नर्मदे हर


परिक्रमा 

'नर्मदे हर' किंवा इथल्या भाषेत 'नरबदे हाऽर' - परिक्रमेत वारंवार ऐकू येणारा परवलीचा मंत्र. हा मंत्र बरेच दरवाजे - घरांचे आणि त्याहूनही अधिक मनांचे - उघडतो. परिक्रमा उचलताना कोणी सांगितले होते - परिक्रमेत छान अनुभव आला तरनर्मदे हरम्हणा, आणि राग आला तर म्हणा –नर्मदे हर’. मनापासून हसत म्हटला तर जरा जास्तच परिणामकारक असणार्‍या ह्या वाक्प्रचाराचे अर्थ मात्र असंख्य आहेत! 

सामान्यत: "नर्मदे हर" म्हणजे "How do you do!" - त्याला उत्तरही तेच! नर्मदे हर! रस्त्यावर येणारा जाणारा परिक्रमावासीयांनानर्मदे हरअशी हाक देतो आणि आपण तेच उत्तर देणे अपेक्षित असते.

दोन परिक्रमावासी कुठल्या मुक्कामी भेटले की 'नर्मदे हरची फैरी झडते. तो परिक्रमावासी जर पूर्वी कधी भेटला असेल तर त्यात 'अरे वा वा, परत भेटलात. कसे आहात? सगळं ठीक ना?' असे असंख्य भाव असतात. हा आपल्यापेक्षा वेगाने चालतो आहे का? याला काही शॉर्टकट मिळाला का? याची चाचपणी असते. मग त्यानर्मदे हर नंतर एकमेकांची चौकशी, पुढे कसे जाणार याबद्दल माहिती एकमेकांना देणे; क्वचित कधी औषधांची देवघेव होते. परत मुक्कामावरून हलताना - नर्मदे हर! आता यात –परत भेटूच. नाही भेटलो तर पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा!' असा विचार असतो. 

 वाटेवरील सोबती
 रस्त्यावरच्यानर्मदे हरपाठोपाठ कधी चहाचे आमंत्रण येते. कधी तुमचा नम्र नकार स्वीकारला जातो. कधी अधिकाराचा गर्व असतो - ज्याला ठामनर्मदे हरनेच नकार द्यावा लागतो. पण ते क्वचित.  बहुतेक वेळा –आता याच. परत कधी येणार तुम्ही आमच्याकडे?' असा प्रेमळ आग्रह असतो. मग दोन मिनिटे टेकल्याशिवाय गत्यंतर नसते. मग चहा नाही प्यायला तरी चालते! इकडच्या तिकडच्या गप्पा होतात - माहिती कळते. काळजी व्यक्त केली जाते. कौतुक असते. 'आम्हाला परिक्रमेचे बोलावणे नाही, तुम्ही निघाला आहात. भाग्यवान आहात!' असा एक सूर दिसतो. अशा ठिकाणी त्या घरातल्या लहानग्यांचे जरा कौतुक करावे, लेकीसुनांची विचारपूस करावी, मग तो घरधनी खूप खूष. तो  एखादी खाजगी काळजी सांगतो. दूरदेशी नोकरी निमित्ताने बाहेर असलेल्या लेकरासुनेचं यश अभिमानाने सांगतो. देश, वेष, भाषा बदलली तरी माणसांच्या सुखदुःखाची चित्रे सारखीच, हे समजते, मगनर्मदे हरम्हणत पाय उचलायचा. 


गावाबाहेरच्या रस्त्यावर दुरून हाक येते - नर्मदे हर! जरा लक्ष देऊन पहावे तेव्हा कळते की शेतातल्या घरात कोणी लहान मूल जागे आहे. प्रतिसाद द्यावाच लागतो - नाही तरनर्मदे हरच्या घोषणा चालूच.  बऱ्याच लहान मुलांच्यानर्मदे हरमागे 'चॉकलेट हैं?' हा प्रश्न असतो. सुरुवातीला आम्हीही खूप चॉकलेटं वाटली मग बंद केली. मुलांना नाराज करण्याचे जिवावर यायचे, पण वाईट सवयीला उत्तेजन देण्यापेक्षा ते बरे असा विचार केला.

गावातून जाताना, परिक्रमावासी आल्याचे कळतेच. मग एखादा मुलगा 'अरे चलो, नर्मदे हर आ गये' म्हणत आपल्या मित्र, भावंडांना गोळा करतो. अर्थात, चॉकलेटच्या आमिषाने. 
एखादे दोन वितीचे पोर, शेंबूड ओढत, आपल्या भावंडांच्या वरताण 'नबब हाऽऽ' असे काही अगम्य ओरडतो तेव्हा थांबावेच लागते. मग जर एखादे चॉकलेट हातावर ठेवले तर चेहेऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. 

दोन प्रसंग आठवतात - धामनोदला सेवा देणाऱ्या पाटीदरांकडे रात्री गेलो होतो. बोलताना त्यांची शंभरीतल्या घरातली आई आत आहे असे कळले म्हणून आशीर्वाद घ्यायला गेलो.नर्मदे हरम्हणत त्यांना नमस्कार केला. मुलाने कानात सांगितले - परिक्रमावासी आहेत - नमस्कार करत आहेत. त्या म्हातारीने - आपले पाय बाजूला घ्यायचा प्रयत्न करत म्हटले - ' अरे नही, हमने उनके पैर छूना चाहिए.' मग आपल्या दुबळ्या हातांनी माझे डोके हातात घेत त्या माऊलीने अर्ध्या हिंदीत, अर्ध्या गुजरातीत - मैयाकडे प्रार्थना केली. 'यांची परिक्रमा सुखरूप पार पडू दे. त्यात काही विघ्न येऊ देऊ नको.'! मुलाला आमच्या हातात काही पैसे द्यायला सांगितले. डोळ्याने अधू असलेली ती माऊली आम्हाला पाहू पण शकली नाही! 

दुसर्‍या एका गावातून जेवण करून दुपारी बाहेर पडत होतो. हवेत पावसाळी गारवा होता. एक म्हातारा ऊन खात पडवीवर बसला होता. मी सवयीनेनर्मदे हरकेले. तशी मला उलटनर्मदे हरकरत तो म्हातारा हाताने चाचपडू लागला. मा‍झ्या लक्षात आले की तो दृष्टीने अधू होता. पुढे जायची घाई होती पण तरी मी त्याचे हात हातात घेतले आणि सांगितले - 'बाबा - परिक्रमावासी हूँ. आगे जा रहा हूँ'. मला घट्ट पकडत तो मला चहा तरी घ्याच असा आग्रह करू लागला. त्याचा तो दुर्बळ हात सोडवणे जरा कठीणच गेले. 

मनाला चटका लावून गेलेले हे दोन नर्मदे हर! 

विसावा घेतांना
कुठल्यातरी सेवकाने आग्रह करून घरी रात्रीच्या मुक्कामाला बोलावलेले असते. आठदहा तासांचाच सहवास, पण त्या कुटुंबाशी एक नाते जुळू पाहत असते. सकाळी निघायची वेळ होते. 'थांबून जा, काय घाई आहे'चा एकदोनदा आग्रह झालेला असतो. पाय निघत नसतो पण परिक्रमा खुणावत असते. मग मात्र निग्रहानेनर्मदे हरम्हणत मागे वळून न बघता पाय उचलावा लागतो. मोठे कठीण असतात हेनर्मदे हर’!

सगळेचनर्मदे हरसुखकारक नसतात. बोरखेडी गावात फक्त एका घरात सोय आहे असे कळले होते. त्या घरी आम्ही जरा लवकरच पोहोचलो. घरातली गृहिणी काही निवडटिपण करत होती. आम्हाला पाहिल्यावर तिचा पहिलानर्मदे हर जरा नाखुषीचाच होता. पण दुसरा पर्याय नव्हता म्हणून आम्ही सुद्धा बसून राहिलो. हळूहळू बाई बोलायला लागली. त्यांचे जुने घर काही दिवसांपूर्वी पाण्याखाली गेले होते. दुसरी व्यवस्था लागत होती. नाखुषीचा स्वर त्यातून उमटला होता. थोड्या वेळाने घरधनी आला. इतर परिक्रमावासी आले. संध्याकाळपर्यंत ती गृहस्वामिनी आम्हाला शूलपाणी जंगलातून जाण्याविषयी सल्ले देत होती. निघताना 'काळजी घ्या. आठवण ठेवा' इथवर आली होती. 

परिक्रमा मार्गात सेवा देणाऱ्या कुटुंबातील लेकीसुनांचे कौतुकच वाटते. दररोज कोणीतरी नवीन माणसे दारात उभी राहणार.नर्मदे हरम्हणत हक्काने बसणार. त्यांचे जेवणखाण बघायचे. झोपण्याची सोय बघायची. त्यांच्या लहरी सांभाळायच्या. आणि हे साधारणपणे वर्षातले चारपाच महिने - दररोज! या सगळ्या माउल्यांना मनःपूर्वक अभिवादन! अशीच एक मैया - सकाळी चहाचे आमंत्रण देत दारात. पहिल्या आमंत्रणाला नाकारायचे नाही या नियमाने चहा घेतला. निघतानानर्मदे हरकेले तर म्हणते सगळे एकदम म्हणा - जोरदार आवाज झाला पाहिजे! मगनर्मदे हरची जोरात आरोळी ठोकत पुढे! मध्य प्रदेशातील या लोकांचे हेनर्मदे हरम्हणणाऱ्या परिक्रमावासियांवरचे प्रेम, हा विश्वास वेगळ्याच प्रतीचा. 

  नर्मदा मैय्या

एक नदी. जीवनदायिनी. या परिसरातल्या  लोकांच्या आयुष्याशी अतूटपणे जोडली गेलेली. या मातेवर इतके प्रेम, इतकी श्रद्धा की केवळ तिच्या परिक्रमेसाठी निघालेले लोकही तेवढेच वंदनीय. त्यांच्यावर भरभरून प्रेम. परिक्रमेच्या वेषातले पण्डितही वंदनीय आणि भुरटे चोरही! परिक्रमेत दोघांचीही कमतरता नाही. 

नर्मदे हर - मोठ्या ताकदीचा छोटा मंत्र! एकदा तरी अनुभवावा असा!...
नर्मदे हर, नर्मदे हर ...


अभिजित टोणगांवकर


5 comments:

  1. खूप छान शब्दबद्ध केले आहे. नर्मदे हर!!

    ReplyDelete
  2. Narmade Har, khup chaan lekh. Ekdam hatke. Interaction with all age groups of people is very interesting,that too with codeword Narmade Har. Majja aali.

    ReplyDelete
  3. Narmade har
    Asach lihit raha vaglya drushtikonatun mhanje saglyana parikrama vividhangani kalun yei.
    Aplya kade mhanta denaryane det jave....denaryache hat ghyave..yacha pratyantar yeta tujhya lekhatun.sagla astana dene vegle ani aplich maramar astana dene ankhi vegle.Hi.ch apli sanskruti .
    Punasch Narmade har

    ReplyDelete
  4. छान अनुभव; छान शब्दांकन!

    ReplyDelete