"कुल कुल कुलवेंदू
होडदाडदिरी, निम्म कुलद नेलेय एनादरू बल्लिरा"
(सतत आपल्या कुळाची महती
काय सांगतोस/वाद घालतोस,कुळांचं काय झालं, मूळ कुठल्या कुळाचा हे
नक्की माहिती आहे का?)
थोडक्यात जात-धर्म यांचं थोतांड माजवू
नका, सर्वधर्म समभाव राखा असे सांगणारे "संत कनकदास" यांना कन्नड संत परंपरेमध्ये खुप मोठं
मानाचं स्थान आहे. दासपरंपरेमधल्या २५० दासांपैकी फक्त कनकदास
धनगर (शूद्र) होते. हावेरी
जिल्ह्यातील शिग्गावातील
"बाड" गावी त्यांचा जन्म झाला.
आई बचम्मा आणि वडील वीरप्पानायक यांच्या पोटी जन्मलेल्या या मुलाचं नाव
" तिम्मप्पा " ठेवलं. जातीने धनगर असूनही कनकदासांचे वडील सेनापती होते. त्याकाळी विजयनगर साम्राज्यात " बाड"
गाव महत्वाचं होतं कारण विजयनगर ते गोवा जोडणारं ते महत्वाचं स्थान होतं.
तिथल्या राखीव सुरक्षा दलाचे वीरप्पानायक (वडील)
प्रमुख होते. वडिलांची तिरुपती बालाजीवर श्रद्धा होती. वैष्णव पंथ स्थापन करणारे
श्रीरामानुजाचार या गुरूंच्या कृपेने कनकदासांचे आई-वडील वैष्णव
पंथाला शरण गेले आणि वंशोद्धार करणा-या पुत्रासाठी त्यांनी तिरूपतीला
नवस केला, आणि म्हणूनच मुलाचं नाव " तिम्मप्पा " ठेवलं. कनकदासांच्या जन्मदिनाची नक्की माहिती
नाही पण १४ व्या शतकाच्या शेवटी त्यांचा जन्म झाल्याचं मानतात.
बंकापूरच्या "श्रीनिवासाचार्य"
यांच्याकडे त्यांनी विद्याभ्यास, व्याकरण,
तर्कशास्त्र मिमांसा, साहित्य या सर्व गोष्टींचा
अभ्यास केलाच परंतु त्याच्या बरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी असे
युद्धाचे डावपेच पण शिकले. वडीलांच्या निधनानंतर ते सेनापती झाले व
सुरक्षा व्यवस्था सांभाळू लागले. त्यांच्या एका काव्यरचनेनुसार असं म्हणलं
जातं की युद्धात ते गंभीर जखमी झाले होते. पण मरणाच्या दारातून ते आश्चर्यकारकरित्या परत आले. या घटनेने त्यांच्या
आयुष्याचा मार्गच बदलला.त्यांनी नंतर फक्त संगीत, काव्यरचना, साहित्य आणि तत्वज्ञान यासाठी स्वतःला
वाहून घेतले .
उडपी गावाशी विशेष लळा होता कारण तिथल्या
व्यासतीर्थ स्वामींचा त्यांच्यावर लोभ होता. श्रीव्यासरायर
यांच्याकडून ते मध्व -
तध्व शास्त्र शिकले. श्रीव्यासरायर यांनीच या आवडत्या तिम्मप्पाला "कनकदास"
ही उपाधी दिली/नाव दिलं. कनकदासांनी त्यांच्या सर्व रचनांना "कागीनेलेय आदिकेशव"
ही मुद्रा लावली आहे. कनकदासांच्या साहित्य कृती बऱ्याच आहेत पण संगीतप्रपंचाला दिलेली ३१६ प्रचलीत
कीर्तने हा अमोल ठेवा आहे.
कनकदास आणि पुरंदरदास यांना कर्नाटक संगीत पद्धतीचे उद्गाते आहेत.
कनकदासांच्या ५ मुख्य काव्यकृती आहेत.
१. मोहनतरंगिणी
२. नळचरित्रे
३. रामधान्य चरित
४. हरी भक्ती सार
५. नरसिंह स्तवन
१.मोहन तरंगिणी - यामधे ४२ संधी आहेत..२७९८ पदं आहेत.
यामध्ये कृष्णदेवराय यांना कृष्ण मानून व विजयनगरला द्वारकापुरी मानून
कृष्ण चरित्र काव्यबद्ध केले आहे.विजयनगर साम्राज्यातील स्वतःचे अनुभव, त्यात देखिल युद्धाचे अनुभव जास्त कथन केले आहेत कारण १५७५ चे हंपीचे पतन त्यांनी बघितले. शंबरासुरवधे, बाणसुरवधे, हरीहर युद्ध यासारखी युद्ध काव्ये रचली.
२.नळचरित्रे - या साहित्य कृतीमधे ९ संधी आहेत.४८१ पदं आहेत. नळ-दमयंतीच्या प्रेमकथेसाठी हे साहित्य प्रसिद्ध आहे.
३. रामधान्य चरित - यामध्ये १५६ पदं आहेत. कर्नाटकातील रोजच्या
आहारातल्या तांदूळ आणि रागी (रामधान्य) या धान्यांचे संभाषण रूपातील साहित्य आहे. कर्नाटकात
समाजातल्या उच्च-नीच जातीभेद किंवा गरीब-श्रीमंत यावरच्या बंडखोर साहित्याचं मूळ या "रामधान्य
चरित" ला मानतात. तांदूळ हा श्रीमंत लोकांचा आहार पण कमी
पौष्टिक आणि रागी हा गरीब लोकांचा आहार पण जास्त पौष्टिक. तांदूळ आणि रागी आपापला मोठेपणा / श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी
"रामा" कडे गेले. कुठलाच निर्णय न घेता त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर रामाने त्या दोघांना ६
महिने तुरुंगात पाठवले. तांदूळ खराब झाला पण रागी मात्र तशीच
राहिली आणि तिने स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध केले . या साहित्यातूनच त्यांचे समाजातल्या उच्च-नीचतेच्या विरोधी असणारे विचार समजतात. वीररसपूर्ण काव्य वाचायला
मिळते.
४. हरीभक्तीसार या साहित्य
कृती मधे ११० भक्ती पदे आहेत.सरळगन्नड (नवीन कन्नड) मधील ह्या काव्य रचनेला "कन्नड भगवत् गीते म्हणतात.
मोहन तरंगिणी सारख्या साहित्य कृती अच्चगन्नडा (शुद्ध कन्नड)
मधे आहेत. जातपात, धर्म भेद, उच्च-नीच, गरीब- श्रीमंत असे भेद हानीकारक आहेत. समाजाला कलंक आहेत हे
त्यांचे विचार फक्त साहित्यातच नाहीत तर जीवनशैलीतही होते. सर्वांचा जन्म सारख्या रीतीनेच होतो, सगळे तेच पाणी पितात,
एकाच सूर्याच्या छायेखाली असतात, सर्वधर्म समभाव
आहे, सगळी मानवजात एक आहे हे त्यांनी संगीताद्वारे, काव्याद्वारे आणि स्वतःच्या आचरणाद्वारे सांगितलं.
"कनकन् किंडी" - बहुतेक मंदिराच्या बांधणीत असं दिसतं
की मुख्य दरवाजा आणि मूर्ती हे पूर्व दिशेला
तोंड करून असते. पण उडपी श्रीकृष्ण मंदिरात दरवाजा पूर्वेला तोंड करून असला तरी मूर्ती मात्र
पश्चिमेला तोंड करून आहे. याची एक कथा आहे.
कनकदास ब्राह्मण नाहीत म्हणून मंदिराच्या
पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. व्यासतीर्थांनी प्रवेश
देण्याविषयी सांगून सुद्धा बाकी ब्राह्मणांनी प्रवेश नाकारला. परमेश्वर सर्वांना सारखाच आहे, सर्व त्याचे भक्त आहेत,त्याला सगळी माणसं सारखीच असं कनकदासांनी विनवून सांगितलं तरी ऐकलं नाही.
तुझा देव असेल तर तो कुठेही तुला दर्शन देईल वगैरे म्हणत ब्राह्मणांनी
त्याला जायला सांगितले. तेव्हा कनकदासांनी मंदिराच्या मागील बाजूस
जाऊन देवाची आराधना, कीर्तन, नामस्मरण,
जयघोष सुरू केला आणि त्यांच्या हाकेला देव पावला. भिंतीला तडा जाऊन छोटी खिडकी तयार झाली आणि देवाच्या मूर्तीने पश्चिमेला तोंड
करत भक्त कनकदासाला दर्शन दिलं. या खिडकीलाच " कनकन् किंडी/खिंडी" म्हणतात. मंदिराच्या
गोपुरासमोरच कनकदासांची झोपडीवजा खोली होती. तिथे एक छोटे मंदिर/पूजास्थळ बांधले . त्याला "कनकन् मंदिरा"
म्हणतात.
शेवटचे दिवस ते तिरूपतीला वास्तव्य करून
होते. कनकदास भारतातले एक श्रेष्ठ
संगीतकार, कवी,
साहित्यिक, समाजसुधारक, तत्वज्ञानी
आणि महान संत होते. कनकदास जयंती २००८ पासून कर्नाटक सरकार
साजरी करत आहे. त्यांची ५२६ वी जयंती या वर्षी १५ नोव्हेंबर २०२०
ला साजरी होईल. अधिक जाणून घेण्यासाठी नटसार्वभौम डॉ. राजकुमार या कन्नड चित्रपट
सृष्टीच्या सुपरस्टारचा भक्त कनकदास हा चित्रपट जरूर बघावा. अशा
या महान संत कनकदासांना त्रिवार प्रणाम.
भजन लिंक क्लीक करा : नी मायेयोळगो, निंनोळू मायेयो
भजनाचा अर्थ : भजन अर्थ लिंक क्लीक करा
भजन लिंक क्लीक करा : नी मायेयोळगो, निंनोळू मायेयो
भजनाचा अर्थ : भजन अर्थ लिंक क्लीक करा
ज्योती
कुलकर्णी
माहीतीपूर्ण लेख.
ReplyDelete