूंना विचारलं, की काकू तुमचे उच्चार इतके सुंदर कसे? तशा म्हणाल्याअग, संस्कृत मध्ये मी एम.. केलं. आवड म्हणून पंधरा वर्ष पौरोहित्य शिकले. तुझी पूजा आज होती म्हणून येऊ शकले. कारण दोन दिवसांनी आम्ही सांगलीला जाणार आहोत.”
तुम्ही सांगलीच्या का?” माझा प्रश्न.

अग, सासर सांगलीचे. आम्ही नोकरी निमित्त पुण्यात. पण आमचा पिढीजात गणपतीच्या मूर्ती बनवायचा व्यवसाय आहे तिथे. त्यामुळे गणपतीच्या आधी २ महिने आमचा मुक्काम तिकडेच असतो. हे निवृत्त झाल्यापासून चार महिने तिकडेच असतो आम्ही".

बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगलीच्या "चोर गणपती"चा उल्लेख केला. नाव ऐकून मुले हसायला लागली. गणपती आणि चोर? तशा म्हणाल्याअरे फार पूर्वीपासून या गणपतीची स्थापना देवळाच्या गाभाऱ्यात प्रतिपदेला केली जाते. हा गणपती कागदाच्या लगद्यापासून बनवलेला असतो. उत्सवाचे वातावरण तयार करण्यासाठी असे करतात. त्याची स्थापना झाली की आमच्या सांगलीत गणपतीची तयारी जोरात सुरु होते.” त्यानंतर त्यांच्या घरात गणपती कसे बनवले जातात हे सांगण्यात काकू रंगून गेल्या. जेवणे आटोपली आणि परत भेटण्याचे आश्वासन देऊन काकू घरी गेल्या. माझे मन मात्र सांगलीचा गणपती, मूर्ती आणि माझ्या आजोळच्या मोरगावच्या गणपतीमध्ये गुंगून गेले.

माझ्या आजोळच्या घरात, मोरगावला पंचधातूचा सिद्धिविनायक आहे. 'सिद्धिविनायक' म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती. हा गणपती दक्षिणमुखी आणि सूर्यनाडीचा असतो. अत्यंत तेजस्वी, शक्तिशाली आणि जागृत समजला जातो. पापपुण्याचे उत्तरदायित्व घेणाऱ्या प्रबळ व्यक्तीने त्याची काटेकोरपणे पूजा करणे अपेक्षित असते. त्यामुळे घरात सोवळ्याचे कडक पालन असते. असा गणपती असणाऱ्या घरांना कधीही कुलूप लावत नाहीत. गणपती उत्सव आमच्या घरी श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल पंचमी म्हणजेच एक महिना आणि एक दिवसाचा असतो.

पूर्वी आजोबा शेतातून काळीशार माती आणायचे, ती वस्त्रगाळ करायचे, त्यात शेतातलाच कापूस पिंजून घालायचे. तेल आणि अगदी थोडे पाणी घालून या मिश्रणाचा अगदी पेढ्यासारखा मऊ गोळा बनवायचे आणि साच्यातून काढून त्याची सुबक मूर्ती बनवायचे आणि त्याची स्थापना करायचे. या गणपतीला "पार्थिव गणपती" म्हणतात. 'पार्थिव' म्हणजे पृथेपासून बनलेला! जीवसृष्टी मातीतून जन्म घेते आणि मातीतच विलीन होते याचे हे प्रतीकात्मक उदाहरण! गणपतीला रोज फक्त पंचखाद्याचाच नैवेद्य. घरातल्या सगळ्यांच्या पोटात यानिमित्याने पौष्टिक जिन्नस जाण्याचा साधा सोपा मार्ग. पूर्वी रोज संध्याकाळी ४:४० च्या सुमारास दुरडीत हरळी, मांदार, शमी आणि इतर फुले घेऊन माळीणबाई यायच्या. आलेली हरळी निवडून त्यातून तीन पाती असलेल्या दूर्वा निवडण्याचे काम घरातल्या लहान मुलांचे.

एकदा हे काम चालू असताना आम्हा मुलांच्या आणि आजी आजोबांच्या गप्पा रंगल्या होत्या. "आजोबा, देवाला अशीच हरळी का हो नाही वहायची?" सम्याचा कंटाळवाण्या सुरातला प्रश्न. आजोबा हसले आणि म्हणाले, “अरे ती बघ, आजी मेथीची भाजी निवडून पाने बाजूला करते आहे, आपण अशीच खाऊ शकतो का भाजी मुळापासून? तसेच बाप्पाला पण निवडून चांगल्याच गोष्टी वहायच्या. आता तीनच पाती का? याचे उत्तर देतो ऐक, तीन पाती म्हणजे त्रिगुण, सत्व, रजो आणि तम्. सत्व म्हणजे मनावरचा संयम, रजो म्हणजे एखाद्या गोष्टीची हाव आणि तमो म्हणजे आळस, अविचार! या तीनही गोष्टी देवाला अर्पण करायच्या. समजले?

हे बघ समीर, हरळी म्हणजे काय रे गवत, जे पायाखाली तुडवलं जातं. त्याला ना गंध, ना चव. पण ते तुम्ही श्रद्धेने देवाला वाहिले, की देव ते आनंदाने स्वीकारतो. गणपती बाप्पाच्या स्तोत्रात आहे, जो मला दूर्वा वाहतो त्याचे मी मनोरथ पूर्ण करतो. यावरून काय लक्षात घ्यायचे? काम कितीही क्षुल्लक असले तरी ते मनापासून केले की त्याची किंमत वाढते!

आबा, गणपतीचे वाहन उंदीर का?” इराचा प्रश्न. पुराणातल्या गोष्टींपेक्षा त्याची आधुनिक सांगड घालण्याची आजोबांची हातोटी! त्याप्रमाणेच त्यांनी इराच्या प्रश्नाचे उत्तर दिले. "बघ इरा, उंदीरमामा थोडा लबाड आणि मायाळू असतो. म्हणजे तो चावतो पण त्या आधी त्याजागी हळुवार फुंकर घालतो. अशा मायेला अंकुशामध्ये ठेवून त्यावर स्वार होण्याचे काम आपल्या बाप्पाशिवाय कोण करू शकतो?"

"आबा, आपल्या मयूरेश्वराची आणि देवळाची माहिती सांगा ना मुलांना", आई म्हणाली. “हो, हो, आबा सांगा नाआमचा एकच गलका.

बरं का मुलांनो, आपल्या गावाचे नाव पूर्वी 'भूस्वानंदभुवन' होते. आपल्या गावात खूप मोर असायचे. इथे गणपतीने मोरावर स्वार होऊन सिंदुरासूर राक्षसाचा वध केला. तेव्हापासून गणपतीचे नाव ' मयुरेश्वर' आणि गावाचे नाव मोरगाव झाले. आपल्या मयूरेश्वराच्या बेंबीत हिरा आणि डोळ्यामध्ये माणकं बसवली आहेत. ही जी मूर्ती आपण बघतो ना त्याच्या मागे एक खरी मूर्ती आहे . ती रत्न, लोखंड आणि मातीपासून बनवली आहे. तिचे रक्षण व्हावे म्हणून पांडवांनी ही पुढची मूर्ती बनवली अशी एक आख्यायिका आहे.

देवळाला चार दरवाजे आहेत तसेच गावाच्या वेशीला पण त्याच दिशेला देवाची देवळे आहेत. उत्तरेला सूर्य, पूर्वेला विष्णू, दक्षिणेला शिव आणि पश्चिमेला शक्ती अशा देवता, देवळाचे आणि गावाचे रक्षण करत असतात. आपल्याला प्रदक्षिणा घालताना डाव्या बाजूला नग्नभैरवाचे छोटे देऊळ दिसते ना, तो म्हणजे मोरगावचा क्षेत्रपाल, गावाचा रक्षणकर्ता. गावाच्या वेशीवर त्याचे देऊळ आहे. पूर्वी गावात शिरताना आधी त्याला नमस्कार करून मग गावात प्रवेश केला जायचा. आपण जी गणपतीची आरती म्हणतो ना' त्याची रचना रामदास स्वामींनी आपल्याच देवळात बसून केली होती बरं  का!!!!

हे सर्व आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. दिवेलागणी केव्हा झाली हे कळलेच नाही. संध्याकाळच्या आरतीसाठी आजीने तयारी केली. त्यादिवशी 'सुखकर्ता दुःखहर्ता' म्हणताना देवळात बसलेले रामदासस्वामी आठवत होते. मंत्रपुष्पांजली झाल्यावर सगळ्यांनी हातात दूर्वा, फुले आणि अक्षत घेतली. आज ते देवाला वाहताना आजोबांचे शब्द आठवत होते. 'अक्षत' म्हणजे अखंड, न तुटलेला. ती देवाला अर्पण करणे म्हणजे आपली अखंड भक्ती अर्पण करणे. आजचा नमस्कार हा सर्वार्थाने अर्थपूर्ण होता.

आरती जोशी


5 comments:

  1. Apratim, abhyas, aani anubhav samrudhha lekhan.

    ReplyDelete
  2. अत्यंत सुंदर.. उत्तम लेखन शैली आणि मांडणी आणि विषयाचा अभ्यासही

    ReplyDelete
  3. सर्वांगसुंदर लेख. ओघवती भाषा

    ReplyDelete
  4. तुझ्या लेखनातून चित्र अगदी डोळ्यासमोर उभे राहते! Chicago

    ReplyDelete
  5. नीना वैशंपायनSeptember 4, 2020 at 12:07 PM

    आरती, खूप छान लेख, हृदयस्पर्शी आठवणी

    ReplyDelete