सौंदर्याची असे हि मूर्ती नाजूक हिची अदा रहाते कामात समर्पित स्त्री सदानकदा |
महिला दिन
म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी,
मदर टेरेसा, रमाबाई रानडे आणि खेळाडू, राजकारणी असे काही ठराविक चेहरे उभे राहतात
ज्यांनी अन्यायाविरूद्ध लढा दिला, स्त्रीशिक्षण, स्त्री-मुक्ती, स्त्रियांचे
समाजातील स्थान इत्यादी क्षेत्रांमधे भरीव कामगिरी करून भारतीय स्त्रियांचे आयुष्य
सुसह्य केले. अर्थात त्यांचे कार्य बहुमोलाचे आहेच. त्यांच्यामुळेच आज आपण
स्त्रिया शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहोत. पण यांच्याबरोबरच अशा
अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी अगदी जगावेगळे काम करून भारतीय समाजात एवढंच नव्हे तर
जगभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यातील दोन उल्लेखनीय स्त्रियांची आज
आपण ओळख करून घेणार आहोत.
रखमाबाई या भारतातल्या
पहिल्या स्त्री रोग तज्ञ आहेत. मंडळी, ज्या काळात रखमाबाई
डॉक्टर झाल्या आणि स्त्रियांवर उपचार करायला त्यांनी सुरूवात केली तो आजच्यासारखा स्त्रीस्वातंत्र्याचा
काळ नव्हता बरं. तो होता १८८४ च्या आसपासचा ब्रिटिश अंमल असलेला आणि सनातनी
धर्ममार्तंडांचे वर्चस्व असलेला काळ! त्यावेळी स्त्रियांनी एवढे उच्च शिक्षण घेणे तेही
परदेशात जाऊन हे अब्रह्मण्यम सदरात मोडणारे होते. त्याकाळी रखमाबाई लंडन
युनिवर्सिटीमधून वैद्यक क्षेत्रातील पदवी घेऊन आल्या आणि पुढे १९५५
पर्यंत त्या आपल्या व्यवसायामधून जनसेवा करीत राहिल्या. स्वातंत्र्यपूर्व आणि
स्वातंत्र्यप्राप्तिनंतरची वैद्यक क्षेत्रातील सगळी स्थित्यंतरे त्यांनी अगदी
जवळून बघितली.
पण याहीपेक्षा
एक अत्यंत महत्वाचे कार्य त्यांनी केलेले आहे ते म्हणजे बालविवाह विरोधी कायदा
संमत करून घेणे. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुलींच्या विवाहाचे वय ९ ते १२
वर्षे होते. या वयातील चिमुकल्या मुलींचे बालपण हिरावून घेऊन त्यांच्यावर सांसारिक
जबाबदार्या लादणे हे अत्यंत अमानवीय होते. शिवाय मुलांचे किंवा पुरुषांचे लग्नाचे
वय निश्चित नसल्याने, तसेच पुरुषांनी प्रथम पत्नीचा मृत्यु झाल्यास दुसरे लग्न
करणे समाजमान्य असल्याकारणाने अशा ९-१० वर्षांच्या मुलींचे पती १५ ते ५० कोणत्याही
वयोगटातील असू शकत. स्वत:पेक्षा २०-२५ वर्षांनी मोठ्या असलेल्या पतीबरोबर शारिरीक,
मानसिक ताळमेळ बसवताना या लहानग्या मुलींची अतिशय फरफट होत असे. पण तत्कालीन
समाजात याविषयी प्रचंड उदासीनता होती.
अशा परिस्थितीत
मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल सर्वप्रथम आवाज उठवला तो रखमाबाई यांनी. त्यांचे
स्वत:चे लग्न नवव्या वर्षी झाले होते. पण समज आल्यावर स्वत:च्या अकार्यक्षम,
व्यसनी, विक्षिप्त, बेजबाबदार पतीकडे नांदण्यास न जाता त्यांनी त्याच्याशी फारकत
घेतली. कोर्टात लढा देऊन स्वत:चे लग्न रद्द करून घेतले. आणि मग मुलींचे लहान न
कळत्या वयात लग्न करून देणे आणि त्यांना सक्तीने सासरी जाण्यास भाग पाडणे या
प्रथेविरूद्धच त्यांचा संघर्ष सुरू झाला. त्याचेच फलित म्हणजे ब्रिटिश सरकारने
आपल्या अधिकारातील सर्व देशांमध्ये मुलींचे लग्नाच्या वेळी किमान वय १५ वर्षे
असावे असा कायदा केला. ही एक खूप मोठी सामाजिक क्रांती होती. पुढे ही रखमाबाई
आयुष्यभर स्त्रियांसाठी आणि अस्पृश्यांसाठी काम करीत राहिल्या. वनिता आश्रम, विधवा
आश्रम, रेडक्रॉस सोसायटी अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी हजारो स्त्रियांचे आणि
पर्यायाने समाजाचे आयुष्य सुसह्य केले आहे. त्याकाळी त्यांनी स्त्रियांना
सुशिक्षित करून बचतीचे महत्व पटवून देऊन बँक अकाऊंट ही उघडायला लावले होते.
अशा या
कर्तबगार, बुद्धिमान, बहुआयामी स्त्री व्यक्तिमत्वाला
मानाचा मुजरा!
छुटनी देवी |
दखल घेतलीच
पाहिजे अशी दुसरी स्त्री म्हणजे झारखंड राज्यातल्या भोलाडीह या छोट्याश्या गावातील
छुटनी देवी महातो. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुख-सोयींनी युक्त अशा आजच्या जगात
केवळ अंधश्रद्धेने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीला चेटकीण ठरवून मारहाण करणे, तिची
नग्नावस्थेत गावातून धिंड काढणे, तिला मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडणे अशा
अत्याचारांची आपण कल्पना ही करू शकत नाही. पण छुटनी देवी महातो यांनी हे सगळे स्वत:
सहन केले आहे आणि अगदीच जीवावर बेतले तेव्हा धाडस करून आपल्या चारही मुलांना घेऊन
त्या गावाबाहेर पडल्या.
पुढील काही
वर्षात स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. आज त्या स्वत:ची भक्कम संघटना उभी करून
अशा प्रकारे स्त्रियांवर अत्याचार करणार्यांविरूद्ध लढा देत आहेत. आतापर्यंत
त्यांनी शंभरावर स्त्रियांचे पुनर्वसन केले आहे. अशा अंधश्रद्धांविरूद्ध त्यांचा
लढा गेली २५ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत
सरकारने यावर्षीचा ‘पद्मश्री पुरस्कार’ त्यांना दिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे
छुटनी देवींना पद्मश्री पुरस्कार किती मोठा सन्मान आहे किंवा तो का दिला जातो
याबद्दल काहीही माहिती नाही. कारण त्या अत्याचारित स्त्रियांचे दु:ख स्वानुभवाने
जाणतात आणि फक्त त्यांना मदत करण्याच्या निरपेक्ष भावनेने काम करतात. ६२
वर्षांच्या छुटनी देवी आज ही कुठे ही स्त्री अत्याचाराची खबर मिळताच आपली टीम घेऊन
तिथे पोचतात. आधी लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतात नाहीतर सरळ पोलिसात तक्रार
करून जेलमध्ये पाठवतात.
आधुनिक काळात
देखील अशाप्रकारचे सामाजिक अत्याचार तेही फक्त स्त्रियांवर होताना बघून मन पिळवटून
जाते. अशावेळी छुटनी देवींसारख्या स्त्रियांची मदत करणार्या स्त्रीला जेव्हा
‘पद्मश्री पुरस्कार’ मिळतो तेव्हा साहजिकच आशेचे किरण दिसू लागतात. म्हणूनच महिला
दिनाच्या प्रसंगी त्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. छुटनी देवींना आणि
त्यांच्या कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा!
मानसी नाईक
Khup chan
ReplyDeleteMast
ReplyDelete