नामसंकीर्तन-संत पुरंदरदास



"साधुसज्जनरोळू इरूवुदे हब्बा,
वेदांतदर्थवनु तिळिवुदे हब्बा"
(समाजात साधुसज्जन असणं हा एक उत्सव /सण असल्यासारखं आहे ,
वेद- वेदांताचा अर्थ समजणं / जाणीव होणं हा पण उत्सवच आहे)

असं म्हणणाऱ्या संत पुरंदरदासांना कर्नाटकात नारदाचा अवतार मानतात. 'पुरंदरदास' एक हरीदास, संत, श्रीकृष्णाचे असीम भक्त, कर्नाटक शैली संगीताचे उद्गाते किंवा पितामह होऊन गेले.

शिमोगा जिल्ह्यातील, तीर्थहळ्ळीजवळ असलेल्या क्षेमापुरा गावी त्यांचा जन्म झाला. वडील वरदप्पा नायक आणि आई लिलावती यांच्या पोटी या पुत्ररत्नाचा जन्म झाला. मूळ नाव "श्रीनिवास नायक" होतं. कन्नड देशस्थ मध्वा ब्राह्मण असलेल्या परंतु व्यवसायाने हिऱ्याचे व्यापारी असलेल्या वरदप्पांच्या घराण्यात १४८४ साली जन्मलेल्या श्रीनिवासचं लग्न परंपरेनुसार सरस्वतीबाईंबरोबर १६ व्या वर्षी झालं. त्याआधी त्यांनी शिक्षणही घेतलं परंतु आईवडिलांच्या निधनानंतर २० व्या वर्षीच व्यवसायाची जबाबदारी अंगावर पडली. व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करत ते "नवकोट नारायण" म्हणून प्रसिद्ध झाले. परंतु एका घटनेमुळे त्यांचं जीवन बदलून गेलं.

असं सांगतात, की एकदा परमेश्वराने गरीब माणसाचं रूप घेतलं आणि पुरंदरदासांकडे 'मुलाच्या मुंजीसाठी' काही दान मागण्यास गेले. त्यांनी काही दिले नाही. मग देव त्यांच्या पत्नीकडे दान मागण्यास गेले. तिच्याकडे देखिल काही द्रव्य नसल्याने तिने बोटातील अंगठी त्या गरीबाला दिली व याची जी किंमत येईल ती घे असं सांगितलं. तो गरीब परत पुरंदरदासांकडेच आला व ती अंगठी त्याने हातात ठेवली.

पट्टीचा जाणकार असलेल्या दासांनी ती अंगठी पत्नीची असल्याचं लगेच ओळखलं. ती तशीच स्वतः कडे ठेऊन दिली व घरी आल्यावर पत्नीला अंगठी बद्दल विचारले. पत्नीला खरे सांगणे अवघड वाटू लागले व ती खोटंही बोलू शकत नव्हती. शेवटी तिने आत्महत्या करण्याचं ठरवलं व वाटीत विष घेऊन आली पण त्यात वाटीच्या तळाशी तिची अंगठी सापडली व तिने ती सर्व काही खरं सांगून पुरंदरदासांना दिली. ती पाहून दासांना वाटलं की हा ईश्वरी दैवी संकेत किंवा साक्षात्कार आहे. मी ईश्वर भक्तीकडे वळावं म्हणून परमेश्वरानेच हा खेळ खेळलाय आणि मग सर्व संपत्ती दान करून ते कुटुंबासमवेत वयाच्या ३० व्या वर्षी देशाटनास बाहेर पडले. शुद्ध सावेरी रागात आणि त्रिपुट तालात बांधलेल्या "अन लयी करा" या पहिल्या वहिल्या काव्यात त्यांनी आजपर्यंत आयुष्याची ३० वर्ष वाया घालवली असं मत मांडलं आहे. तिथेच त्यांच्या काव्यरचना आणि संगीतरचना यांची सुरुवात झाली.

या दरम्यानच विजयनगर साम्राज्याचे कृष्णदेवरायांच्या दरबारी "राजगुरु" असणाऱ्या श्रीव्यासतीर्थांची भेट झाली. त्यांनीच या श्रीनिवास नायकांना "पुरंदरदास" ही उपाधी देऊन आशिर्वाद दिला. संगीत रचना, काव्य रचना, समाज उद्धाराचं कार्य करत ते पूर्ण विजयनगर साम्राज्य, कर्नाटक, तिरुपती, पंढरपूर असे सर्वदूर हिंडले. शेवटी काही काळ हंपीला राहून कृष्णदेवरायांच्या दरबारी गायले. ज्या मंडपात ते गात किंवा असत त्या मंडपाला "पुरंदरदासा मंडपा" म्हणतात.

सर्व संपत्ती दान केल्यानंतर पुरंदरदासांनी हरीदास चळवळ स्विकारली.संस्कृत भागवत साध्या सामान्य माणसांना समजावं या साठी साध्या भाषेत काव्यरचना किंवा कृती करून सामाजिक काम केलं.

पुरंदरदास आणि कर्नाटक संगीत

पुरंदरदासना कर्नाटक संगीताचे पितामह म्हणतात. कर्नाटक संगीताचे मूळ नियम किंवा रचना, उदा. स्वरावली आणि अलंकार, त्यांनी निर्माण केले. कर्नाटक संगीताचा मूळ राग (scale) "राग मायामाळवगौडा" हा त्यानीच निर्माण केला. कर्नाटक संगीत साधनेची सुरुवात याच रागाने करण्याची परंपरा आजही पाळली जाते. संगीताबद्दल प्रथमच जाणून घेणाऱ्या नवशिक्या विद्यार्थ्यांना सहजपणे शिकण्यासाठी काही साध्या सोप्प्या गीतांची रचना केली. त्यांच्या रचना कन्नड भाषेत अधिक असल्या तरी काही संस्कृत मधे पण आहेत.

मायामाळवगौडा या मूळ रागाबरोबरच स्वरावली, जातीस्वरा, अलंकार, लक्षणगीत, प्रबंध, उगभोगा(अभंग) दातूवारसी, गीत, सुलादी,कृती या संगीत विषयक गोष्टींची निर्मिती केली. त्यांच्या रचनांमधे भाव- राग- लय यांचं मिश्रण दिसतं. सामान्य माणसाला शिकता येण्यासाठी त्यांनी काही लोकसंगीताची रचना पण केली.उत्तर हिंदुस्थानी संगीतावर पण पुरंदरदासांचा प्रभाव दिसतो कारण तानसेनजींचे गुरू स्वामी हरिदास हे पुरंदरदासांचे शिष्य.
४७५००० कीर्तने त्यांनी रचली. त्यांची बरीच कीर्तने रचना सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी , समाजातील भेदभाव,स्री- पुरूष भेद, जातीभेद यावरच्या त्यांच्या विचारांविषयीच आहेत.

"अवकुलवादरेनु अवनादरेनु आत्मभावरीयादमेले" अशाप्रकारच्या रचनेत त्यांनी जातीभेदाविषयी आवाज उठवला.या रचनेत ते पुढे म्हणतात, "निरनिराळ्या रंगांच्या गायीचं दूध एकाच रंगाचं असतं. ऊसाचा रस काढला तरी तो तेवढाच गोड असतो. निसर्ग फरक करत नाही तर आपण का करायचा? जन्मावरून नाही तर कर्तृत्वावरून उच्च-नीच जात ठरवावी असं ते म्हणत.

अस्पृश्यतेची व्याख्या ते अशी करतात की जो स्वतः शिस्तबद्ध वागत नाही तो अस्पृश्य, देशाविरुध्द फितुरी करणारा अस्पृश्य, दुसऱ्यावर विषप्रयोग करणारा अस्पृश्य, मृदु भाषा न वापरणारा अस्पृश्य, स्वतःच्या जातीबद्दल दुराभिमान असणारा अस्पृश्य आणि सरते शेवटी विठ्ठलाला शरण न गेलेला अस्पृश्य.

कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तींपैकी एक "त्यागराजा" यांनी लिहिलेल्या एका  गेय नाटका 'प्रल्हादा भक्ती विजयम्' मधे पुरंदरदासांना आदरांजली वाहिली आहे.

२ जानेवारी १५६५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी पुरंदरदासांचे निधन झाले. तिरुमलाच्या पायथ्याशी " अलिपिरी" मधे पुरंदरदासांचा पुतळा स्थापन केला आहे. तिरुमलावर "अस्थान मंडपम्" ह्या सभागृहामधे देखिल त्यांचा पुतळा आहे. १४ जानेवारी १९६४ रोजी त्यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्टखात्याने खास तिकीट प्रकाशित केले.

पुरंदरदासांची पुण्यतिथी पुष्य बहुला अमावस्येला संगीतसेवा, जनसेवा करून साजरी करतात. असे म्हणले  जाते  की  त्रेतायुगात राम, द्वापारयुगात कृष्ण आणि कलियुगात "दासर पदगळू" म्हणजे पुरंदरदासांचं काव्य निर्माण  झाले.

भजन लिंक :  तंबुरि मिटिदवा  
अर्थ         : भजनाचा अर्थ  

ज्योती कुलकर्णी


4 comments:

  1. खूपच माहीतीपूर्ण लेख. त्यांचं मोठेपण कळून आलं

    ReplyDelete
  2. भजन आणि त्याचा अर्थ दोन्ही उत्तम. हंपीला तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर जिथे पुरंदरदास यांचं वास्तव्य होतं ते ठिकाण अतिशय शांत आणि पवित्र आहे.

    ReplyDelete
  3. नीना वैशंपायनSeptember 4, 2020 at 12:29 PM

    पुरंदर दासांची छान माहिती मिळाली. मी पण हंपीला त्यांचं वास्तव्याचे ठिकाण पाहिलं होतं. भजन आणि त्याचा अर्थ खूप सुरेख

    ReplyDelete
  4. अभ्यासपूर्ण लेख.पुरंदरदासांच्याबद्दल खूप माहिती मिळाली.ज्योतीताई,
    ह्या सदरातले तुमचे सर्व लेख संतांबद्दल आणि त्यांच्या सहित्याबद्दल
    खूप माहिती देणारे होते.

    ReplyDelete