जयललिता...

“My only crime was I was the only Emancipated and Independent woman in this world full of Men.” Mata hari (first woman spy)

तिच्याबद्दल लिहिताना पहिला हाच विचार मनात आला. खरोखरच, तथाकथित पुरुषांनी भरलेल्या जगात होतीच ती एकटी... म्हणून तर पुरुषांहून पुरुष झाली... फक्त कमरेला ढाल, हातात तलवार आणि तटावरून रणधुमाळीत बेफिकीर फेकलेला घोडा नव्हता, बाकी आवेश तोच...

होत्या त्या जखमा लपवून वेदना सोसत,  किंबहुना तिलाच आपली ढाल आणि सर्वोत्तम शस्त्र बनवून प्राणपणाने सत्तेचा खेळ ती खेळली.

हे अगदी मनोमन ठाउक होतं तिला, की हा खेळ खरंतर खेळायची गरज नाही तिला. नव्हतंच यायचं इथे त्या फुलराणीला. सर्व सत्तावस्त्रं अंगावरून उतरवून अरण्यात जाणं तिच्यासाठी अधिक प्रिय आणि सोपं होतं. पण लढली ती, कर्णासारखी,  हरणाऱ्या  खेळात निव्वळ नियतीनी दिलेला रोल आहे म्हणून लढली. तिला कदाचित माहीत होतं की हे जिवावरचंच आहे. पण निर्मम खेळ खेळलाच पाहिजे.

डॉक्टर जयललिता-सेल्वी जयललिता-पुराचि थल्लवी जयललिता… एका अत्यंत गूढ आणि मंतरवणाऱ्या phenomenon चा अंत... एका वेदनेचा अंत… एका वादळाचा अंत… एका लढाईची अखेर… आता तरी तिला आता फुलराणीचे खेळ खेळायला वेळ मिळेल…

एखाद्या महाराणीप्रमाणे जनमानसावर अधिराज्य करणारी अम्मा, एका जमान्यातली आघाडीची अभिनेत्री, स्वतःची गूढ प्रतिमा निर्माण करून विरोधक आणि पार्टी वर्कर्सना असुरक्षित करणारी मनमानी नेता, एका मोठ्या नेत्याची छाया, पाच वेळा निवडून येऊन विक्रम करणारी मुख्यमंत्री…
एकाच जयललितांची ही असंख्य रूपं...

भारतीय राजकारणातलं एक अत्यंत गूढ व्यक्तिमत्त्व!
असंख्यांनी थांग लावण्याचा प्रयत्न करूनही न समजणारं.

सिमी गरेवाल बरोबरच्या मुलाखतीमधे म्हटल्याप्रमाणे सतत आईला शोधणारी जया शेवटी स्वतःच सर्वांची आई झाली. त्याच मुलाखतीमधे तिने सांगितलं तसं अनकंडीशनल प्रेम असं काही नसतं, असं म्हणूनही स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता अथक काम करणारी जयललिता…

तिच्या राजकीय भूमिका, अस्थिर आणि मूडी वागणं, प्रशासनातली निर्मम कठोरता, स्वतः ब्राह्मण असूनही एक द्रविडीयन पक्ष चालवण्याची क्षमता, पुरेशी स्पष्ट आणि तरिही राजकीयदृष्ट्या योग्य वक्तव्यं करण्याची हिंमत, पुरुषप्रधान व्यवस्थेत राहूनही व्यवस्थेच्या वर स्वतःला नुसतं उभं नव्हे तर व्यवस्थेला गुलाम करण्याची ताकद या सगळ्याचं विश्लेषण तथाकथित पंडित करतीलच... तिच्यामागे द्रविडीयन राजकारण आणि त्यातील अस्थिरतेचे भारतीय आणि उपखंडातल्या राजकारणावर पडसाद हे सगळं चर्चिलं जाईल...

मला मात्र गूढ पोकळीत एकाकी गात रहाणाऱ्या, स्वतःला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी तडजोड करत अन्य कुणाच्या तरी इच्छांसाठी स्वतःची कुर्बानी देणाऱ्या, न संपणाऱ्या दुःखाची विराणीच वाटते ती!

तिनी जमवलेल्या संपऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांच्या हे लक्षातच आलेलं नाही की ह्या ‘अम्मा’चं रक्ताचं वारसदार कोणीच नाही. सगळ्यांची अम्मा होताना तिला तिचा रक्ताचा वारस जन्माला घालायला वेळच मिळाला नाहीये. आणि राजकीय वारसदेखील नाही...

स्वतःशी लढता लढता तिनं शेवटी संपून जाणं पसंत केलं.



‘दिशा काळोखाच्या कवेत मिटतानाही...
किनारा तिला थांब म्हणाला नाही...
ती बेभान, चिरवंचित मानिनी
तशा अंधारातही
विनासोबत पुढेच गेली...
मी फक्त तिचे भरून आलेले शीड पाहिले’
 - द.भा. धामणस्कर

-- मनीषा बाजी

1 comment: