नारी तू घे अशी उंच भरारी...

नारी तू घे अशी उंच भरारी, फिरुन पाहू नकोस माघारी!!
हे जरी खरे असले, तरी आज मी जेव्हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहते तेंव्हा मला माझ्या आयुष्यातील त्या सर्व स्त्रियांची आठवण येते, ज्यांच्यामुळे आज मी इथवर पोहचू शकले. आज मी जी काही आहे त्यात त्यांचा फार मोठा हात आहे.

लहानपण आईवडिलांच्या छत्रछायेत मजेत गेले. आईचा धाडसी, आत्मविश्वासू स्वभाव. ती काहीशी कठोर असल्याने नकळत माझी देखील मानसिकता तशीच घडत गेली. कोणतीही गोष्ट न भिता करायची. दृढनिश्चय असेल तर अपयश येत नाही, मार्ग सापडतोच! आपण कुठेही कमी पडायचे नाही आणि वेळ आली तर काहीही करायची तयारी ठेवायची ही फार मोठी शिकवण मिळाली. माझे शाळेतील वातावरण पण बरेच शिस्तीचे असल्याने कामात नीटनेटकेपणा हा आपोआप येत गेला. होम सायन्स शिकतांना संपर्कात आलेल्या सर्व महिलाच होत्या. ह्या टप्यात असताना नकळत child psychology and education ह्या विषयात माझी रुची वाढत गेली आणि हेच विषय पुढे जाऊन माझे करिअर बनले.

माझ्या आयुष्यात फार लवकर माझी मुलगी आली. ती पूर्व प्राथमिक (preschool) मध्ये असताना मी पण शाळेमध्ये काम सुरू केले. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर मला माझ्या आयुष्याची खरी दिशा मिळाली. मी एक वर्षाचा मॉंटेसरी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मला माझ्या आवडीचे क्षेत्र मिळाले. डॉक्टर मारिया मॉंटेसरी ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे, ज्यांनी मला आणि माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्याचा मार्ग दाखवला आहे.

ह्या शिक्षण पद्धतीत दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यामुळे शिकणाऱ्या मुलांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता वाढून ते फार जबाबदारीने सर्व निर्णय घेतात. ह्याचाच फायदा माझ्या मुलींना मिळाला. शाळेत शिकवता शिकवता त्यांच्यासोबत मी देखील खूप शिकत गेले. बंगलोर मधील बहुचर्चित शाळेत काम करत असताना तेथे परप्रांतीय मैत्रिणी मिळत गेल्या आणि त्या सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळाले. मराठी भाषिक मैत्रिणी तर इतक्या हुशार, विविधगुणसंपूर्ण आणि कर्तृत्ववान होत्या, की आपली संस्कृती जपायला हवी ही भावना त्यांच्याकडून सतत रुजत राहिली.

अशातच एका वेगळ्या विश्वात जायचा योग जुळून आला, जेव्हा आमच्या शाळेतील संध्याजींनी आम्हाला त्यांचे खेडेगाव मदनापल्लीबद्दल सांगितले. बंगलोर जवळच असलेल्या आंध्रप्रदेश येथील मदनापल्ली येथे त्यांनी गावातील मुलांसाठी शाळा सुरू केली होती. त्यांच्याकडे माँटेसरी शिक्षण पद्धतीचे सर्व साहित्य उपलब्ध होते, पण ते कसे वापरायचे हे कोणालाच माहीत नव्हते. गाव फार एकांतात असल्याने तिथे त्यांना माँटेसरी प्रशिक्षक मिळत नव्हते. जेव्हा त्यांनी आम्हाला ही समस्या बोलून दाखवली तेव्हा आम्ही शाळेतील ७-८ महिलांनी मिळून या खेडेगावात जाण्याचे ठरवले. 
तिथल्याच गावातील ज्या महिला होत्या त्यांना माँटेसरी प्रशिक्षण सुरु केलं. त्या सर्व महिला गावात काहीही सुविधा नसल्याने केवळ शेती हा व्यवसाय करायच्या. पण आम्ही शिकवायला जातो म्हणून फार उत्साहाने नीटनेटक्या साडी नेसून, सकाळी आपली वही घेऊन येत असत. त्यांच्यातील शिकण्याची जिद्द, चिकाटी आणि इच्छा बघून आम्हाला देखील हुरूप यायचा. त्यांना आमची भाषा येत नसे. आम्ही इंग्रजीमध्ये बोलायचो, मग संध्याजी ते त्यांना तेलुगू मध्ये समजावून सांगायच्या. असा हा कार्यक्रम आम्ही २ वर्षे राबवला. प्रत्येक वेळेस प्रवास करतांना आम्हाला त्रास व्हायचा, पण तिथे गेल्यावर त्या महिलांच्या डोळ्यात जी शिकण्याची जिद्द दिसायची त्याने आम्ही वारंवार तिथे जात असू. आज त्या सगळ्या महिला तेथील शाळेत काम करत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही पुन्हा नव्याने अजून महिलांसाठी हा ट्रेनिंग कोर्स पुन्हा त्या खेडेगावातील इतर महिलांसाठी सुरू ठेवला आहे.

संध्याजींच्या कुटुंबाकडून आम्हाला कृतज्ञता, परोपकार म्हणजे काय हे फार जवळून अनुभवता आले आणि कुठलाही मोठेपणा न दाखवता शिक्षणाच्या माध्यमातून दुसऱ्यांसाठी
काहीतरी चांगले करायचे ह्याची जाणीव झाली. त्यांचे काका, भावंडं असं खूप मोठं कुटुंब होतं. सर्व उच्च शिक्षित, काही देशात तर काही विदेशात स्थायिक झालेले होते. पण त्या गावाची सर्वांना फार ओढ होती. प्रत्येक वेळी आम्ही तिथे गेलो की कोणी ना कोणी तिथे असायचे. तेथील मुलांना ते वेगवेगळे विषय शिकवायचे. सगळेच कसे हौशी, मृदू आणि प्रेमळ भाषेत बोलणारे. ते सगळेजण सत्यसाईबाबांचे भक्त. आम्हाला देखील ते इतके प्रेमाने वागणूक द्यायचे की हे कोणीतरी देवानी निर्माण केलेले दूत आहेत असाच भास व्हायचा.

इथे मला माझा एक अनुभव सांगावासा वाटतो. आम्ही अधूनमधून तिरुपती येथील बालाजी मंदिरात जात असू. तिथे दर्शन घेण्यासाठी लांब रांग असायची; असं वाटायचं पुढल्या वेळेपासून मी इथे मुळीच येणार नाही कारण हा देव दर्शन द्यायला फार त्रास देतो. पण मग गाभाऱ्यातून बालाजीचे दर्शन झाले की मतपरिवर्तन झालेले असायचे आणि निश्चयपण की पुन्हा इथे येणारच. हीच गोष्ट मदनापल्लीच्या बाबतीत घडायची. तिथे जातांना जो प्रवासाचा शीण यायचा तेव्हा वाटायचे की पुन्हा तिथे जाणार नाही. पण संध्याजीचे हसतमुख नातेवाईक, डोंगरातील ती शाळा, तिथली मुलं जी शहराच्या झगमगटापासून फार दूर होती; ज्यांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या, छोट्याशा वस्तूसोबत पण ती तासनतास रमायची, हे बघून आमचा शीण दूर व्हायचा. 
त्या स्त्रिया आम्हाला स्वतःच्या हाताने बनावलेल्या वस्तू द्यायच्या. त्यांचे ते खेड्यातील जेवण आम्हाला तृप्त करत असे. आणि मग तिथून निघताना आमचा निश्चय झालेला असायचा की इथे पुन्हा यायचेच आहे. ते स्थान मला तिरुपतीसारखीच भावना देऊन जायचे.
हे सर्व शक्य झाले ते केवळ डॉक्टर मॉंटेसरी चे प्रशिक्षण घेतले होते म्हणूनच. डॉक्टर मारिया मॉंटेसरीनी जी शिक्षणपद्धती सुरू केली त्याचा मूळ उद्देश स्वतःला आणि इतरांना आत्मनिर्भर बनवणे आहे. हा उद्देश साध्य करतांना आयुष्यात जो सकारात्मक बदल घडला त्यात या सर्व महिलांचा फार मोठा वाटा आहे ज्या सतत जाणीव करून देतात की

"The success of every woman should be the inspiration to another.
We should raise each other up.
Make sure you are very courageous,
be strong, be extremely kind 
and above all be humble.."

           Serena  Williams

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला वर्गाचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या चिकाटीला शतशः प्रणाम!


नेहा कुळकर्णी



2 comments: