नामसंकिर्तन:संत कान्होपात्रा



"मोकलुनी आस, जाहले उदास..
घेई कान्होपात्रेस, हृदयात"
अशी विठ्ठलाला आर्त हाक मारणारी संत कान्होपात्रा म्हणजे चिखलात उगवलेलं कमळच ..

१५ व्या शतकात, मंगळवेढा गावी 'शामा' नावाच्या एका गणिकेच्या म्हणजे नाच-गाणं करणाऱ्या वेश्येपोटी कान्होपात्राचा जन्म झाला. तिने नृत्य आणि संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. अभूतपूर्व सौंदर्य आणि गोड गळा लाभलेल्या कान्होपात्रेला भौतिक सुखाची किंवा संपत्तीची अजिबात अभिलाषा नव्हती. तारुण्यात प्रवेश होताना तिला आईच्या व्यवसायाचा खरा अर्थ समजू लागला. तिला हे सर्व अजिबात आवडत नव्हतं. उलट पूजा-अर्चा , विठ्ठलाचे नामस्मरण यातच ती रमू लागली.  संत दामाजीपंत, संत चोखामेळा ज्या मातीचे त्याच मंगळवेढ्याच्या कान्होपात्रेची विठ्ठल भक्ती परमोच्च होती. आईचा वेश्या व्यवसाय पुढं चालवला पाहिजे ही समाजाची सक्ती तिनं त्या काळी धुडकावली व स्वतंत्र वाट चोखाळली. अर्थात् यासाठी तिला पाठबळ मिळालं होतं ते वारकरी संप्रदाय विचारांचं. देह हे भोगाचे साधन नाही तर परमार्थ प्राप्तीचे साधन आहे अशी तिची धारणा होती.

गणिकेची पूजाअर्चा होताना कुणी कधी पाहिलंय ? पण, वारकरी देव्हारयावर, कान्होपात्रेच्या मंगळवेढा गावी व पंढरपूर पांडुरंग मंदिरात तिची पूजा होते.
कोणत्याही संत गुरूचा आशीर्वाद किंवा छत्रछाया न लाभलेल्या, गणिकेच्या या मुलीने आपल्या केवळ भावभक्तीने, अचल श्रद्धेने " संत पद " मिळविले  आणि कान्होपात्रा "संत कान्होपात्रा" झाली.

"नको देवराया अंत आता पाहू" , पतित तू पावना , अगा वैकुंठीच्या राया ही तिची काही पदं प्रसिद्ध आहेत.
बालगंधर्वांनी " संत कान्होपात्रा " हया संगीत नाटकाद्वारे तिचे जीवन जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.
"म्हणे कान्होपात्रा, ऐक बा विठ्ठला
देई ठाव मला तुझ्या पायरीला"

पंढरपूरला माहेर आणि विठ्ठल रुक्मिणीला आई-वडील मानणारी कान्होपात्रा, ओवी-अभंग रचना करू लागली. तिचे काहीच अभंग आज उपलब्ध आहेत. बिदरच्या बादशहापर्यंत तिच्या सौंदर्य आणि गोड आवाजाची महती पोचली, तशी त्याने कान्होपात्राला पकडून आणण्याची आज्ञा आपल्या सरदारांना केली. त्यांच्या पासून सुटका करून घेण्यासाठी वेष बदलून ती वारीमध्ये सहभागी झाली आणि पंढरपूरला पोचली. पाठलाग करत पोचलेल्या बादशहाच्या सरदारांनी मंदिराच्या व्यवस्थापकांना कान्होपात्रेस त्यांच्या हवाली करण्यास फर्मावलं, अन्यथा मंदिर उध्वस्त करण्याची धमकी दिली. आपल्या पायी आपल्या विठ्ठलाचं मंदिर उध्वस्त व्हावं हे कान्होपात्रेस नक्कीच मान्य नव्हतं. तिने यवनांसोबत जाण्याची तयारी दर्शविली. मात्र जाण्यापूर्वी एकदा विठ्ठल दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. होकार मिळताच ती विठ्ठल दर्शनाला गेली व देवाचा धावा करू लागली, आळवू लागली, त्याला त्याच्या पायी विलीन करून घेण्याबद्दल विनवू लागली.

तिची ती आर्त हाक ऐकून देव विरघळला आणि पांडुरंगाच्या चरणी कान्होपात्रा विलीन झाली. आजही मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ तिच्या समाधीच्या जागी तिची छोटी मूर्ती आहे. त्या ठिकाणी एक "तरटी" वृक्ष उगवला आहे जो आजही अक्षय हिरवा आहे. 

भजन लिंक : "येते पंढरीला तुझ्या मी विठ्ठला" 


ज्योती कुलकर्णी


2 comments:

  1. खूप सुंदर.. अंगावर काटा उभा राहिला

    ReplyDelete