हवाहवासा गारवा.... चित्त प्रसन्न करणारा.... अंधुकसा
उजेड....आकाशाची पोकळी जाणवणारा..... झाडांच्या आकृत्या....चालायला, बोलायला उत्सुक,कोणाची
तरी वाट पाहणाऱ्या. नीरव शांतता.... बोलण्यासाठी अधीर. टपोरलेल्या कळया..... फुलण्याच्या
प्रतीक्षेत. मोहोरलेल्या आंब्याचा मंद, मादक सुगंध......... आसमंतात दरवळलेला. दाट
पानात पंखांची उघडझाप.........कोणाच्या तरी आगमनाची चाहूल घेणारी. सगळा आसमंत मोहोरलेला,एका
कळीत सामावलेला.........उमलण्याची वाट पाहणारा, श्वासाश्वासांत भरून घ्यावासा वाटणारा,
खोल...खोल अंतर्मनात साठवावासा वाटणारा!
आणि.....बघता...बघता...तो जवळ आल्याची चाहूल लागली....दिशा
चहू बाजूंनी अस्फुट प्रकाशल्या. पाना फुलांवर,वृक्ष
वेलींवर रंग रेषा साकारू लागल्या. दूरवर कोंबडा आरवला. त्याचे तरंग संपूर्ण आसमंतात
उमटले.पाने थरथरली. चोचीतून नाजूक आळोखे पिळोखे चित्कारले. झाडांचे शेंडे टाचा उंचावून
स्वागताला उतावीळ झाले. आकाशाची गहन पोकळी शेंदुरली. निळ्या आकाशाला त्याच्या किरणांची
ओढ लागली. आणि बघता बघता सावकाश किरणांची सलामी देत तो आला, चैतन्याची उधळण करत.....चीचीतून
सुरावली घुमाल्या...... पाना पानातुन रंग बहरले..... कळया ओठातल्या ओठात हसल्या, मोहोराचे
मोती टपोरले, नाजूक पक्षांच्या नाचऱ्या कोमल पावलांनी फांद्यानी हलकेच हिंदोळे घेतले.
सारा आसमंत विविध रंगांनी
उजळून निघाला.त्याचे शेंदुरणे निळाईत झेपावले. ढगाच्या नक्षीत अनेक रंगछटा साकारल्या.
शिरशिरणारी थंड हवा ऊबदार झाली. कळ्यांनी आपल्या चोची उघडल्या. विविध सुगंधित गंधांनी
आसमंत भरून गेला.परागकण अलगद चोचीत टिपले गेले. आंब्याचा मोहोर सुवर्ण कांतीने झळाळला.
अर्धोंमिलीत मोहोर नक्षीदार दागिन्यासारखा देखणा दिसू लागला. लवलवती कोवळी तांबूस
पाने सोनेरी प्रकाशात लखलखली.
संपूर्ण सृष्टीने एक
दीर्घ श्वास घेतला......ओssssssम.... आणि आसमंत ओंकारमय झाला...... माझ्या सकट! मी
आणि आसमंत एकरूप झालो...... ओंकारमय...!!!!
माधुरी राव
सुरेख वर्णन !!
ReplyDelete