जाता पंढरीस सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि॥
पं. भीमसेन जोशींनी गायलेला हा अभंग "संत सेना
महाराज" यांचा आहे.
संत सेना यांचा जन्म नाभिक
समाजात,भारताच्या उत्तर दिशेला बांधवगड (जबलपूर पासून १८० किमी) येथे झाला
होता. घरी परमेश्वर भक्तीचंच वातावरण होतं कारण त्यांचे वडील रामानंदस्वामी यांचे
शिष्य होते. परंपरेने चालत आलेला नाभिक व्यवसाय सेना महाराजांनी आनंदाने
स्वीकारला. त्या बरोबरच ते पांडुरंगाचे भजन - कीर्तन करीत. साधुसंत नेहमी सेना
यांच्या घरी येत असत. वडीलांप्रमाणे त्यांनीही रामानंदस्वामींचे शिष्यत्व पत्करले.
गुरूंनी सामजिक समता भक्ती मार्गात आणण्याचे सांगीतलेले कार्य त्यांनी तंतोतंत
पाळले.
"आम्ही वारीक
वारीक। करू
हजामत बारीक॥
विवेक दर्पण आयना दाऊ। वैराग्य चिमटा हालऊ॥
उदक शांती डोई घोळू। अहंकाराची शेंडी पिळू॥
भावार्थाच्या बगला झाडू। चौवर्णा देऊनी हात।
'सेना' राहिला निवांत॥
अशी काव्य रचना, अभंग रचत त्यांनी काम केले. प्राप्त कर्माचा त्याग न करता, त्या
कर्मालाच ईश्वर भक्तीचा उपाय समजावा ही कर्मभक्तीची शिकवण त्यांनी अंगी
बाणवली होती. त्यांच्या "विठ्ठल" परमभक्तीची एक कथा आहे.
त्यांच्या घराला "बादशहा"
ची हजामत करण्याचा मान होता. एकदा "सेना महाराज" घरी पांडुरंगाची पूजा करत बसले होते. बादशहाकडून ३-४ वेळा बोलावणे आले.
प्रत्येक वेळी बायकोने "ते घरात नाहीत" असे सांगितले. पण शेजाऱ्याने बादशहाकडे चुगली केली व "सेना घरी
देवपूजा करत असून बायकोने खोटं सांगितलं आहे" असं
सांगितलं. बादशहाला राग आला व सेनाच्या मुसक्या बांधून नदीत टाकण्याची आज्ञा
सेवकांना केली. तेव्हा पांडुरंग "सेना न्हावी"
यांचे रूप घेऊन बादशहाकडे गेले. बादशहानी त्यांना बघितल्यावर राग
आवरला व त्यांच्या कडून हजामत करून घेण्यासाठी बसले. हजामत करून घेताना बादशहा मान
खाली करी तेव्हा रत्नजडीत वाटीतील तेलात त्याला "पांडुरंगाचे"
प्रतिबिंब दिसे, वर पाहिले की सेना न्हावी दिसे. वाटीतील
पांडुरंगाच्या रूपाने मोहित झालेल्या बादशहाने ओंजळभर होन बक्षीस म्हणून दिले.
पांडुरंगाने ते धोकटीत ठेवले व धोकटी सेना न्हावी यांच्या घरी नेऊन ठेवली आणि
अंतर्धान पावले.
ते ईश्वरी स्वरूप पाहण्याची ओढ
लागलेल्या बादशहाने परत दोन प्रहरी सेनास बोलावले. सकाळचीच वाटी आणविली व पुन्हा
ते चतुर्भूज रूप दाखवण्यास सांगितलं. सेना महाराज स्तिमित झाले. आपल्या रूपाने
पांडुरंग आला असावा याचा त्यांना अंदाज आला.धोकटीतले धन बघून तर खात्रीच पटली की देव आले होते. त्यांनी पांडुरंगाचा
धावा केला तसं देवाचं रूप त्या वाटीत दिसलं. या चमत्कारामुळे बादशहा परमेश्वर
गुणगान करू लागला .
मध्य भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचे
दर्शन घेतल्यानंतर काही काळ ते पंढरपूरला राहिले. संत संगतीत बराच वेळ राहून परत
पंढरपूरला परतले व तेथून
"बांधवगड" ला परतले. श्रावण वद्य
द्वादशीला त्यांचा पुण्यतिथी उत्सव नाभिक समाज साजरा करतात.
कर्नाटक राज्याच्या हुब्बळी गावी
जे.सी. नगर मध्ये
"संत सेना हरी मंदिर" आहे. १९५८ ला
ह.भ.प.आबाजी चतपल्ली यांनी हे मंदिर स्थापन केलं. बांधवगडला त्यासाठी आबाजींनी भेट
दिली असता त्यांना सेना महाराजांचा साक्षात्कार झाला. उमेरिया स्टेशनपर्यंत
रेल्वेने प्रवास करून, तिथून घनदाट जंगलातून ४० किमी पायी प्रवास करावा लागला.
अवघ्या एका सहकाऱ्याच्या सोबतीने जात असता ते रस्ता चुकले. एक वयस्कर साधू
त्यावेळी त्यांना भेटला. त्याच्या मदतीने ते सेना महाराजांच्या समाधीस्थानापर्यंत
पोचले. पण तिथे येताच तो साधू कुठेही दिसेनासा झाला.
सेना महाराजांच्या या दर्शनाने आनंदी
झालेल्या आबाजींनी जयपूरहून सेना महाराजांची प्रतिमा आणून हुब्बळी ला स्थापना
केली. तिथे सुद्धा
श्रावण वद्य द्वादशीला सेना महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.
श्रीविठ्ठल आणि वारकरी संप्रदायाने फक्त जातीपातींच्या सीमा मोडल्या नाहीत तर
प्रांताप्रांताच्याही सीमा ओलांडल्या. संत सेना महाराज हे त्याचंच उदाहरण. काही काळ सेना महाराजांनी उत्तर
हिंदुस्तानात व्यतीत केला. त्यांच्या एका पदाचा शिखांच्या "गुरूग्रंथसाहेब"
मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
"घेता नाम
विठोबाचे, पर्वत
जळती पापांचे" असे म्हणणाऱ्या सेना
महाराजांना आमचा प्रणाम.
ज्योती भजन लिंक : "श्री ज्ञानराजे केला उपकार"
ज्योती भजन लिंक : "श्री ज्ञानराजे केला उपकार"
ज्योती कुलकर्णी
I was not aware of Sant Sena Maharaj. Pandurang ha aaplyaa jivhalyacha aahe. You gave interesting information about Sant Sena Maharaj.
ReplyDelete