"अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे,
हरिभजनावीण
काळ घालवू नको रे"
गोमंतकीयांचे भूषण असलेल्या संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांच्या या पंक्ती आहेत.
१७१४
मध्ये त्यांचा जन्म पालये गावी झाला. " अच्युत" हे पाळण्यातलं नाव असलं तरी घरातली
ज्येष्ठ मंडळी लाडाने " सोयरू" म्हणत. मूळ आडनाव ' संझगिरी', पण सावंतवाडी संस्थानातील
पालये गावात स्थिरावले,
तेव्हा आजुबाजुला आमराई होती म्हणून ' आंबिये'
आडनाव पडलं. मुंज, लग्न परंपरेनुसार योग्य वेळी झालं. वडील लवकर
गेल्यानंतर त्यांच्या मागून कुळकर्णीपद वयाच्या १५व्या वर्षी स्वीकारून २० वर्ष
इमाने - इतबारे सेवा केली.
पण
मन मात्र देवपूजा, धर्मग्रंथांचे वाचन, पदरचना यातच रमायचे. नाथांचा भक्तीभाव किती खरा
किंवा उच्च होता याचं एक उदाहरण आहे.
सावंतवाडी
संस्थान गादीच्या सोम अथवा आबा सावंत यांचे बरेच धाकाचे प्रस्थ होते. मद्य पिणे,
लोकांचा छळ करणे, मनाला येईल तसं वागणारया आबांच्या कानी सोहिरोबांची कीर्ती आली. त्यांनी
नाथांना
"देव" दाखवायला सांगितल्यावर क्षणभर
डोळे मिटून नाथांनी प्रार्थना केली. त्यांच्या आत्मतेजाच्या साक्षात्काराने
वाड्याच्या भिंतीतून अग्निज्वाला प्रकट झाली. ते पाहिल्यावर आबा सावंतांनी
आत्महत्या केली.
सावंतवाडी
राजेसाहेबांच्या आमंत्रणावरून सोहिरोबा त्यांना भेटण्यास निघाले. पायी निघालेल्या
नाथांनी वनामध्ये वडाच्या झाडाखाली मोठा दगड पाहिला आणि विश्रांती घेत बरोबरचा फणस
फोडून, परमेश्वराला हात जोडून आता खाणार, इतक्यात वनातून आवाज आला
"हमको कुछ देता है बाबू?" साक्षात
गहिनीनाथ अवतरले.
"तू सोs हम् मंत्राचा जप कर. अमर होशील."
हा गहिनीनाथांचा साक्षात्कार नाथांच्या जीवनातील परिवर्तन बिंदु ठरला. संस्थानात
जाऊन कुलकर्णीपदाचा राजीनामा देऊन नाथांनी गृहत्याग करण्याचं ठरवलं. आंबोली
घाटातून करवीर क्षेत्री जाऊन, अंबामातेची सेवा करून पुढे पंढरपूर, अक्कलकोट केलं.
तिथे मठाची स्थापना करून पुढे सूरतला गेले व तेथेही मठस्थापना केली. गहिनीनाथ
(गैबीनाथ) यांनी दिलेल्या "सोs हम्"चा अखंड जप करीत बराच काळ गिरनार पर्वत,
अबूचा पहाड येथे घालवल्यावर सर्व सिद्धी प्राप्त झाली.
उजैनच्या
परिसरात एका निर्जन शिवालयात एकांतात नाथांनी ध्यानधारणा सुरू केली. लवकरच ते
समाधी अवस्थेत गेले. विठ्ठलपंत व चंपा हे जोडपे तेथे येऊन कामातुर चाळे करू लागले.
एका बाजूला समाधी अवस्थेत बसलेल्या नाथांकडे लक्ष जाताच त्यांनी नाथांना जवळच्या
विहिरीत फेकून दिले व कामसुखात दंग होऊन गेले. सकाळी शिवदर्शनाला येणारे भाविक
आश्चर्यचकीत झाले. विहीरीतून भजनाचे सूर ऐकू येऊ लागल्याने विहीरीत डोकावताच
पाण्यावरच आसनमांडी घालून आनंदाने भजन गात असल्याचे दिसले.
जलतरणाच्या
या प्रसंगामुळे सोहिरोबांचे सर्वत्र नाव झाले.
उजैनच्या जिवबादादा बक्षी केरकर
यांनी क्षिप्रा नदीच्या तीरावर मठ बांधून दिला. "श्रीनाथ" अशी राजमुद्राही केली.
उज्जैन
मठात रामनवमी उत्सवानंतर नाथ नित्यनेमानुसार ध्यान धारणा करण्यास बसले असताना
एकाएकी खोलीत लख्ख प्रकाश दिसला आणि तीन आकृत्या दिसू लागल्या. मच्छिंद्रनाथ,
गोरखनाथ, जालंदरनाथ यांनी साक्षात् दर्शन देत आदेश दिला, ' तुझे येथील कार्य
संपले आहे. आमच्या समवेत चल.' नाथ त्यांच्या बरोबर सदेह
जाताच अंतिम निर्गुणात स्वरूपे हरवली. दुसरे दिवशी मठात नाथ न दिसल्याने सर्वत्र
शोध घेतला असता अंथरूणाखाली एक पद सापडले," दिसणे हे
सरले..." अशा प्रकारे सोहिरोबानाथ इ.स. १७९२ च्या
रामनवमी दिवशी सदेह अंतर्धान पावले.
मराठी,
हिंदी, संस्कृत आणि कोकणी भाषांवर प्रभुत्व असणारे सोहिरोबानाथ, यांनी सिद्धांत
संहिता, महद् भुवनेश्वरी, अद्-वयानंद आणि पूर्णाक्षरी अक्षयबोध हे ग्रंथ लिहिले
आहेत. ते स्वतः लिहीत नसत, तर त्यांच्या मुखातून बाहेर येणारे शब्द
त्यांच्या भगिनी फणसाच्या पानावर लिहीत असत.
संसार
करता करता मुक्ती मिळवता येते आणि नंतर संसार चालवला तरी मुक्तावस्थेला बाधा येत
नाही ही शिकवण त्यांनी स्वतःच्या वागण्याने दिली. बा.भ.बोरकर त्यांना "कोकणचा ज्ञानेश्वर" म्हणत.
सोहिरोबानाथांना आत्मसाक्षात्कार झालेल्या
इंसुली-बांदा, सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांचे मंदिर
उभारण्यात आले आहे.
भजन लिंक "ओम श्रीराम जयराम जय जय राम"
सोहिरोबानाथांना आत्मसाक्षात्कार झालेल्या
इंसुली-बांदा, सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांचे मंदिर
उभारण्यात आले आहे.
भजन लिंक "ओम श्रीराम जयराम जय जय राम"
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteछान लेख
ReplyDelete