वाट पाहुनी जीव
शिणला, दिसा मागुनी दिस टळला
सुर्व्या आला तळपून
गेला, मावळतीच्या खळी गालाला
कुटं गुंतला शब्द
इसरला, देऊन अपुल्या सजणीला
कधी येशील रे!
किती वाट पहायला लावतोस! नेहेमीचेच आहे हे तुझं. तुझ्या येण्याची थोडीशी चाहूल लागली
की मी तुझ्या भेटीच्या ओढीने अगदी हरखून जाते. डोळ्यांत प्राण आणून तुझी रोज वाट पहात असते. आणि तू? तू फक्त येतो, येतो म्हणून हुलकावण्या
देत रहातोस. तुला माहिती आहे ना! मी तुझी किती आतुरतेने वाट पाहत असते ते. पण तू काही
ठरल्या वेळी येत नाहीस. पूर्वी कसं अगदी ठरल्या दिवशी तू यायचास. पण हल्ली मात्र खूप
वाट पाहायला लावतोस.
नुसतंच म्हणायचं
माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, पण कधी कधी वाटतं, मला
जितकी तुझ्या भेटीची ओढ असते ना, तितकी तुला नसतेच
मुळी. मी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत दिवस मोजत असते आणि तू मात्र दर आठ दिवसांनी पुढचा
वायदा देत राहतोस. कधीकधी तर माझ्या डोळ्यांतली तुझ्या भेटीची ओढ मावळायला लागते. मनातील
मोरपिसारा पंख मिटून घ्यायला लागतो. आणि मग मी 'येरे घना येरे घना, न्हाऊ
घाल माझ्या मना'
म्हणत
उदास होऊन तुझी विनवणी करायला लागते. आता माझा धीर अगदी सुटत चाललेला असतो. पण खरं
सांगू का माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, की तुझं हे असं
छळणंही
मला
आवडतं.
आणि अचानक तुझ्या
येण्याची बातमी घेऊन वीज येते आणि लख्खन चमकून जाते. नाही नाही मला तुझ्या येण्याचा
भास तर होत नाहीये ना! खरंच का तू येतोयस? तुझ्या येण्याची चाहूल तर लागते आहे, पण
हा भास तर नाही ना!!! पुन्हा जोरदार वीज चमकली. आता मात्र नक्कीच तू येत आहेस. तुझ्या भेटीच्या ओढीने
मी हुरळून गेले. वेड्यासारखी भान विसरून धावत अंगणात आले. आणि......... आणि दूर क्षितिजावरून
तू येतांना दिसलास. मी हरखून गेले. माझ्या मनीचा मोर थुई थुई नाचू लागला. मला बघून
तू पण तुझी गती वाढवलीस. तुझ्या वाढलेल्या गतीवरून धावत येऊन मला मिठीत घेण्याची तुझी
ओढ मला जाणवते आहे. ये रे धावत ये आणि मला घट्ट मिठीत घे. तुझ्या प्रेमाच्या सहस्र
धारांनी मला अगदी चिंब भिजवून टाक. तू अगदी जवळ आला आहेस. टप... टप... तुझ्या घोड्यांच्या
टापांचा आवाज जवळ जवळ येतो आहे. तुझी चाहूल माझा रोम रोम फुलवते आहे. त्या सुखाच्या
कल्पनेने माझे डोळे गच्च मिटले आहेत. आणि क्षणात तू हळुवार हातांनी मला जवळ घेतलंस.
आणि माझ्या कानात कुजबुजलास "डोळे उघड ना , बघ मी आलोय तुझ्या साठी."
मी - उंहुं.
"असं काय? उघड की डोळे. पहा तरी माझ्याकडे."
मी - "नको
रे माझ्या सुखाला माझीच नजर लागेल."
आपल्या प्रेमाच्या
सहस्र धारांनी त्याने मला चिंब चिंब भिजवून टाकले. त्याच्यावरचा राग रुसवा सगळं सगळं
क्षणात धुवून टाकलं त्यानं. तो आला आणि माझं
मन मोरपिसासारखं हलकं होतं. मयूरपंख लेवून मी आनंदाने नाचू लागते. आणि कंठातून मुक्त
स्वर उमटतात 'घन
घन माला नभी दाटल्या कोसळती धारा'. आणि मी अगदी तृप्त तृप्त होते. वेळाकाळाचं भान विसरून
चिंब चिंब भिजत रहाते. अगदी मनसोक्त , मन भरे पर्यंत.
होय अगदी बरोब्बर
ओळखलंत. मृगात कोसळणारा पहिला पाऊस हे माझं पाहिलं प्रेम आहे. अगदी लहानपणापासून मला
त्या पहिल्या पावसाचं प्रचंड वेड आहे. आज पन्नाशी उलटून गेली तरी पहिल्या पावसात भिजायचं
वेड थोडं सुद्धा कमी झालेलं नाही.
त्याचं येणं अगदी
कसं रुबाबदार असतं. ते सोनेरी किनार असलेलं गच्च दाटून आलेलं काळंभोर आभाळ,
मधूनच लख्खन चमकणारी वीज, सुरवातीला हळुवार पावलांनी त्याचं येणं, आसमंतात मृदगंधाची
होणारी उधळण, चराचर सृष्टीने आलेली मरगळ झटकून त्याच्या स्वागताला
सज्ज होणं, आणि घरातल्यांची नजर चुकवून माझं अंगणात जाऊन उभं
रहाणं आणि पुढच्याच क्षणी त्याचं प्रपाता सारखं कोसळणं सगळंच किती देखणं असतं. अगदी
वेड लावणारं असतं.
त्याच्या
त्या मिठीतल्या सुखाची सर कश्शा कश्शाला नाही. तो येतो,
मुक्त हस्ते प्रेमाची आनंदाची, समृद्धीची उधळण
करतो. आणि रिक्त होऊन माघारी वळतो.
त्याच्या प्रेमाच्या
समृद्धीच्या खुणा अंगावर लेवून माझं मन गात रहातं
चिंब पावसानं
रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली
चांदणं गोंदणी
झाकू नको कमळंनबाई,
एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली
सखे लावण्याची खाणी
फार सुंदर
ReplyDelete"रुपखनी अंगावरली सखे लावण्याची खाणी" ... क्या बात है !
ReplyDelete